Shani Dev Aarti
आपल्या पौराणिक धर्म ग्रंथांत शनि महाराज यांचा कर्म आणि न्याय देवता असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. शनि महाराज यांची कृपादृष्टी मानवा प्रमाणे देवी देवतांनवर सुद्धा असल्याने त्यांना अनन्य साधारण महत्व देण्यात आलं आहे.
तसचं, शनि महाराज यांच्या बद्दल लोकांची अशी मान्यता आहे की, शनिवारी आपण त्यांची आराधना केल्यास आपल्यावर येत असलेली संकटे नाहीसे होतात. म्हणून भाविक दर शनिवारी शनि मंदिरात शनि देवाची उपासना करण्यासाठी मोठ्या संख्येने जात असतात.
शनि महाराजांना तेल, उडीद आणि रुईच्या फुलाचा हार अर्पण करून त्यांची मनोभावे पूजा करीत असतात. तसचं, शनि मंत्राचा जप केल्यानंतर त्यांची आरती केली जाते. मंदिरात पठन करण्यात येत असलेल्या शनि महाराज यांच्या आरतीला विशेष असे महत्व असून आपण नियमित त्यांचे पठन केले पाहिजे.
मित्रांनो, आज आम्ही देखील या लेखाच्या माध्यमातून शनि महाराज यांच्या आरतीचे लिखाण केलं आहे. तरी आपण या लेखाचे महत्व समजून घेऊन नियमित आरतीचे पठन करावे.
शनि देव आरती – Shani Dev Aarti Marathi
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||
सुर्यसुता शनिमूर्ती | तुझी अगाध कीर्ति
एकमुखे काय वर्णू | शेषा न चले स्फुर्ती || जय || १ ||
नवग्रहांमाजी श्रेष्ठ | पराक्रम थोर तुझा
ज्यावरी कृपा करिसी | होय रंकाचा राजा || जय || २ ||
विक्रमासारिखा हो | शककरता पुण्यराशी
गर्व धरिता शिक्षा केली | बहु छळीयेले त्यासी || जय || ३ ||
शंकराच्या वरदाने | गर्व रावणाने केला
साडेसाती येता त्यासी | समूळ नाशासी नेला || जय || ४ ||
प्रत्यक्ष गुरुनाथ | चमत्कार दावियेला
नेऊनि शुळापाशी | पुन्हा सन्मान केला || जय || ५ ||
ऐसे गुण किती गाऊ | धणी न पुरे गातां
कृपा करि दिनांवरी | महाराजा समर्था || जय || ६ ||
दोन्ही कर जोडनियां | रुक्मालीन सदा पायी
प्रसाद हाची मागे | उदय काळ सौख्यदावी || जय || ७ ||
जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळीतो | मनोभावे करुनी सेवा ||
शनि महाराज यांच्या बद्दल पौराणिक कथा – Shani Dev Story
शनि महाराज यांची महिमा फार थोर असून भाविकांच्या कर्मानुसार ते त्यांना न्यायदान करीत असतात. तसचं, त्यांच्या जन्माबद्दल पुराणांमध्ये अनेक दंत कथा प्रचलित आहेत. त्यानुसार, शनि महाराज हे सूर्य देव आणि देवी छाया यांचे पुत्र आहेत.
शनि महाराज यांच्या रंगाबद्दल आणि त्यांच्या अंगी असलेल्या महान शक्तीबद्दल सांगण्यात येते की, देवी छाया यांच्या गर्भात शनि देव असतांना त्यांनी भगवान शिव यांची आराधना केली होती. महादेवाची आराधना करण्यात देवी छाया इतक्या मग्न झाल्या की त्यांना आपल्या गर्भात बाळ असल्याची जाणीव राहिली नाही.
तहान भूक विसरून त्या आपल्या भक्तीत ध्यानिस्त झाल्या होत्या. परिणामी शनि महाराज यांचा रंग सावळा झाला. याचप्रमाणे शनि देव यांना आपले पिता सूर्य देव यांचा तिरस्कार करण्यामागे अशी मान्यता आहे की, शनि देवाचा रंग पाहून सूर्य देव यांनी देवी छायाला हे मुल आपले नसल्याचे सुनावले.
परिणामी शनि देव आणि त्यांची आई खूप दुखी झाल्या. शनि महाराज यांना आपल्या पितांचा तिरस्कार वाटू लागला. परिणामी त्यांनी आपल्या आईच्या म्हण्यानुसार वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी भगवान शिव यांची कठोर तपस्या केली.
शनि महाराज यांची कठोर तपस्या पाहून महादेव त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी शनि देवाला वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा शनि देवाने आपल्या आईवर आणि आपल्यावर झालेला अन्याय महादेवाला सांगितला.
शिवाय, शनि देवाने महादेवाला वर मागितला की मला पिता सूर्य देव यांच्यापेक्षा जास्त शक्ती प्रदान करा. भगवान शंकर यांनी शनि महाराज यांना आशीर्वाद देऊन त्यांना नऊ ग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ ग्रह म्हणून स्थान दिले. म्हणून मानवाप्रमाणे देवतांना देखील शनि महराज यांच्याबाबत भीती वाटते.
मित्रांनो, ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचे आपल्या जीवनांत विशेष महत्व आहे. आपल्या जीवनांत घडत असलेल्या सर्व गोष्टी ग्रहांवर अवलंबून असल्याचे ज्योतिष शास्त्री सांगत असतात. शनि महाराज यांना सर्व नऊ ग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ स्थान असल्याने त्यांची आराधना करणे सर्वात महत्वाचे असते.
आपण पाहत असतो की, कुठल्याही ज्योतिषाकडे गेल्यास ते आपणास ग्रह शांती करण्यास सांगत असतात. तसचं, ग्रह दोष असल्याचे सांगत असतात. म्हणून मित्रांनो आपण नियमित ग्रहांचे देवता असलेल्या भगवान शनि देव यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची नियमित आराधना केली पाहिजे.
शनि अमावास्या या दिवशी शनि मंदिरात शनि देवाची उपासना करण्यासाठी विशेष पूजेचे आयोजन करण्यात येत असते.
तसचं, गरजू व्यक्ती तसेच गरिबांना प्रसाद म्हणून विविध अन्न पदार्थांचा वाटप देखील केला जातो. असे करण्यामागे लोकांची अशी धारणा आहे की, शनि महाराज प्रसन्न होतील आणि आपल्यावर असलेल्या ग्रहांचा प्रकोप कमी करतील. मित्रांनो, वरील लेखाचे महत्व समजून आपण सुद्धा शनि आरतीचे पठन करावे ही विनंती.