Suresh Bhat Mahiti
मराठी गझल, कवितेंच्या बाबतीत साहित्य क्षेत्रात ज्याचं नाव मानाने घेतले जाते ते नाव म्हणजे सुरेश भट मराठी गझलेतील एक अजरामर नाव.
गझल लिहिण्याचे एक तंत्र असते. वृत्त, मात्रा, ओळी,शेर ईत्यादि गझलेचे भाग. आणि ते समजणे फार कठीण त्यामुळे गझल लिहिण्याच्याच काय पण ऐकण्याच्या भानगडीतही सहसा कुणी पडत नसे, सुरेश भटांनी गजलेची बाराखडी सर्वसामान्य लेखक, रसिकांपर्यंत पोहोचवली आणि मराठी गझल मनामनात रुजवली आणि रसिकांच्या मनावर राज्य करणारे ‘गझल सम्राट’ ठरले.
‘गझल सम्राट’ सुरेश भट – Suresh Bhat Information in Marathi
नाव: | सुरेश श्रीधर भट |
जन्म (Birthday): | १५ एप्रिल १९३२ |
गाव: | पश्चिम विदर्भातील अमरावती |
वडिलांचे नाव: | डॉ. श्रीधर भट |
आईचे नाव: | शांताबाई भट |
निधन: | १४ मार्च २००३ |
सुरेश भट यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात १५ एप्रिल १९३२ ला पश्चिम विदर्भातील अमरावती येथे झाला. वडील डॉ. श्रीधर आणि आई शांताबाई भट. त्यांच्या आईला आधीपासूनच कवितेची आवड होती. त्यांच्याचमुळे सुरेश भटांनाही लहानपणीच कवितेची आवड निर्माण झाली. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांच्या एका पायाला पोलिओ झाला पण त्यांनी आयुष्यात कधीच त्याचं भांडवल केलं नाही.
महाविद्यालयीन जीवन जगात असतानाच त्यांच्या लेखनाला सुरवात झाली होती. अमरावतीतील राजकमल, रेल्वे स्टेशन चौकात चहाच्या टपरीवर दोस्त मित्रांची मैफिल जमत असे आणि ते आपल्या पहाडी आवाजात गझल सादर करायचे.
त्यांचं शिक्षण अमरावतीतच झाले. बी.ए. चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमरावतीमधीलच ग्रामीण भागात शिक्षकाची नौकरी सुरु केली. तेथेही लिखाण सुरूच ठेवले. वाचनाची, संगीताची, आवड लहानपणीपासूनच असल्यामुळे त्यांच्यावर कवितेचे संस्कार घडत गेले. पुढे त्यांच्या लेखणीतून मराठी कविता, गझलेवर संस्कार होऊ लागले ती जन्म घेऊ लागली.
सुरेश भटांच्या काही कविता, शेर आणि गझल – Suresh Bhat Kavita
मराठी गझलेने इतिहास घडविला. पुढे त्यांच्या तालमीत अनेक मराठी गझलकार घडत गेले. पुढे एकापेक्षा एक गझलांची, कवितेची भेट ते रसिकांना देतच गेले. समाजातील प्रत्येक विषयावर त्यांनी लेखन केले ते राजकीय असो,
सामाजिक असो कि शृंगारिक. आपल्या गझलेतून समाजाला प्रश्नही रोखठोकपणे विचारतात आणि त्यांना आपल्या सोबतही घेतात. त्यांचा एक शेर आहे…
सूर्य केव्हाच अंधारला यारहो
या, नवा सूर्य आणू चला यारहो.
सर्वसामान्य जनतेला तुम्ही नेहमीच गृहीत धरू शकत नाही असे सांगत ते सत्ताधारी, राजकारणींनाही ते सावधानतेचा इशारा देत ते लिहितात.
लोक रस्त्यावरी यावया लागले
दूर नाही आता फैसला यारहो.
धावणाऱ्या जगाविषयी अतिशय सुंदर त्यांचा एक शेर आहे.
चालण्याची नको एवढी कौतुके
थांबणेही अघोरी कला यार हो.
इतके पैलू फक्त एका गझलेमधून आपल्याला दिसून येतात. त्यांनी अनेकानेक सुंदर रचनांनी साहित्य क्षेत्र समृद्ध केले.
असे सांगितले जाते कि पं.हृदयनाथ मंगेशकर यांना सुरेश भटांची कवितेची वही एका फुटपाथवर सापडली आणि त्यातील रचना वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले त्यांच्या रचनांना चाली लावल्या, त्या रचना अजरामर झाल्या. त्यांच्या गझला, कविता लता मंगेशकर, अशा भोसले, सुरेश वाडकर आदींनी गायल्या आहेत.
सुरेश भटांच्या कविता – Suresh Bhat Poems
मराठीवर त्यांचे निस्सीम प्रेम होते. त्यांची एक गझल तर महाराष्ट्र दिन, मराठी राजभाषा दिनी तर आवर्जून ऐकू येते.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगत माय मानतो मराठी.
सर्वसामान्यांना समजून येतील, त्यांचे प्रतिनिधित्व करतील अशा त्यांच्या रचना असत त्यामुळे रसिकांचे निर्मळ आणि उदंड प्रेम त्यांना लाभले जे त्यांच्या आतून येई तेच कागदावर उतरत असे म्हणून त्यांच्या गझलेचा एकेक शेर हा मोत्यासारखा वाटतो. सुरेश भट म्हणत असत कि, असं आतून येण्यासाठी ती कविता आधी तुम्हाला जगावी लागते, त्याची किंमतही मोठी मोजावी लागते. त्यांचा उकृष्ट असा शेर आहे कि,
फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे?
घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही!
त्यांचा कार्यक्रम कुठेही असो रसिकांनी सभागृह खचाखच भरून जात असे मग तो कार्यक्रम निशुल्क असो कि, तिकीट लावून. रसिकांचे भरभरून मिळणारे प्रेम, प्रसिद्धी या सगळ्यांमध्ये जगत असतांना देखील त्यांनी त्यांच्या मूळ स्वभावात कधीच नाटकीपणा येवू दिला नाही. कविता गझलेतूनही भूमिका हि सरळ, स्पष्ट आणि रोकठोकपणे मांडली.
सुरेश भटांनी अनेक नवोदितांना लिहिते केले, त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळवून दिले.
जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही.
शोषितांना गझलेतून आव्हान केले.
उष:काल होता होता काळरात्र झाली,
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली.
‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘झंझावात’ आणि ‘सप्तरंग’ ह्या त्यांच्या अजरामर अश्या साहित्यकृती.
आज त्यांच्या अनेक कविता शालेय पाठ्यपुस्तक, विद्यापीठांच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात आहेत.
Suresh Bhat Marathi Kavita Sangrah
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा त्यांच्यावर फार प्रभाव होता. ते स्वत: ईश्वराचे अस्तित्व नाकारणारे असल्यामुळे त्यांनी जीवनाच्या उत्तरार्धात बौद्ध धर्म स्वीकारला.
डॉ. भाऊ लोखंडे यांच्या उपस्थितीत भन्ते सुरई ससाई यांनी त्यांना धम्मदीक्षा दिली होती. बाबासाहेबांना वंदन करणाऱ्या काही ओळींमधून त्यांच्या अनुयायांच्या मनातील भाव सुरेश भटांनी किती अचूक मांडला.
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना,
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना.
कोणते आकाश हे?
तू आम्हा नेले कुठे,
तू दिलेले पंख हे..
पिंजरे गेले कुठे?
या भराऱ्या आमच्या, हि पाखरांची वंदना.
नागपूर येथे १४ मार्च २००३ रोजी या मायभूमीचे पांग फेडत गझल सम्राट सुरेश भट यांनी जगाचा निरोप घेतला तरीही
जाणते हि बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला,
मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो.
ह्या त्यांच्याच ओळी किती समर्पक ठरतात.
गझल सम्राट सुरेश भटांवरील हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की आम्हाला कळवा..! आणि जुळून रहा माझी मराठी सोबत.