Sant Ramdas Information in Marathi
सुमारे 350 वर्षांपूर्वी मनुष्य जातीची दीनवाणी अवस्था पाहून तळमळीने स्वधर्म-स्वदेश-आणि स्वदेव याची मुहूर्तमेढ रोवून रसातळाला गेलेले आणि उध्वस्त होणारे अनेक संसार-प्रपंच पुन्हा स्थिर करण्याकरता झटलेले समर्थ रामदास स्वामी.
महाराष्ट्र भूमीत संत तुकारामांच्या समकालीन समर्थ रामदासांनी अज्ञान कुकर्म-कुविचार-कुसंग यांचा अंतकरण-मन-बुद्धी-चित्त यावरचा पगडा झुगारून रंजल्या गांजल्यांना जवळ करण्याचे, त्यांना धीर देण्याचे, त्यांचा कमकुवत झालेला आत्मविश्वास उभा करण्याचे कार्य निष्काम भूमिकेतून अखंडपणे केले त्यांच्या या परिश्रमामुळे आज सत्कर्म-सद्विचार- सुख-समाधान घरोघरी नांदत आहे.
महान संत श्री समर्थ रामदास स्वामी यांची जीवन कथा – Samarth Ramdas Swami Information in Marathi
समर्थ रामदास स्वामी यांची संक्षिप्त माहिती – Sant Ramdas Information in Marathi
नाव (Name) | नारायण सूर्याजीपंत ठोसर |
जन्म (Birthday) | 24 मार्च 1608 (चैत्र शु. 9 शके 1530) |
गाव | जांब जिल्हा जालना महाराष्ट्र |
वडील (Father Name) | सूर्याजीपंत ठोसर |
आई (Mother Name) | राणूबाई सूर्याजीपंत ठोसर |
साहित्यरचना (Books) | दासबोध, मनाचे श्लोक, आरती… |
संप्रदाय | समर्थ संप्रदाय |
वचन | जयजय रघुवीर समर्थ |
समर्थांचे कार्य | जनजागृती, 11 मारुतींच्या स्थापना, भक्ती आणि शक्तीचा प्रसार मठांची व समर्थ संप्रदायाची स्थापना. |
निर्वाण | 13 जानेवारी 1681 (माघ कृ. 9 शके 1603)सज्जनगड जिल्हा सातारा महाराष्ट्र |
समर्थ रामदास स्वामी यांचा परिचय – Samarth Ramdas Swami History in Marathi
“जयजय रघुवीर समर्थ”
हा नामघोष करीत मनुष्याच्या अंतकरणात सद्विचारांची बीजं पेरणारे समर्थ रामदास त्यांच्या दासबोध आणि मनाचे श्लोक या आणि इतर ग्रंथ रूपांनी या जगात निरंतर वास करीत आहेत. देह त्यागण्यापूर्वी त्यांनी तसे आपल्या शिष्यांना सांगितले देखील होते की मी माझ्या ग्रंथ रूपाने या भूतलावर निरंतर वास करून राहील.
आज प्रत्येक घरात गणेशाची आराधना करतांना “सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची” ही आरती म्हंटल्या जाते. ही रचना समर्थ रामदासांचीच आहे. आपण म्हणत असलेल्या कित्येक आरत्या (आरतीची शेवटची ओळ लक्षात घेतली तर) या समर्थांनीच रचल्याचे आपल्या लक्षात येईल. समर्थांचे “मनाचे श्लोक” हे मनुष्याच्या मनाला उद्देशून केले असून त्याचा सूक्ष्म विचार केल्यास मनुष्य स्वतःला अंतर्बाह्य बदलू शकतो…
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे
अति स्वार्थबुद्धी न रे पाप सांचे
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे
न होता मनासारिखे दुःख मोठे
1608 साली रामनवमीच्या दिवशी दुपारी बाराच्या सुमारास समर्थ रामदासांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या गावी झाला. सूर्याजीपंत आणि राणूबाई हे त्यांचे आईवडील. गंगाधर नावाचा त्यांना एक मोठा भाऊ होता. समर्थांचे मूळ नाव नारायण, बालपणापासून नारायण विरक्त आणि आध्यात्मिक गुणांचा होता. एकदा लपून बसला असतांना काही केल्या सापडेना, शेवटी फडताळात आईने शोधल्यावर सापडला. आईनी विचारलं काय करीत होतास त्यावर नारायणाने “आई, चिंता करितो विश्वाची” असं उत्तर दिलं.
आईला वाटायचं की लग्न करून दिल्यावर त्याचं मन संसारात रमेल, वयाच्या 12 व्या वर्षी नारायणाच्या लग्नाचा घाट घालण्यात आला, बोहल्यावर असतांना ब्राम्हणाच्या तोंडून “सावधान” हा शब्द ऐकताच ते बोहल्यावरून पळून गेले. नाशिकच्या पंचवटी भागात त्यांनी वास्तव्य केलं, कुणी ओळखू नये म्हणून रामदास (समर्थ) हे नाव धारण केले. आपल्या उद्धव या शिष्याकरता येथे त्यांनी गोमयाची (शेण) मारुतीची मूर्ती तयार करून हनुमान जयंतीच्या दिवशी त्या मूर्तीची स्थापना केली.
