Sant Dnyaneshwar Information in Marathi
आता विश्वात्मके देवें ! येणे वाग्यज्ञे तोषावे !
तोषोनि मज द्यावे ! पसायदान हे !!
जे खळांची व्यंकटी सांडो ! तया सत्कर्मी रति वाढो !!
भूतां परस्परें जडों ! मैत्र जीवाचे !!
अखिल विश्वाच्या कल्याणाची कामना परमेश्वरा जवळ करणारे संत ज्ञानेश्वर या महाराष्ट्रात जन्माला आले हे मराठी माणसाचं केवढं अहोभाग्य!! 13 व्या शतकातील महान संत आणि वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अवघ्या 21 वर्षांच्या आयुष्यात अखिल विश्वाला जगण्याचा सुखद मार्ग दाखवला आहे. संत ज्ञानेश्वरांविषयी या लेखातून महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन – Sant Dnyaneshwar Information in Marathi
संत ज्ञानेश्वर यांच्या विषयी माहिती – Sant Dnyaneshwar Maharaj Information in Marathi
नाव: | संत ज्ञानेश्वर |
जन्म: | औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळ आपेगांव या गावी |
समाधी: | वयाच्या 21 व्या वर्षी आळंदी इथं इंद्रायणीच्या काठी |
वडील: | विठ्ठलपंत कुलकर्णी |
आई: | रुख्मिणीबाई |
भावंड: | निवृत्तीनाथ हे थोरले बंधू तर सोपानदेव आणि मुक्ताबाई ही धाकटी भावंडे |
संत ज्ञानेश्वरांविषयी माहिती – Sant Gyaneshwar Mahiti in Marathi
संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी गृहस्थाश्रमाचा त्याग केला आणि सन्यासाश्रम स्वीकारला, परंतु गुरूंची आज्ञा झाली आणि ते पुन्हा गृहस्थाश्रमात परतले. परंतु त्याकाळी एका सन्याशाने पुन्हा संसारात येणे निषिद्ध मानले जाई, त्यामुळे विठ्ठलपंत आणि रुख्मिणीबाईंना समाजाने वाळीत टाकले. त्या दरम्यान त्यांना चार अपत्य झाली. ती मुलं म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव (संत ज्ञानेश्वर), सोपानदेव आणि मुक्ताबाई.
विठ्ठलपंत आणि रुख्मिणीबाईं त्या काळी समाजाच्या अवहेलनेचा अमानवीय अत्याचार सहन करावा लागला पण ज्यावेळी हे सगळे असह्य झाले तेंव्हा त्या दोघांनी देहत्याग केला. आई वडिलांच्या मृत्युनंतर या लहान मुलांना समाजाकडून अतोनात त्रास सहन करावा लागला, अन्न-पाण्यासारख्या गोष्टी देखील त्यांना मिळू दिल्या जात नव्हत्या, तत्कालीन समाजाने त्यांना वाळीत टाकले, त्या मुलांच्या मुंजी देखील होऊ दिल्या नाहीत.
समाजाने केलेल्या असहनीय अत्याचारांना तोंड देत देत ही मुलं मोठी झाली, अत्याचाराच्या अग्नीत तावून-सुलाखून निघाली. ही चारही मुलं अत्यंत सहनशील, सदाचारी, सद्गुणी आणि सत्यवचनी होती. आपले वडील बंधू निवृत्तीनाथ यांना संत ज्ञानेश्वर आपले गुरु मानतात.
निवृत्तीनाथांच्या आज्ञेनुसार, जनसामान्यांना संस्कृत मधे लिहिलेल्या भगवद्गीतेचा सोप्या सरळ शब्दात बोध व्हावा म्हणून संत ज्ञानेश्वरांनी “ज्ञानेश्वरी” सारखा ज्ञानाने भरलेला ग्रंथ लिहिला… भगवद्गीता हा हिंदू धर्मियांचा धर्मग्रंथ संत ज्ञानेश्वरांच्या पुण्याईमुळे लोकभाषेत आला. ज्ञानदेवांना जसं विश्वरूपाचं दर्शन घडलं तसं त्यांनी ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं आहे.
माझी मऱ्हाठीची बोलू कौतुके…परी अमृतातेही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके…मेळवीन
या शब्दांमध्ये संत ज्ञानेश्वरांनी मराठी विषयीचा अभिमान आणि मराठी भाषेची महती व्यक्त केली आहे. अत्यंत मधुर आणि रसाळ शब्दांमध्ये त्यांनी ज्ञानेश्वरीची रचना केली आहे. पुढे हा ग्रंथ अनेक भाषांमध्ये भाषांतरीत करण्यात आला. ज्ञानेश्वरी या ग्रंथामुळे भारतीय संस्कृती आणि संतवाड:मयाकडे अखिल विश्वाचं लक्ष वेधल्या गेलं.
ज्ञानेश्वरीचं अध्ययन आजही अवघ्या जगात अव्याहत सुरु आहे. संत नामदेवांच्या सोबतीने ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला.त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून आज देखील 700 वर्षानंतर सुद्धा वारकरी संप्रदायाचे अनुयायी आजही महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने भागवत धर्माची पताका फडकवत आहेत…
भक्तियोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरी ग्रंथात एकूण 9000 ओव्या आहेत. ई.स. 1290 मध्ये हा ग्रंथ लिहिला गेल्याचं मानण्यात येतं. “ज्ञानेश्वरी” हा ग्रंथ लिहिल्यानंतर ज्ञानदेवांनी अमृतानुभव लिहिण्यास घेतला आणि तो लिहून झाल्यानंतर इंद्रायणीच्या काठी आळंदी इथं संजीवन समाधी घेतली. ज्ञानेश्वर महाराज त्यावेळी अवघ्या 22 वर्षांचे होते.
ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ज्ञानदेवांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा विषद केली आहे ती याप्रमाणे…
आदिनाथ > मत्स्येंद्रनाथ > गोरक्षनाथ > गहिनीनाथ > निवृत्तीनाथ > ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले ग्रंथ – Dnyaneshwar Granth
- भावार्थदीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी (या ग्रंथाची अखेर ज्ञानदेवांनी ‘पसायदानाने’ केली आहे) (Dnyaneshwari)
- चांगदेव पासष्टी (Changdev Pasashti)
- अमृतानुभव (Amrutanubhav)
- शेकडो मराठी अभंग (Marathi Abhang)
- ज्ञानेश्वर हरिपाठ (Dnyaneshwar Haripath)
- स्फुटकाव्य
‘संत ज्ञानेश्वर’ वर आधारीत चित्रपट – Sant Dnyaneshwar Movies
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा ‘संत ज्ञानेश्वर‘ नावाचा चित्रपट 18 मे 1940 साली पुणे इथं प्रकाशित झाला. तब्बल 36 आठवडे हा चित्रपट चालला. प्रभात फिल्म कंपनीने हा चित्रपट काढला होता.
पुढे हिंदी चित्रपट सृष्टीत संत ज्ञानेश्वरांवर आधारीत चित्रपट 1964 साली तयार झाला. त्या चित्रपटातील “ज्योत सें ज्योत जगाते चलो…प्रेम की गंगा बहाते चलो” हे गीत आज देखील अत्यंत लोकप्रिय आहे.
लक्ष्य दया: तुमच्या जवळ संत ज्ञानेश्वर बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्