Tamhini Ghat
मित्रांनो, निसर्गरम्य ठिकाणी भ्रमंती करायला कोणाला आवडणार नाही. आपल्या महाराष्ट्र राज्यातील सहयाद्री पर्वताच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये पावसाळा आणि हिवाळा या ऋतुंमध्ये निसर्ग जणू हिरवा शालू पाघरून बसल्या सारखा आपल्या दृष्टीस पडतो. या सह्याद्री पर्वतातून पडणारे धबधबे आपणास त्यांच्याकडे आकर्षित करीत असतात. अश्या विलोभनीय स्थळी पर्यटनाला जायला कोणाला आवडणार नाही. चला तर मग जाणून घेवूया अश्याच एका निसर्ग रम्य स्थळाबद्दल जे सहयाद्री पर्वताच्या घाटामध्ये वसलेलं आहे.
मित्रांनो, सहयाद्री पर्वत हा महाराष्ट्राला लाभलेलं एक नैसर्गिक वरदान आहे. याचं, सहयाद्री पर्वताच्या पश्चिम घाटामध्ये असलेलं विलोभनीय निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट. सह्याद्रीच्या डोंगर माथ्यामध्ये वसलेलं हे स्थळ पावसाळ्यात लोकांना आपल्याकडे जणू आकर्षित करीत असते. पावसाळ्यात पर्यटक प्रेमींची जणू या ठिकाणी जत्राच भरते. निसर्ग प्रेमी दूर दुरून याठिकाणी निसर्गाचे खरे रूप पाहायला येतात. पावसाळ्यात येथील टेकड्या जणू कात टाकतात. रुक्ष करडा रंग टाकून हिरव्यागार शाली आपल्या अंगावर पांघरतात. ताम्हणी घाटात अनेक असे नयनरम्य दृश्ये आहेत जे पाहून आपलं मन प्रसन्न होऊन जाते. इथे असलेल्या मुळशी धरणाचा देखावा पाहण्यासारखा आहे.
ताम्हिणी घाट एक निसर्गरम्य ठिकाण – Tamhini Ghat Information in Marathi
ताम्हिणी घट जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्गाने कोलाडपर्यंत जावे लागते. कुंडलिका नदीवरील पूल ओलांडला की, डाव्या बाजूला मुळशी धरणावरून पुढे पुण्याला जाणारा रस्ता लागतो. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात हा ताम्हिणी घाट आहे. जस जसा आपण हा घाट चढू लागतो, तस तसा आपणास स्वप्नाच्या दुनियात हरवल्या सारखं वाटत. लांबच्या लांब पसरलेले हिरवेगार मखमली गालिचे, पांढऱ्या शुभ्र ढगांनी झाकल्या गेलेले उंचच्या उंच डोंगरे त्यातून हळूच डोकावणारे धबधबे हे सर्व नैसर्गिक दृश्य पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.
घाटातल्या वळणा वळणावर नयनरम्य, विहंगम देखावे जणू काही आपली वाटच पाहात असतात. पावसाळी धुक्यात जणू काही डोकी हरवलेल्या टेकडय़ा आकाशात उंच झेपावत आहेत, असे वाटते. टेकडय़ांच्या या भल्या-थोरल्या भतीवर अलगद उतरणारे ढग वातावरण भारावून टाकतात. काळ्या ढगांभोवती चालणारा हा ऊन-पावसाचा खेळ जणू काही दिव्याची ज्योत थरथरावी असा भासतो. हा मनोहारी खेळ पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो.
निसर्गप्रेमीना या ठिकाणी येण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्याने या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. ताम्हिणी हा घाट मुंबईपासून सुमारे १४० किमी अंतरावर असून पुण्यापासून पौड रस्त्यामार्गे ९३ किमी. अंतरावर वसलेला आहे. तसचं, मुंबईवरून पुण्याला येतांना मुबई पुणे महामार्गावरून लोणावळा येथे उतरून आम्बी वैली रस्त्याने ताम्हिणी घाटाकडे जाता येते. सर्वांना आल्हाददायक आनंद देणारा देखावा या ठिकाणी असल्याने आपण वर्षातून एकदा तरी या ठिकाणी जरूर भेट द्यावी. धन्यवाद .