आज देखील नाशिक येथील टाकळी भागात समर्थांनी स्थापिलेल्या या मूर्तीचे दर्शन आपल्याला घडते. मारुती ही शक्तीची आणि बुद्धीची देवता असून तिची उपासना केली जावी असा समर्थांचा त्यामागचा उद्देश होता. या ठिकाणी गोदावरीच्या पात्रात “श्रीराम जयराम जय जय राम” या नामाचा 13 कोटी जप समर्थांनी पूर्ण केला. गायत्री मंत्राचा जप, रोज 1200 सूर्यनमस्कार करून समर्थांच्या शारीरिक आणि मानसिक शक्तीचा विकास झाला. दररोज पाच घरी भिक्षा मागून समर्थ त्याचा नैवैद्य रामाला दाखवीत, त्यातील काही भाग पशु-पक्ष्यांना देऊन उरलेले अन्न स्वतः ग्रहण करीत असत.
एकदा समर्थांना खीर खायची तीव्र इच्छा झाली. ती खाल्ल्यानंतर समर्थांना आपल्या जिभेच्या चोचल्यांची अत्यंत घृणा वाटली, आणि खाण्याच्या वासनेला जिंकण्यासाठी त्यांनी उलटी करून पुन्हा ती भक्षण केली. समर्थांनी आपल्या वासनेवर अश्या तऱ्हेने अंकुश मिळविला. समर्थ रामदासांनी 12 वर्ष कठोर उपासनेत व्यतीत केली. वयाच्या 24 व्या वर्षी त्यांना आत्मसाक्षात्कार झाल्याचे म्हंटले जाते. कठोर तपश्चर्येनंतर समर्थ रामदासांनी 12 वर्ष भारत भ्रमण केलं.
अवघा हिंदुस्तान ते फिरले, संपूर्ण भारताचे आणि तेथील लोकस्थितीचे निरीक्षण केले. या भारतभ्रमणा दरम्यान ते हिमालयात गेले. त्याठिकाणी त्यांना प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडले, आपल्या देहाबद्दलची त्यांची आसक्ती नाहीशी झाली. त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. भारत भ्रमण करत असतांना समर्थ रामदास स्वामी आणि शिखांचे सहावे गुरु हरगोविंद यांची भेट झाली. समर्थांनी त्यांच्या समवेत अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात दोन महिने वास्तव्य केलं.
भारत भ्रमणाच्या अखेरीस समर्थ 36 व्या वर्षी महाराष्ट्रात परतले. पैठणला ते एकनाथांच्या वाड्यात उतरले. त्याठिकाणी संत एकनाथ आणि त्यांच्या पत्नीने देह ठेवला होता. एकनाथांची पत्नी समर्थ रामदास स्वामींची मावशी होती, पण समर्थांनी कुणाला ओळख दिली नाही. आपल्या जांब गावातील घडामोडी त्यांना समजल्या, गावातून निघाल्यानंतर त्यांचा कुणाशीच संपर्क नव्हता. आई अंध झाल्याचे समजल्यामुळे ते जांब येथे गेले आईला भेटले.
राणूबाईंना खूप आनंद झाला. साधनेमुळे समर्थांना काही दिव्यशक्ती प्राप्त झाल्या होत्या, असं म्हणतात की प्रभू रामचंद्रांना स्मरून त्यांनी आईच्या डोळ्यांवरून हात फिरवताच राणूबाईंना दिसू लागले होते.
छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदास स्वामींचे शिष्य होते. स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी समर्थांनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केल्याचे पुरावे आढळतात. महाराजांनी समर्थांना काही गावे इनाम म्हणून देखील लिहून दिल्याचे पुरावे आहेत.
समर्थांनी 11 मारुतींची स्थापना केली – 11 Maruti Mandir
- दास मारुती चाफळ
- वीर मारुती चाफळ
- खडीचा मारुती शिंगणवाडी चाफळ
- प्रताप मारुती माजगाव चाफळ
- उंब्रज मारुती ता. कराड
- शहापूर मारुती उंब्रज
- मसूर मारुती ता. कराड
- बहेबोरगाव मारुती जिल्हा सांगली
- शिराळा मारुती बत्तीस शिराळा जिल्हा. सांगली
- मनपाडळे मारुती जिल्हा. कोल्हापूर
- पारगांव मारुती जिल्हा. कोल्हापूर
समर्थांच्या हातून स्थापन झालेले मठ येथे आहेत – Ramdas Swami Math
- जांब
- चाफळ
- सज्जनगड
- डोमगांव
- शिरगांव
- कन्हेरी
- दादेगांव
समर्थ रामदास स्वामी यांचा मृत्यु – Samarth Ramdas Swami Death
समर्थांनी सज्जनगडावर देह ठेवण्यापूर्वी पंधरा दिवस आधी आपल्या शिष्यांना पूर्वकल्पना दिली होती. माघ वद्य नवमीला समर्थ रामदास स्वामींनी तीनदा मोठ्याने रामनामाचा उच्चार केला आणि देह ठेवला. तेंव्हापासून माघ वद्य नवमी ‘दासनवमी‘ म्हणून ओळखली जाते. समर्थांच्या अंत्यसंस्कारास मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला होता.
या समयी स्वतः छत्रपती संभाजी महाराज देखील जातीने हजर होते. समर्थांची समाधी आणि त्यावर राम सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तींची स्थापना असे मंदिर संभाजी महाराजांनी बांधलेले आहे. समर्थ रामदास स्वामींची समाधी आज देखील सज्जनगडावर असून त्यांच्या संजीवन समाधीची प्रचीती भाविकांना आज देखील येत असते.
समर्थांच्या समाधीवरील श्लोक – Ramdas Swami Shlok
सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मांदार शृंगापरी
नामे सज्जन जो नृपे वसविला श्रीउरशीचे तीरी
साकेताधीपती कपि भगवती हे देव ज्याचे शिरी
तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी