Sinhagad Fort Information in Marathi
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमुख आणि प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक समजला जाणारा सिंहगड हा महाराष्ट्रातील पुणे शहरापासून जवळ असलेला किल्ला आहे. पुणे शहरापासून सुमारे 40 की.मी. अंतरावर नैऋत्य दिशेला सिंहगड किल्ला असून या किल्ल्याला पूर्वी कोंढाणा म्हणून ओळखले जात असे.
हवेली तालुक्यातील डोणजे गावी हा किल्ला असून महाराजांच्या विश्वासू आणि शूर अश्या तानाजी मालुसरे या सरदाराने आपल्या पराक्रमची शर्थ करून हा किल्ला स्वराज्यात आणला होता. समुद्र सपाटीपासून हा किल्ला 4400 फुट उंचीवर असून सह्याद्रीच्या पूर्व शाखेत विस्तीर्ण पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगांमध्ये हा किल्ला आहे. या गडावर पायऱ्यांसारखा भासणारा खंदकाचा भाग व किल्ल्यावर उभारलेला दूरदर्शनचा मनोरा, यामुळे पुण्यातून कुठूनही सिंहगड नजरेस पडतो.
सिंहगड किल्ल्याविषयी ची माहिती – Sinhagad Fort Information in Marathi
सिंहगडावर आपल्याला काय पहायला मिळतं – Sinhagad Killa chi Mahiti Marathi
ज्या ठिकाणी वाहन पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे तेथून सरळ निघाल्यावर उत्तर दिशेला सर्वप्रथम दृष्टीस पडतो पुणे दरवाजा. लागोपाठ तीन दरवाजे असून तिसरा दरवाजा यादवांच्या काळातील आहे. या दरवाज्यावर कमळं कोरण्यात आलेली आहेत. डाव्या बाजूला उंच असा 35-40 फुटांचा खंदकडा आहे. परत आल्या रस्त्याने जेंव्हा थोडसं मागे जाल तर खडकामध्ये खोदलेल्या घोडेपागा बघायला मिळतात. खड्कातल्या खिंडीमधून आत गेल्यानंतर गणेश टाके, एक कुंड, दारूखाना इमारत, रत्नशाळा आहे.
उजव्या बाजूला पुढे टिळक बंगला आणि राजाराम महाराजांची समाधी आहे. वर चढून गेल्यावर कोंढाणेश्वर मंदिर आणि शेजारी चौथऱ्यावर हाताची प्रतिमा तयार करण्यात आलेली नजरेस पडते. शत्रूशी लढाई सुरु असतांना तानाजी मालुसरेंचा हात या ठिकाणी तुटून पडल्याचे सांगितले जाते.
थोडं पुढे गेल्यावर तानाजी मालुसरेंचे स्मारक असून खालच्या अंगाला अमृतेश्वर मंदिर आणि देव टाके आहे. पुढे कडेकडेने गेलात की भव्य अश्या कल्याण दरवाज्यात आपण पोहोचतो. या ठिकाणी उदयभानचे थडगे असून झुंजार बुरुज देखील आहे. थोडं पुढे डोणगिरी बुरुज आणि कलावंतीण बुरुज देखील पहायला मिळतो. या गडावरून तोरणा, लोहगड, पुरंदर, राजगड, विसापूर, तुंग, खडकवासला धरण असा विस्तीर्ण मुलुख नजरेस पडतो.
सिंहगड किल्ल्याचा इतिहास – Sinhagad Fort History in Marathi
सिंहगडाला पूर्वी कोंढाणा किल्ला म्हणून ओळख होती. कौंडीण्य ऋषींमुळे हा किल्ला कोंढाणा म्हणून ओळखला गेला. पूर्वी हा गड आदिलशाहीत होता त्यावेळी दादोजी कोंडदेव किल्ल्यावर सुभेदार म्हणून कार्यरत होते. दादोजी कोंडदेव यांचे 1647 मध्ये निधन झाल्यावर छत्रपती शिवरायांनी सिद्दी अंबर या कोंढाण्याच्या किल्लेदाराला लाच देऊन हा गड स्वराज्यात आणला.
