Ramzan Eid Mahiti Marathi
मुस्लिम बांधवांचे महत्वाचे दोन सण म्हणजे ईद उल फितर आणि ईदुज्जुह. यातला ईद उल फितर हा आनंदाने साजरा करणारा सण आहे. एकमेकांमधे बंधुभावाचे नाते स्थापीत व्हावे आणि प्रेमाने आनंदाने साजरा होणारा असा हा उत्सव आहे.
याच्या अगदी विपरीत असा ईदुज्जुहा चा अर्थ सांगण्यात आला आहे. ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी… त्यागाचं पर्व मानण्यात येतं.
ईद चा अर्थ आनंद व फितर म्हणजे दान करणे. हे दान अन्नच्या स्वरूपात असावे असा नियम आहे.
रमजान च्या महिन्यात मुस्लिम बांधव संपुर्ण महिनाभर रोजे ठेवतात. जसजशी ईद जवळ येऊ लागते मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडुन वाहतांना दिसतो.
रमजानच्या पवित्र महिन्यात चंद्र दर्शन होईपर्यंत रोज उपवास केले जातात.
सुर्य उगवण्यापुर्वी अन्नाचे ग्रहण करायचे आणि संपुर्ण दिवस सुर्यास्त होईपर्यंत उपवास पाळायचा.
सुर्यास्त झाल्यानंतर नमाज करून प्रार्थना करायची आणि उपास सोडायचा. असा हा नियम संपुर्ण महिनाभर पाळायचा. या पवित्र दिवसांमधे कुराण शरीफ ग्रंथाचे वाचन करायचे.
वाचन केल्यानंतर चिंतन मनन केले जावे असा नियम आहे.
बंधुभावाचा हा सण शत्रुला देखील जवळ करा असा संदेश प्रवाहीत करतो. या दिवशी मुस्लिम बांधव ईदगाह वा मशिदीत नमाज अदा करण्याकरता एकत्र येतात.
अल्लाहा प्रती नमाज अदा केली जाते व त्यानंतर सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा देतात.
नवे कपडे परिधान केले जातात या दिवशी गोडाधोडाचे पदार्थ आणि सुकामेव्याची सगळीकडे रेलचेल पहायला मिळते या व्यतिरीक्त मटण चिकन, बिर्याण्या बनविल्या जातात.
शेजारी आणि नातेवाईकांकडे मिठाईची ताटं पाठविण्याचा देखील प्रघात आहे.
लहान मुलं आपल्या पेक्षा मोठयांकडे ‘ईदी’ मागतात. मोठी मंडळी देखील वस्तु, पैसे, मिठाई, कपडे या स्वरूपात ‘ईदी’ देत लहानग्यांना खुश करतात.
गरीबांची मुलं देखील श्रीमंतांकडे ईदी मागतात या ईदीला भिक समजले जात नाही तर तो लहानांचा हक्क समजला जातो आणि त्यांना या दिवशी नाराज केले जात नाही.
ईद च्या पावन पर्वावर मुस्लिम बांधव मोठया वस्तुंची खरेदी करणे शुभ समजतात.
त्यामुळे नवीन गाडी, नवे घर, इलेक्ट्रॉनिक वस्तुंची खरेदी या दिवशी मोठया प्रमाणात केली जाते.
“मुस्लीम बांधवांचा एक महत्वपूर्ण सण रमजान ईद” – Ramzan Eid Information In Marathi
ईद का चांद – Ramadan Eid Moon
रमजान महिन्यात तिसावा रोजा झाल्यानंतर चंद्र दिसतो त्याला ईद का चांद मानले जाते.
ईस्लामी कॅलेंडर प्रमाणे ईद वर्षातुन दोन वेळेस येते.
चंद्र दिसल्यानंतर नवा महिना सुरू होतो. पुर्ण जगात एकाचवेळी ईद साजरी व्हावी म्हणुन चंद्र दिसल्यानंतरच रमजान ईद साजरी करण्यात येते.
महिला वर्गाची तयारी तर फार आधीपासुन सुरू झालेली दिसते एखाद दुसरा रोजा झाल्यानंतर घराघरातुन शेवया तयार केल्या जातात.
वाढत्या शहरीकरणामुळे किंवा अतीव्यस्ततेमुळे आता हे चित्र केवळ ग्रामिण भागातुनच दिसते.
शहरांमधुन या वस्तु आता रेडीमेड मिळत असल्याने स्त्रियांची मेहनत कमी झालेली दिसते घर सजवले जाते.
रंगरंगोटी करून आप्तस्वकीयांना आपल्या घरी शिरखुर्मा खाण्याकरता आमंत्रीत केले जाते.
ईद च्या दिवशी तळागाळातील व्यक्ती देखील या सणापासुन वंचीत राहु नये म्हणुन त्याला मदत करण्यास सांगीतले आहे.
कारण जर गरीब व्यक्ती या दिवशी चांगल्या गोष्टींपासुन वंचित राहात असेल तर ही गोष्ट मुस्लिम धर्माकरता योग्य समजल्या जात नाही म्हणुन या गरीब माणसांना ईदपुर्वी जकात दिली जाते जेणे करून ही वंचित मंडळी सुध्दा वर्षातील एक दिवस आनंदाने साजरा करू शकतील.
प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबरांनी आपल्या जीवनकाळात संपुर्ण मानवजातीला विश्वबंधुत्वाची शिकवण दिली.
सामाजिक न्याय, समता, उदारता, समरसता याचे महत्व विशद केले आणि संपुर्ण मानवजातीच्या कल्याणाकरता आपले आयुष्य वाहुन घेतले.
महम्मद पैगंबरांची शिकवण एका विशिष्ट जातीधर्मापुरती मर्यादीत नव्हती तर समस्त विश्वाचे कल्याण व्हावे असे त्यांच्या शिकवणीतुन प्रदर्शित होते.
सगळया जातीधर्मातील सण उत्सवांनी आपल्याला विश्वबंधुत्वाचीच शिकवण दिली आहे.
ती आपण अंगिकारायला हवी आणि आपण एक आहोत आपली संस्कृती आपली मातृभुमी ही एक आहे त्यामुळे एकमेकांच्या कल्याणार्थ जे जे करता येईल ते आपण करायला हवे….
हाच तर या सणांचा संदेश आहे.
अश्या प्रकारे साजरा केला जातो रमजान चा सण.
लेख आवडल्यास Facebook वर तुमच्या मित्र–मैत्रिणीला share करायला विसरु नका.