Tughlaqabad Fort Information in Marathi
दिल्लीच्या गादीवर आजवर अनेक राजघराण्यांनी राज्य केले आहे. समग्र भारताचा जणू काय केंद्रबिंदूच दिल्लीची गादी हीच होती आणि हे सत्य सुध्दा आहे कारण ज्या घराण्याच्या ताब्यात दिल्ली चे राज्य असायचे त्यांचे ईतर राजे व प्रांतावर वर्चस्व असायचे. मध्ययुगीन भारतात तुघलक घराण्याचे दिल्लीवर राज्य होते ज्यांनी सुलतानशाही म्हणून भारतीय इतिहासात अनेक वर्ष राज्य केल्याचा उल्लेख आहे.
तुघलक घराणेशाही काळात अगदी सुरुवातीच्या काळातील बांधलेला हा किल्ला आज जरी पडक्या व तुट फुट अवस्थेत असला तरी तत्कालीन काळातील पुष्कळश्या गोष्टींचा उलगडा ह्या किल्ल्याला प्रत्यक्ष भेट दिल्यावर होतो. ह्याच तुघलकाबाद किल्ल्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखातून आम्ही देणार आहोत, ज्यामध्ये मध्ययुगीन भारताची वास्तुकला व शासन पद्धतीचा इतिहास कुठेतरी जवळून प्रत्यक्ष अनुभवल्याचा नक्कीच भास होईल.
तुघलकाबाद किल्ल्याचा इतिहास – Tughlaqabad Fort Information in Marathi
- तुघलकाबाद किल्ला – निर्मिती व शासक
तुघलकाबाद किल्ला हा जवळपास सहा किलोमीटर ईतके क्षेत्रफळाने व्यापून आहे , जो भारताची राजधानी दिल्ली येथे स्थित आहे. तुघलक घराण्याचा संस्थापक घैसुद्दिन तुघलक याने १३२१ साली या किल्ल्याची निर्मिती केली होती परंतु खूपच अल्प काळात म्हणजेच १३२७ साली त्याला हा किल्ला त्यागावा लागला.
किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसराला तुघलकाबाद म्हणून ओळखण्यात येते, तुघलक घराणेशाही काळात कुतुब – बदरपूर रस्त्याचे निर्मितीकाम झाले होते जो रस्ता आज मेहरुली -बदरपूर ह्या नावाने सुध्दा ओळखला जातो.
- शाप व तुघलकाबाद किल्ला
घैसुद्दिन तुघलकाला स्वप्नामध्ये अनेकदा सुंदर किल्ले दिसायचे ज्यामुळे त्याला ते वास्तवात उतरवण्याची फार ईच्छा असायची ह्याकरिता त्याने दिल्लीतील सर्व मजुरांना केवळ आपल्याच दरबारी काम करण्याचा आदेश दिला होता. ह्यामुळे सुफी संत निजामुद्दीन औलिया हे चिडून उठले कारण त्यावेळी त्यांच्या विहिरीचे बांधकाम सुरु होते व ह्या कामात खंड निर्माण झाला कारण सुलतानाच्या आदेशामुळे सर्व मजूर दरबारात कामाला लावण्यात आले होते.
ह्याचा परिणाम असा झाला की निजामुद्दीन औलिया यांनी शाप शब्दाचा उल्लेख केला ते शब्द या प्रकारे होते ,”यारहेयुज्जर याबसेयगुज्जर ” म्हणजे येथील लोक येथेच राहतील व येथे केवळ गुज्जर राज्य करतील. पुढील काळात तुघलक घराण्याचे पतन होवून तिथे गुज्जर लोकांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. संपूर्ण तुघलकाबाद ह्या किल्ल्यातच वसलेले पाहायला मिळते.
पुढील काळात आणखी एक संत हुनुज दिल्लीदुरुस्त यांनी घैसुद्दिन तुघलकला शाप दिला होता ज्यानंतर घैसुद्दिन आपला पुत्र मोहम्मद बिन तुघलक याला भेटायला गेला होता जिथे भव्य मंडप सुलतानच्या अंगावर पडून झालेल्या प्रकारात घैसुद्दिन तुघलक १३२४ साली चेंगरून मरण पावला होता व हे सर्व कटकारस्थान त्याचाच पुत्र मोहम्मद बिन तुघलकचे होते.
- किल्ल्यातील वास्तुकला व शासकाचे थडगे
सध्या किल्ल्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली पाहवयास मिळते परंतु इतिहासातील दाखल्यावरून सदर किल्ल्याला एकूण ५२ द्वारे होती व सोबतच जवळपास १५ मीटर उंचीची नागमोडी वळणाची भिंत सुध्दा बांधण्यात आली होती. हल्लीच्या स्थितीत केवळ १३ दरवाजे उपलब्ध आहेत, तुघलकाबाद किल्ला विषेतः प्रसिध्द आहे तो ह्याच्या अतिभव्य दगडी बांधकामामुळे. सोबतच तुघलक शासनकाळात किल्ल्यात अनेक छोट्या वास्तू बांधण्यात आल्या होत्या त्या आज नामशेष झाल्या सारख्या आहेत.
किल्ल्या नजीकच दक्षिण भागात घैसुद्दिन तुघलक याचे थडगे बांधण्यात आले आहे. किल्ल्याच्या आतील पुष्कळसे बांधकाम हे लाल दगड व ग्रेनाईट दगडाचे आहे , घैसुद्दिन तुघलकाच्या थडग्याच्या बाजूला दोन थडगे आहेत ज्यामध्ये एक त्याची पत्नी व दुसरे पुत्र मोहम्मद बिन तुघलकाचे थडगे आहे. संपूर्ण थडगे हे सुंदर संगमरवराचा वापर करून बांधण्यात आले आहे. किल्ल्याच्या दरवाजावर काही शिलालेख सुध्दा कोरण्यात आले आहे जे किल्ल्याबद्दल माहिती देतात.
शेवटी किल्ल्या बद्दल सांगायचे झाल्यास किल्ल्याच्या दक्षिण भागात कृत्रिम जलाशये उपलब्ध आहेत व आजूबाजूला अनेक काटेदार वनस्पती आहेत, तत्कालीन किल्ल्याच्या आजूबाजूला आज आधुनिक काळातील लोकांचा वावर बघावयास मिळतो.
अश्या प्रकारे मध्ययुगीन भारतातील एक वास्तू म्हणून आपण ह्या किल्ल्याला भेट देऊन प्रत्यक्ष सर्व गोष्टी बघू शकता , जरी पुष्कळश्या बाबी आज खंडित अवस्थेत आढळतात तरी बांधकाम गत काळात नक्कीच मनाला ओढून नेते.. आशा आहे दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल, असेच आमचे ईतर माहिती देणारे लेख वाचून पर्यटन करण्याची संधी मिळाल्यास अवश्य अश्या स्थळांना भेट द्या.