मात्र पुढे शहाजी राजांच्या सुटकेसाठी ई.स. 1649 ला शिवाजी महाराजांना हा किल्ला विजापूरकरांना (आदिलशाहीला) परत द्यावा लागला. मोगलांना पुरंदरच्या तहात जे किल्ले दिल्या गेले त्यात सिंहगड देखील होता. तानाजी मालुसरेंच्या बलिदानामुळे सिंहगड विशेष प्रसिद्ध झाला. आग्रा येथून सुटका झाल्यानंतर शिवरायांनी मोगलांच्या ताब्यात गेलेले किल्ले परत मिळविण्यास सुरुवात केली होती. जिजाबाईंची कोंढाणा परत स्वराज्यात यावा ही इच्छा शिवरायांनी पूर्ण करण्याचा चंग बांधला होता. त्यावेळी तानाजी मालुसरेंच्या रायबा या मुलाचे लग्न असल्याने हा मनसुबा शिवरायांनी त्यांच्यापासून लपवून ठेवला.
परंतु तानाजींना ज्यावेळी हे समजले त्यावेळी त्यांनी मुलाचे लग्न बाजूला ठेऊन शिवरायांना कोंढाणा परत स्वराज्यात आणून देण्याचे वचन दिले. आणि वचनाला जागत आपल्या प्राणांची आहुती देऊन कोंढाणा स्वराज्यात परत आणला. तानाजी मालुसरे यांना वीरमरण आल्यानंतर त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामांनी देखील प्राण पणाला लावत कोंढाण्यावर भगवा फडकवला.
4 फेब्रुवारी 1670 च्या रात्री हे युद्ध झाले होते, महाराजांना ज्यावेळी गड जिंकल्याची आणि तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्याची वार्ता कानावर गेली त्यावेळी ते बोलले
‘गड आला पण सिंह गेला‘.
काही ऐतिहासिक नोंदींच्या उल्लेखानुसार तानाजी मालुसरेंच्या कामगिरी पश्चात या गडाला सिंहगड हे नाव पडले ही गोष्ट खरी नाही.
कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंच्या मृत्युपूर्वी जवळ-जवळ सात वर्षां आधी दानपत्रात या गडाचा ‘सिंहगड’ असा उल्लेख केल्याचे आढळते. पुढे मोगलांनी ई.स. 1689 ला सिंहगड आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर साधारण चार वर्षांनी विठोजी कारके व नावजी बलकवडे या दोघांनी 1693 च्या सुमारास हा गड पुन्हा एकवार स्वराज्यात आणला.
छत्रपती राजाराम महाराजांचे निधन याच सिंहगडावर झाले, या ठिकाणी त्यांची समाधी देखील आहे. ई.स. 1703 ला मुगलांनी पुन्हा यावर सत्ता काबीज केली. खुद्द औरंगजेबाने जेंव्हा हा गड पाहीला तेंव्हा त्याने या किल्ल्याचे नाव ‘बक्षिंदाबक्ष’ (देवाची भेट) असे ठेवल्याचे इतिहास सांगतो. मराठ्यांच्या ताब्यात हा गड पुन्हा ई.स. 1705 ला आला. मात्र त्यानंतर तो 1818 साली इंग्रजांच्या ताब्यात गेल्याची नोंद आहे.
सिंहगडावर काय पहाल – Places to Visit Near Sinhagad
- दारूचे कोठार
- टिळक बंगला
- कल्याण दरवाजा
- तानाजी कडा
- राजाराम महाराजांचे स्मारक
- देवटाके
- कोंढाणेश्वर मंदिर
- उदेभांनचे स्मारक
- तानाजी मालुसरेंचे स्मारक
सिंहगडावर कसे जावे – How to reach Sinhagad Fort
हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून ट्रेकिंगकरता उत्तम ठिकाण आहे. याची चढाई देखील सोपी-सुलभ आहे. आज हा गड पहायला येणाऱ्यांसाठी रस्ता तयार करण्यात आला असून खाजगी वाहनाने थेट सिंहगडावर पोहोचता येतं. पायी जाण्याची इच्छा असल्यास पुण्यातील स्वारगेट येथून बसेस निघतात, बसने हातकर वाडी येथे पोहोचल्या नंतर मळलेल्या पाऊल वाटेने साधारण दीड दोन तासात आपण सिंहगडावर पोहोचतो.
सिंहगडावर राहण्याची सोय- Hotels on Sinhagad Fort
सिंहगडावर राहण्याची सोय नाही. परंतु खाण्यापिण्यासाठी गडावर अनेक छोटी-छोटी हॉटेल्स आहेत.
सिंहगडावर पाण्याची सोय – Water on Sinhagad Fort
गडावर देवटाके असून त्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे.