Sant Namdev Information in Marathi
आपल्या महाराष्ट्र भूमीला संतांची पवित्र भूमी म्हंटल्या जातं. थोर संतांची परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे. या संतांनी जातिभेदाच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला नवी दिशा दाखवण्याचं अमुल्य कार्य केलं. या संतांच्या मांदियाळीतील एक प्रमुख नाव म्हणजे संत शिरोमणी नामदेव महाराजांचं.
भक्तशिरोमणी नामदेव महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कालखंडातील. नामवेदाचे आणि नामविद्येचे आद्य प्रणेते नामदेव महाराज वारकरी संप्रदायाचे थोर प्रचारक होते. संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर त्यांच्या पश्चात नामदेव महाराजांनी सुमारे 50 वर्ष भागवतधर्माचा प्रचार केला. कठीण परिस्थितीत त्यांनी महाराष्ट्राची भावनिक एकात्मता सांभाळण्याचं मोलाचं कार्य केलं.
वारकरी संप्रदायाचे थोर प्रचारक संत नामदेव महाराज- Sant Namdev Information in Marathi
संत नामदेव यांच्या विषयी संक्षिप्त माहिती – Saint Namdev Maharaj Biography in Marathi
नाव | नामदेव रेळेकर |
जन्म | 26 ऑक्टोबर 1270 |
गांव | नरसी नामदेव जि. हिंगोली मराठवाडा |
वडील | दामाशेटी |
आई | गोणाई |
पत्नी | राजाई |
मुलं | नारायण, महादेव, गोविंद, विठ्ठल आणि मुलगी लींबाई |
मृत्यू | 3 जुलै 1350 शनिवार (शके 1272) |
संत नामदेव महाराज यांचा जीवन परिचय – Sant Namdev Maharaj History in Marathi
आपल्या किर्तनामुळे साक्षात पांडुरंगाला डोलायला भाग पाडणारे संत नामदेव महाराज अशी महाराजांची ख्याती होती. विठ्ठलाच्या अगदी जवळचा सखा अशी नामदेवांची कीर्ती. भागवत धर्माचा प्रचार थेट पंजाब पर्यंत करणारे नामदेव महाराज शीख धर्मियांचे देखील श्रद्धास्थान आहेत. आज पंजाबी बांधव संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान असलेल्या ‘नरसी महादेव‘ या गावाचा जिर्णोद्धार करण्याकरता धडपडत आहेत.
नामदेव महाराजांच्या कुटुंबियांचा व्यवसाय हा ‘शिंपी’ होता, त्यांच्या घराण्यात विठ्ठलाच्या भक्तीची परंपरा होती त्यामुळे नामदेवांना देखील विठ्ठल भक्तीची ओढ लागली. बालपणी वडिलांच्या आज्ञेनुसार नामदेव विठ्ठलाला नैवैद्य घेऊन देवळात गेले, परंतु बराच वेळ झाला तरी विठ्ठल नैवैद्य खात नाही हे बघून त्याच्या चरणावर डोके आपटून प्राण द्यायला निघालेल्या नामदेवाची भक्ती पाहून प्रत्यक्षरुपात विठ्ठलाने आनंदाने नैवैद्य खाल्ल्याची आख्यायिका सांगितली जाते.
राजाईशी विवाह झाल्या नंतर नामदेवांना चार मुलं आणि एक कन्या झाली. विठ्ठलाच्या भक्तीत रममाण झालेल्या नामदेवांची संसाराची ओढ हळूहळू कमी होत गेली आणि ते विरक्त होत गेले. नामदेवांचे कुटुंब मोठे होते, त्यांनी परिवाराची जवाबदारी घ्यावी असे त्यांच्या आईवडिलांना वाटे त्यामुळे त्यांच्या विठ्ठलभक्तीला घरातून विरोध होऊ लागला परंतु नामदेव परमार्थाच्या मार्गावरून माघारी फिरले नाहीत पुढे त्यांचे अवघे कुटुंबच भक्तीमार्गाशी एकरूप झाले.
