Rani Durgavati Information in Marathi
भारतीय इतिहासात स्त्री राज्यकर्त्या विरळच पहावयास मिळतात रजिया सुलतान ही भारतातील पहिली महिला राज्यकर्ती होती त्यानंतर अनेकदा स्त्रियांनी पर्यायी व्यवस्था म्हणून राज्यकारभारात लक्ष घातले असे बहुधा व्हायचे परंतु अहिल्याबाई होळकर , झांशीची राणी लक्ष्मीबाई ह्या काही कर्तुत्ववान व साहसी स्त्रिया सुध्दा होवून गेल्या ज्यांनी पूर्णवेळ शासक म्हणून राज्य सांभाळले व प्रजेचे पुत्रवत संरक्षण सुध्दा केले. आज आपण अश्याच एका शूर व साहसी महिला राज्यकर्तीची माहिती घेणार आहोत जिचे साहसी नेतृत्व व युध्द कौशल्यापुढे मुघल शासक अकबर सुध्दा अनेकदा त्रासून गेला होता सोबतच त्याला अतोनात नुकसान सुद्धा सहन करावे लागले होते.
“राणी दुर्गावती” मुघल शासनाला हादरवणारी एक शूरवीर वीरांगना – Rani Durgavati Information in Marathi
राणी दुर्गावतीचे नाव इतिहासात वीरांगना व साहसी महिला शासक म्हणून उल्लेखित होते. गोढ घराण्यातील शासनकर्ती राणी दुर्गावती शेवटच्या श्वासापर्यंत प्रजा व राज्य रक्षणाकरिता प्राणपणाने लढली व ह्यातच तिला वीरमरण आले.
राणी दुर्गावती – एक सामान्य राजपुत्री ते राज्य शासकपर्यंतचा प्रवास – Rani Durgavati Story
राणी दुर्गावातीचा जन्म राजपूत चंदेल राजा किरत राय ह्यांची पुत्री म्हणून झाला होता. राणी दुर्गावातीचे वडिल हे सुध्दा शूरवीर योद्धे होते ज्यांनी महमूद गजनी ह्या क्रूर लुटकर्त्याचा पराभव केला होता त्यामुळे स्वाभाविकच राज्य शासन व शस्त्र शिक्षण राणी दुर्गावातीला घरीच मिळाले होते.
लहानपणापासून दुर्गावातीला निशानेबाजी, तलवारबाजी, घोड्सवारी, बंदूक चालविणे या व्यतिरिक्त अन्य शस्त्र विद्येमध्ये खूप आवड होती व त्यात तिने निपुणता सुध्दा मिळवली होती. ५ ऑक्टोबर १५२४ साली दुर्गाष्टमी च्या दिवशी जन्म झाल्यमुळे दुर्गावती असे तिचे नामकरण करण्यात आले होते.
राणी दुर्गावतीचा विवाह गोढ वंशातील राजा दलपत शाह ह्यांच्या बरोबर झाला होता. दलपत शाह ह्यांच्याकडे गोंडवाना राज्याची जबाबदारी त्यांचे वडिल राणा संग्राम सिंह ह्यांनी दिली होती, परंतु विवाहाच्या नेमक्या आठ वर्षानंतर राजा दलपत शाह ह्यांचा मृत्यू झाल्याने राणीवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यावेळी राणीला एक पुत्र होता व पुढे निराधार झालेल्या राज्याची जबाबदारी खुणावत होती, अश्या कठीण परिस्थितीत राणीने राज्याची घडी सुस्थितीत बसविण्यावर भर दिला व संपूर्ण जबाबदारी स्वतः सांभाळण्याचा निर्णय घेतला. व अश्या प्रकारे राणी दुर्गावती कडे राज्याची सूत्रे आली.
राणी दुर्गावती – एक मजबूत शासक व राज्य संरचनाकर्ती – Rani Durgavati History
शेर शाह सुरी ह्या शक्तिशाली शासकाचे दलपत शहाच्या काळात निधन झाल्यानंतर त्याचे राज्य माळवा या प्रदेशावर सुजात खान याने आपले वर्चस्व प्रस्थापित करून तो जिंकून घेतला. त्यावेळी गोंडवाना ह्या राज्यावर राणी दुर्गावती ही एक महिला राज्यकर्ती आहे ह्याची सुजात खान ला माहिती होती व त्याने दुर्गावातीला कमजोर स्त्री समजून गोंडवाना वर आक्रमण करण्याची घोडचूक केली व यात त्याचा दारूण पराभव झाला. ह्या विजयामुळे चौफेर राणी दुर्गावातीचा नावलौकिक निर्माण झाला व तिचे प्रभुत्व सिद्ध झाले.
