Pu. La. Deshpande Information in Marathi
मराठी साहित्य परंपरेत अनेक हिरे जन्माला येऊन गेले, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली सारखा भक्कम पाया व वारसा जिथे असेल तिथे साहित्य नक्कीच प्रभावी व काळजात भिडणारे निर्माण होणार यात काही दुमत नाही. “माझिया मराठीची थोरवी, अमृतासंगे पैजा जिंके” असे गौरवोद्गार लाभलेल्या मराठी भाषेत अनेक दर्जेदार साहित्यिक होवून गेले व त्यांचे साहित्य आजवर सर्व रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
अश्याच महान साहित्य परंपरेत एक हिरा जन्माला येऊन गेला ज्यांचे नावच त्यांचा परिचय देण्यास समर्थ आहे नुकतेच ८ नोव्हेंबरला त्यांचा जन्मदिवस दिवस येऊन गेला, त्यानिमित्ताने आज त्यांच्या बद्दल काही महत्वाच्या व मनोरंजक गोष्टी जाणून घेणार आहोत सदर लेख त्यांच्या पावन स्मृतीला भावपूर्ण श्रद्धा सुमने वाहण्याचा एक प्रयत्न आहे .
ज्या महान संगीत दिग्दर्शक ,नट, नाट्यलेखक व साहित्यकाराबद्दल आम्ही बोलतोय त्यांचे नाव आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके ‘पू.ल.’ चला तर मग अश्या विलक्षण व प्रभावी साहित्यकाराला जाणून घेवूया, ज्यांना साहित्य कलेचा आशीर्वाद जणू काय जन्मजातच मिळाला होता व त्याला त्यांनी प्रभावी व सुंदरतेने रंगमंचासोबतच साहित्य रसिकाच्या मनात हळुवार उतरवून कलेचा उत्तुंग आविष्कार घडविला.
बहुआयामी व्यक्तिमत्व पू. ल देशपांडे- Pu. La. Deshpande Information in Marathi
पू ल देशपांडेचा जीवन परिचय – Pu La Deshpande Biography in Marathi
पू ल देशपांडे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ साली मुंबईला गावदेवी या भागात गौड सारस्वत ब्राम्हण परिवारात झाला होता. नंतर पार्ले येथील टिळक विद्यालयात त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले, पुढील महविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज तसेच सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयातून पूर्ण केले.
पू ल ची देहयष्टी लहान पनापासूनच मजबूत होती तसेच वृत्ती चंचल व खट्याळ होती. स्वस्थ बसणे जणू काय त्यांना जमायचेच नाही, पू ल ह्यांच्या व्यक्तीमत्वात हाजीर जवाबीपणा व मिश्कील विनोद वृत्ती ह्यांचा विलक्षण संयोग होता, त्याकाळी पू ल ह्यांचे वडिल १५० रुपये पगारावर एक फिरते विक्रेते म्हणून काम करायचे, घरची परिस्थिती तशी ठीकच होती. लहानपणी शालेय कार्यक्रमात सहभागी होणे व भाषण देणे ह्यांची त्यांना लहानपासून आवड होती नंतर त्यांना ह्याचा जणू छंदच जडला व ते इतरांना सुध्दा संवाद व भाषणे लिहून द्यायला लागले.
लेखनासोबतच तबला व पेटी इत्यादी संगीत वाद्य वाजविणे हे करतांना वाचन करण्याची पू ल यांना पुढील काळात आवड निर्माण झाली. नभोवाणी वरील संगीत ऐकणे सोबतच घरी संगीताच्या सभेत लय लावणे व संगीताची तालीम करने ह्या सवयी त्यांनी अंगी जणू बाणून घेतल्या.
पू ल यांच्या संगीत क्षेत्रांतील योगदानाबद्दल व जीवनानुभवाबद्दल सांगायचे झाल्यास एकदा टिळक विद्यालयात बालगंधर्व आले असता त्यांनी पेटी वाजवून त्यांना गायन करवून दाखविले होते ह्या करिता त्यांना बालगंधर्वा कडून शाबासकी सुध्दा मिळाली होती, ह्या व्यतिरिक्त महाविद्यालयात असतांना राजा बढे यांच्या ‘माझीया माहेरा’ या गीताला तर प्रख्यात गायक भीमसेन जोशी यांच्या ‘इंद्रायणी काठी’ या गीताला पू ल यांनी चाल लावली होती व नंतर हे गीते सुप्रसिध्द व अजरामर झाली आहेत. काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन सुध्दा पू ल यांनी केले होते तसेच काही काळ शिक्षक म्हणून सुध्दा नोकरी केली होती.
पू ल यांचा साहित्य, नाट्य क्षेत्र प्रवास:
१९३७ साली पू ल यांनी नभोवाणीवर छोट्या कार्यक्रमात भाग घेणे सुरु केले यामध्ये पैजार ही प्रसिध्द प्रस्तुती होती, जवळपास १९४० साली साहित्य व नाट्य क्षेत्रांत पू ल सक्रीय झाले होते, यामध्ये १९४४ सालचे ‘भट्या नागपूरकर’ हे व्यक्तिचित्र नियतकालिकातून प्रसिध्द झाले, पुढे ‘जिन आणि गंगाकुमारी’ ही लघुकथा तसेच सर्वात प्रसिध्द व रसिकांच्या पसंतीस उतरलेले विनोदी पुस्तक ‘बटाट्याची चाळ’ चा समावेश आवर्जून करावा लागेल.
पू ल यांच्या लेखनसाहित्यामध्ये कथा व कादंबरी यांचा सुध्दा समावेश होतो ज्याबद्दल सांगायचे झाल्यास ‘असा मी आसामी’, अघळ पघळ, एक शून्य मी, कोट्याधीश पू ल, पूर्वरंग, भावगंध ,खिल्ली, हसवणूक इत्यादींचा समावेश होतो.
‘लालीताकुंज’ व ‘नाट्यनिकेतन’ या कोल्हटकर यांच्या नाट्यसंस्थेतून पू ल यांनी भूमिका करणे सुरु केले व पुढे वंदे मातरम, दुधभात, गुळाचा गणपती या चित्रपटामध्ये पू ल यांची भूमिका रसिक मनाला भिडून गेली एक अष्टपैलू नट पू ल यांच्या रुपात प्रेक्षकांना बघायला मिळाला. ‘गुळाचा गणपती’ चित्रपट ही संपूर्ण कलाकृती पू ल यांची होती ज्यामध्ये कथा, पटकथा, संगीत दिग्दर्शन ,संवाद इत्यादी चा समावेश होतो.
संगीतकार म्हणून अनेक चित्रपटात पू ल यांनी संगीत दिले ज्यामध्ये नवरा बायको, दुधभात, गुळाचा गणपती, घरधनी, चोखामेळा, नवे बिऱ्हाड इत्यादी काही प्रसिध्द चित्रपट समविष्ट आहेत.
पू ल यांच्या आयुष्यातील काही महत्वपूर्ण घटना:
- दूरदर्शनच्या पहिल्या प्रसारण कार्यक्रमासाठी पंडित नेहरू यांची मुलाखत घेणारे पू ल देशपांडे हे पहिले मुलाखत कार होते.
- पू ल देशपांडे यांना बंगाली व कानडी या दोन्ही भाषा येत होत्या.
- पू ल देशपांडे यांच्या आयुष्यावर भाई नावाचा चित्रपट सुध्दा आलेला आहे
- साहित्य व संगीत अकादमी या दोन्ही प्रकारचे पुरस्कार प्राप्त करणारे पू ल हे मोजक्याच लोकांपैकी एक आहेत.
प्रवास वर्णन व व्यक्तिचित्रे लेखक, नाट्य लेखक, नट, संगीत दिग्दर्शक, कथा लेखक, पटकथा लेखक, कादंबरी लेखक, मुलाखतकार असे बहुरूपी कला गुण असलेले व्यक्ती म्हणून पू ल देशपांडे यांचे व्यक्तिमत्व होते. अश्या बहुआयामी कलाकाराने जवळ पास मनोरंजांच्या सर्वच क्षेत्रावर अधिराज्य गाजविले व प्रेक्षकाच्या मनांचा ठाव घेत आपली छाप निर्माण केली. अश्या महान साहित्यिक व कलाकाराचा १२ जून २००० साली वयाच्या ८१ व्या साली पुणे येथे मृत्यू झाला, मराठी साहित्याला कलाविष्काराने समृध्द करणाऱ्या व विविधांगाने सुंदरता प्रदान करणाऱ्या पू ल देशपांडे या अस्सल खाणी हिऱ्याला आमची भावपूर्ण श्रद्धांजली.