1291 मधे संत नामदेवांची आणि संत ज्ञानेश्वरांची भेट झाली. या भेटीनंतर आपली भक्ती गुरूंचा उपदेश मिळाल्याशिवाय अपूर्ण असल्याची त्यांना जाणीव झाली व त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचर यांचे शिष्यत्व मिळविले.
असं म्हणतात की जेंव्हा नामदेव महाराज विसोबा खेचर यांना भेटायला गेले तेंव्हा विसोबा महादेवाच्या मंदिरात शिवलिंगावर पाय ठेऊन निजले होते, ते पहाता नामदेवांना त्यांचा राग आला आणि ते विसोबा खेचर यांना बोलले, त्यावर विसोबा इतकंच म्हणाले की “जेथे भगवंत नाही त्याठिकाणी माझे पाय उचलून ठेव” त्याक्षणी नामदेवांना बोध झाला की परमेश्वर नाही अशी एकही जागा नाही… त्यांचा अहंकार गळून पडला आणि ते गुरूंना शरण गेले.
पुढे संत ज्ञानेश्वरांनी तीर्थाटन करण्याची इच्छा व्यक्त केली, संत नामदेवांचे तर ‘सर्वसुख आहे मज पांडुरंगी’ असेच जीवनाचे ध्येय असल्याने त्यांना या तीर्थाटनास जाण्यात सुख वाटत नव्हते परंतु ज्ञानेश्वरांच्या मनाला बरे वाटावे म्हणून ते निघाले.
अनेक संतांचा या तीर्थाटनात सहभाग होता. मार्गातील अनेक तीर्थस्थळांना भेटी दिल्या गेल्या, तीर्थक्षेत्रावरून परतल्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी काही काळातच संजीवन समाधी घेतली. समाधीचा तो सोहळा नामदेवांनी प्रत्यक्ष अनुभवला त्यासमयी ते अवघे 26 वर्षांचे होते… वयाची पुढची 54 वर्ष त्यांनी भागवत धर्माचा प्रचार करण्याकरता व्यतीत केली.
“नाचू कीर्तनाचे रंगी…ज्ञानदीप लावू जगी” या भूमिकेशी समरस होत त्यांनी आयुष्य वेचलं.
संत नामदेव महाराजांनी वयाची 80 पार केल्यानंतर इहलोकीची यात्रा संपविण्याचे मनोमन ठरविले. शके 1272 ला पंढरपुरी विठ्ठलाकडे आषाढी एकादशीला त्यांनी आज्ञा देण्याची विनंती केली, आणि विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात आषाढ वद्य त्रयोदशीला (शनिवार 3 जुलै 1350) नामदेव महाराजांनी समाधी घेतली.
संत नामदेव महाराजांची इच्छा होती की विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या संतसज्जनांची पायधूळ माझ्या मस्तकी लागावी. त्यांच्या या इच्छेनुसार विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराच्या पायरीखाली नामदेव महाराजांची समाधी बांधण्यात आली… आज आपण नामदेवाची पायरी म्हणून आवर्जून त्याठिकाणी नतमस्तक होतो. विठ्ठलाच्या मंदिरी ‘पायरीचा दगड‘ होण्यात नामदेवांनी धन्यता मानली.
संत नामदेव महाराजांची सुमारे 2500 अभंगांची अभंगगाथा प्रसिद्ध आहे…
त्यांच्या काही अभंग रचना हिंदी भाषेत देखील आढळतात, त्यात साधारण 125 पदं पहायला मिळतात. त्यातील साधारण 62 अभंग शिख धर्मियांच्या पवित्र अश्या गुरु ग्रंथ साहेबमधे समाविष्ट आहेत.
लक्ष्य दया: तुमच्या जवळ संत नामदेव बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्