राज्यात पर्यावरण संरक्षण व जोपासणीसाठी अनेक जागी बाग बगीचे निर्माणाचे काम त्यानंतर राणीच्या देखरेखीत करण्यात आले.याशिवाय दळणवळण सुलभ करण्याकरिता रस्ते निर्माणाचे कार्य करण्यात आले, पिण्याच्या पाण्याची सोय निर्माण करण्यासाठी विहिरी व कालवे सुध्दा तयार केले. याशिवाय गरीब लोक व यात्रेकरूच्या सोयीकरिता राणीने राज्यात धर्मशाळा व मंदिर निर्माणाचे कार्य सुध्दा करवून घेतले.
अश्या प्रकारे राणीने सुरुवातीच्या काही काळात राज्य संरक्षण व राज्य विकासाचे काम केले.
अकबर व राणी दुर्गावती संघर्ष – Rani Durgavati Battle with Akbar
अकबराच्या दरबारात राणी दुर्गावतीच्या शौर्य व साहसा सोबातच तिच्या रूप सौंदर्याची वार्ता पसरली होती. सोबतच गोंडवाना हा आर्थिकदृष्ट्या समृध्द प्रांत असल्याची माहितीसुध्दा मुघल शासनाला होतीच, ह्यामुळेच अकबराने आपला सेनापती आसिफ खां ह्याला गोंडवाना प्रदेशावर आक्रमण करण्यास नियुक्त केले व सोबतच राणी दुर्गावातीला जिवंत मुघल दरबारात हजर करण्याचा आदेश दिला.
वासनांध अकबराची कुदृष्टी गोंडवानाच्या संपन्नेतेसोबतच राणी दुर्गावातीच्या रूपावर सुध्दा होती. एकूणच आसिफ खां ने गोंडवाना प्रदेशावर सलग तीनदा आक्रमण केले तरी सुध्दा कमी सैन्यबळाच्या जोरावर दुर्गावतीने त्याचे आक्रमण परतवून लावले व त्याचा पराभव केला.
राणी दुर्गावती यांचा मृत्यू – Rani Durgavati Death
झालेल्या घटनने आसिफ खां पेटून उठला व त्याने चौथ्यांदा छल व कपट मार्गाचा अवलंब करत राणी दुर्गावतिच्या गोंडवाण्यावर आक्रमण केले. तरीही निडर व लढाऊ बाण्याच्या राणी दुर्गावातीने शर्थीने लढा दिला परंतु ह्या सर्वात ती अत्यंत जखमी झाली अश्यातच तिला तिच्या सैन्याने युध्द भूमीतून सुरक्षित जागी जावून थांबण्याचा तिला सल्ला दिला परंतु राणीने कुणाचेही न ऐकता लढा चालूच ठेवला. ह्यातच राणीच्या एका डोळ्याला शत्रूचा बाण सुध्दा लागला होता परंतु अखेरच्या श्वासापर्यंत ती लढत राहिली व शेवटी सुध्दा शत्रूच्या हातून मरण्याऐवजी तिने स्वतः ला शस्त्र घात करवून मरण स्वीकारले.
अश्या स्वाभिमानी, शूर व साहसी राणीला ह्या वेळी वीरमरण आले. परंतु तिने पराधीनता स्वीकारली नाही, ज्या जागी ही वीरांगना वीरमरणास प्राप्त झाली होती आज तिथे तिच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्मारक बांधण्यात आलेले आहे. अश्या ह्या रणरागिणी विरांगणेचे नाव भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरात नमूद आहे जे तिला अजरामर करण्यास नक्कीच सहाय्यक ठरते.
स्त्री शक्तीचा तसेच भारतीय स्त्री च्या स्वाभिमानी व चारित्र्य संपन्न लढाऊ बाण्याचा परिचय आपल्याला राणी दुर्गावातीच्या चरित्रातून होतो.प्रसंगी अश्या नारीशक्तीने भारतीय चेतनेला केवळ बलच नाही तर एक उत्तुंग असा आदर्श सुध्दा दिला जो वारसा पिढी दर पिढी नक्कीच भारतीय स्त्रियांना प्रेरणा व मार्गदर्शन देत राहील.