Republic Day Bhashan
सुप्रभात.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आपले मुख्याध्यापक / मुख्याध्यापिका, आदरणीय शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो.
नमस्कार, माझे नाव………………………. मी इयत्ता…….. मध्ये शिकतो. आज मी आपल्या समोर २६ जानेवारी, म्हणजेच प्रजासत्ताक दिन निमित्त माझे मनोगत व्यक्त करणार आहे. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रजासत्ताक दिन निमित्त भाषण – Republic Day Speech in Marathi
आज स्वतंत्र भारताचा……… व प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमित्त आपण सर्व येथे उपस्थित झालो आहोत. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले. परंतु २६ जानेवारी १९५० रोजी पासून हे संविधान अंमलात आले. म्हणजे या दिवशी आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला. म्हणून २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो.
आता प्रजासत्ताक म्हणजे नेमके काय? तर याचा अर्थ असतो कि लोकांचे, लोकांनी, लोकांकरिता चालवीत असलेले राज्य. प्रजासत्ताक देश म्हणजे असा देश कि ज्याचा मध्यबिंदू हा देशातील लोक असतात. या देशातील राष्ट्रप्रमुख किंवा पदाधिकारी हे सर्व जनतेमधून निवडणुकीद्वारे निवडले जातात. देशावर कुण्याही एका व्यक्ती किंवा घराण्याचे शासन नसून देशातील नागरिक तो देश चालवीत असतात.
नसे फक्त पुस्तक, हा भारतीय धर्मग्रंथच,
समृद्ध संविधान बनले देशाचे सुज्ञ पालक,
गुलामगिरी संपली, झाले गणराज्य,
सत्ताधारी बनले चालक जनता झाली मालक
आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवत आहोत यासाठी कितीतरी देशभक्तांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. आपल्याला हे स्वातंत्र्य एवढ्या सहजासहजी मिळालेले नसून यामागे शेकडो वर्षांचा स्वातंत्र्याचा लढा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कितीतरी स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या संसाराची राखरांगोळी केली आहे. मंगल पांडे, भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू, मदनलाल धिंग्रा असे कितीतरी देशभक्तांनी स्वतः च्या प्राणांची आहुती या स्वातंत्र्य युद्धात दिलेली आहे.
असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी,
अनेकांनी केले बलिदान.
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारत मातेचे गुणगान
अखेर जवळपास १५० वर्षांनी ब्रिटीशांच्या जोखडातून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. आता हा देश कुणाच्याही गुलामगिरीत नव्हता. मग या देशाचा कारभार चालविण्यासाठी आपल्याला संविधानाची गरज होती. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी हे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वारे तयार करून स्वीकारण्यात आले. परंतु २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर येथे पार पडलेल्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. म्हणून राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी २६ जानेवारी हा दिवस निवडण्यात आला होता.
आजही आपले भारतीय जवान आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देत आहेत. आज आपण सुरक्षित आहोत ते फक्त आणि फक्त आपल्या जवानांमुळे. आजही भारतावर कोणत्याही प्रकारची संकटे आली मग ती परकीय आक्रमण असो किंवा नैसर्गिक आपत्ती, यामध्ये सर्वात पुढे आपले जवान असतात.
जिक्र जब असली हिरो का होता है,
तो जुबां पर नाम देश के वीरो का होता है.
देशातील प्रत्येक जवानाला व त्यांच्या कर्तुत्वाला माझे शतशः नमन.
या दिवशी भारतीय राजधानी नवी दिल्ली येथे लालकिल्ल्यावर सकाळी मा. पंतप्रधान यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडतो. नंतर संपूर्ण देशाला ते संबोधन करतात. यावेळी देशातील सर्व गणमान्य पाहुणे हजर असतात. मुख्य अतिथी म्हणून काही विदेशातील पाहुणे सुद्धा आपली हजेरी लावतात. नंतर विविध रंगारंग कार्यक्रमांना सुरुवात होते.
राजपथावर देशातील सर्व घटक राज्यांचे चित्ररथ निघतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन या चित्ररथांद्वारे घडविल्या जाते. भारतीय सैन्य दलाच्या सर्व तुकड्या आपल्या कवायती सादर करतात. यामध्ये वायुसेना आपले हवाई कौशल्य दाखवत उंच आकाशात चित्तथरारक उड्डाणे सादर करतात. एन. सी.सी. च्या विद्यार्थ्यांची सुद्धा कवायत येथे सादर केल्या जाते. यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पंतप्रधान भेटतात व त्यांच्या सोबत संवाद साधतात.
हे झाली राजधानीतील. पण फक्त दिल्लीतच नव्हे तर हे असे कार्यक्रम संपूर्ण देशभर साजरे केले जातात. सर्व शासकीय कार्यालात ध्वजारोहण केले जाते. पोलीस विभागाकडून कवायत सादर केली जाते. यासोबतच गावागावांमधून प्रभातफेरी काढून भारत माता कि जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या जातात.
शहरातील चौका चौकात तरुण मंडळी देशभक्ती वरील गीते वाजवितात. कुणी गोड पदार्थ वाटप करतात, कुणी शरबत वाटप करतात तर कुणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना झेंडा लाऊन देत असतात. कुठे भाषण स्पर्धा तर कुठे वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते.
या सर्वांमध्ये मला आवडणारी गोष्ट म्हणजे शाळेमधील प्रजासत्ताक दिन. २ दिवस अगोदर पासून सुरु होणारी तयारी. कुणी तोरणे बांधते, कुणी रांगोळी काढते, तर कुणी भाषणाची तयारी करतात. सर्वत्र अगदी रेलचेल असते. ज्यांची नृत्य किंवा गायन असते ते विद्यार्थी आपला सराव करतात. कुणी मैदानावर उभे राहण्यासाठी व्यवस्थित ओळी आखत असतात.
प्रजासत्ताक दिनी अगोदर ध्वजारोहण होते. या नंतर राष्ट्रगीत गायन व प्रतिज्ञा म्हटल्या जाते. संविधानाचे वाचन होते. नंतर विद्यार्थी मित्रांची भाषणे, सामुहिक गीत गायन, नृत्य सादरीकरण होते. एन. सी. सी. व स्काउट गाईड चे विद्यार्थी सुंदर पथसंचलन करतात आणि शेवटी गोड पदार्थांचे वाटप होत असते. मला खात्री आहे या गोष्टी सर्वांनी अनुभवलेल्या असतीलच.
अशा प्रकार एकदम हर्षोल्लासात देशाच्या कान्या कोपऱ्यात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. आपण सर्वांनी आपल्या संविधानाचा, आपल्या देशभक्तांचा आणि आपल्या देशातील प्रत्येक जवानाचा नेहमी आदर केला पाहिजे. ते होते म्हणून आज आपण हा कार्यक्रम साजरा करू शकत आहोत हे नेहमी लक्षात ठेवावे.
आज या पावन दिवशी आपण मला आपल्या समोर माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिल्या बद्दल मी आपले आभार मानतो. आपण सर्वांनी माझे दोन शब्द शांतता पूर्वक ऐकून घेतले त्या बद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. परत एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो.
जय हिंद, जय भारत……….. धन्यवाद!