Satyapal Maharaj Information in Marathi
संत गाडगे बाबा आणि संत तुकडोजी महाराज यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाला समर्पित करून समाजात पसरलेल्या अनिष्ट रुढीपरंपरांना मूठमाती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला शिवाय ग्रामीण आणि अशिक्षित लोकांच्या डोक्यात अगदी घट्ट चिकटलेल्या अंधश्रद्धा, भानामती, जादूटोणा, बुवाबाजी, यासारख्या विचारांपासून त्यांना जागृत करण्याचे कार्य देखील केले.
संत गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांनंतर हे कार्य बंद झाले की काय असे देखील आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटून गेले असावे. पण असे नाही समाजात आज देखील अशी व्यक्तिमत्व आहेत जी आपण समाजाचे काही देणे लागतो या विचाराने प्रेरित होऊन आपल्या आसपास कार्य करत आहेत. आणि असंच एक व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात वास्तव्याला असलेले सामाजिक प्रबोधनकार सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज..!!
सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज – Satyapal Maharaj Chincholikar Information in Marathi
सत्यपाल महाराज यांचा अल्प परिचय – Satyapal Maharaj Biography in Marathi
पूर्ण नाव (Full Name) | सत्यपाल विश्वनाथ चिंचोलीकर |
जन्म (Birth Date) | 1952 शिरसोली जिल्हा अकोला |
जन्मस्थान (Birth Place) | निवास- अकोट जिल्हा-अकोला (महाराष्ट्र) |
व्यवसाय (Business) | आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणे |
वडील (Father Name) | विश्वनाथ चिंचोलीकर |
आई (Mother Name) | सुशीला चिंचोलीकर |
पत्नी (Wife) | सुनंदा चिंचोलीकर |
सत्यपाल महाराज यांच्या विषयी माहिती – Satyapal Maharaj Marathi Mahiti
सामाजिक प्रबोधनकार सत्यपाल महाराजांकडे आज आधुनिक युगातील समाजसुधारक म्हणून पाहिलं जातं. आज समाजात जी अनागोंदी माजली आहे त्याकडे लोकांचे लक्ष वेधून सत्यपाल महाराज त्यांना वर्तमानातील सत्याशी अवगत करण्याचे कार्य करत आहेत. अनिष्ट रूढी परंपरांवर महाराज मार्मिक टीका देखील करतात त्यामुळे कीर्तनात बसलेल्या व्यक्तीला आपल्या चुकीची जाणीव होते आणि त्याच्या विचारांमध्ये देखील बदल होण्यास मदत होते.
सत्यपाल महाराज आधुनिक युगात प्रबोधनाचे उत्तम कार्य करीत आहेत. दाखले देत देत, विनोदी शैली हाताळून ऐकणाऱ्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे कसब त्यांना अवगत झाले आहे. त्यांच्या कीर्तनाला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित असतो. विशेषतः ग्रामीण भागात राहिल्याने महाराजांना समाजाची जणू नस गवसली आहे..! काय सांगितल्याने आणि कश्या पद्धतीने मनोरंजन करून प्रबोधन करता येईल याची सत्यपाल महाराजांना जाणीव आहे आणि त्यामुळेच त्यांच्या कीर्तनाला विशेष गर्दी होते.
आजपर्यंत महाराजांनी 14,000 पेक्षा जास्त गावांमध्ये समाज प्रबोधनाची कीर्तनं केली आहेत. त्यांच्या कीर्तनाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील प्रसिद्ध असलेले वाद्य ‘खंजेरी’ महाराज आपल्या कीर्तनात 7 खंजेरी एकत्र करून विविध प्रकारे आवाज काढतात त्यामुळे त्यांची ‘सप्तखंजेरी’ खूप प्रसिद्ध झाली आहे.
संत गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराज हे सत्यपाल महाराजांचे आदर्श आहेत. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून महाराज ज्या ठिकाणी कीर्तन करायचे असेल त्या ठिकाणी स्वतः स्वच्छता आणि साफसफाई करायला देखील मागेपुढे पाहत नाही. सत्यपाल महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून जातीभेद, अंधश्रद्धा, स्त्रीभ्रूणहत्या, व्यसनमुक्ती, घनकचरा व्यवस्थापन, हागणदरी मुक्त गाव, शिक्षणाचे महत्वं, या विषयांवर सामाजिक प्रबोधन केले आहे.
विदर्भात त्यांचा मोठा चाहता वर्ग असून विदर्भातल्या जवळपास सर्वच ठिकाणी आजवर त्यांचे कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सत्यपाल महाराज म्हणतात की समाजाचे प्रबोधन करतांना आध्यात्मिकतेची जोड देऊन सोबत संगीताची साथ असेल तर तो विषय ऐकणाऱ्याच्या मना पर्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने पोहोचतो आणि समाजात जाणीव जागृती उभी रहाते. सत्यपाल महाराज श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक म्हणून देखील कार्यरत आहेत.
तुकडोजी महाराजांच्या विचाराने ते प्रेरित असल्यामुळे आज गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य दूरवर पोहोचवण्यासाठी ते सतत कार्यमग्न असतात. एकदा वर्धा जिल्ह्यात सत्यपाल महाराजांचे कीर्तन सुरु होते. त्याच वेळी अकोट या त्यांच्या गावी आईचे निधन झाल्याचा निरोप आला, पण महाराजांनी कीर्तन अर्धवट सोडले नाही. आणि आईची ईच्छा लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आईचा देह दान करण्याचा निरोप नातेवाईकां पर्यंत पोहोचवला.
या घटने नंतर सत्यपाल महाराजांनी केस देखील काढले नाहीत आणि तेरवीच्या कार्यक्रमाला देखील फाटा दिला आणि गरजूंना अन्नदान केले. यावरून महाराजांनी केवळ समाज प्रबोधन करून समाजात आधुनिक विचारांचा प्रसार-प्रचार केला असे नव्हे तर ते विचार त्यांनी स्वतः देखील आत्मसात केले आहे हे आपल्या लक्षात येते.
भारतात जी परिवर्तनाची चळवळ उभी राहीली त्यात बहुजन समाजातील संतांनी आपले अमूल्य असे योगदान दिले. आणि हे योगदान समाजापर्यंत पोहोचावे या उद्देशाने 2011 साली 21 आणि 22 मे रोजी पुणे येथे अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या वेळी या संमेलनाचे उद्घाटन त्यावेळचे बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा बहुमान सत्यपाल महाराजांना मिळाला होता.
सत्यपाल महाराजांना मिळालेले पुरस्कार – Satyapal Maharaj Award
- महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार
- समाज प्रबोधनकार पुरस्कार
- मराठा विश्वभूषण पुरस्कार
- प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार
- आम्ही सारे फाउंडेशन पुरस्कार