Nashik District Information In Marathi
पवित्र गोदावरी तिरावर वसलेले नाशिक!
पुण्यभुमी…. हिंदुचे पुण्यक्षेत्र…. ज्या ठिकाणी दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो….. हजारो साधु संत त्याकाळात याठिकाणी वास्तव्याला येतात….
लाखो करोडोंच्या संख्येने श्रध्दाळु त्यादरम्यान नाशिक पुण्यक्षेत्री पतितपावन होण्याकरता गर्दी करतात… असे पुण्यक्षेत्र नाशिक!
नाशिक जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Nashik District Information In Marathi
नाशिकला पौराणिक, ऐतिहासीक, सामाजिक आणि सांस्कृतिक असे अनन्यसाधारण महत्व आहे.
बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक ‘त्र्यंबकेश्वर’ हे ज्योर्तिलिंग याच जिल्हयात असल्याने या जिल्हयाचे महत्व आणखीनच वाढते.
साडेतिन शक्तीपिठांपैकी एक ‘वणीची सप्तश्रृंगी’ उंच गडावर याच जिल्हयात विराजमान असुन भक्तांच्या हाकेला साद देत शतकानुशतकं आजही उभी आहे.
गोदावरी तिरी ’रामकुंडा’ वर आजही लाखोंच्या संख्येने जनसमुदाय आपल्या ’ मृत ’ आप्तस्वकीयांच्या अस्थी विसर्जीत करण्याकरता येथे गर्दी करतात.
श्राध्दविधी पुण्यक्षेत्री केल्यास त्याचे पुण्य अधिक मिळते या श्रध्देने भाविक या ठिकाणी श्राध्दविधी करण्याकरता देखील मोठया संख्येने येत असतात.
वैदिक विधी, श्रध्दा, प्रथा परंपरा यांची सोनेरी किनार लाभलेले नासिक आधुनिक आणि पुरातन गोष्टींची सांगड घालत आज खुप मोठया प्रमाणात विस्तारले आहे.
नाशिक जिल्हयातील तालुके – Nashik District Taluka List
Nashik जिल्हयात एकुण 15 तालुके आहेत
- नाशिक
- सिन्नर
- इगतपुरी
- त्र्यंबकेश्वर
- निफाड
- येवला
- पेठ
- दिंडोरी
- चांदवड
- नांदगाव
- सुरगणा
- कळवण
- देवळा
- बागलाण
- मालेगांव
नाशिक जिल्हयाविषयी उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Nashik District Information
- लोकसंख्या 61,95,252
- क्षेत्रफळ 15,582 वर्ग कि.मी.
- साक्षरतेचे प्रमाण 89.95%
- राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 आणि क्र. 50 या शहरातुन गेले आहेत.
- नाशिक जिल्हयाच्या उत्तरेला धुळे जिल्हा, पुर्वेला जळगांव, दक्षिण पुर्वेला औरंगाबाद, दक्षिणेला अहमदनगर, दक्षिण पश्चिमेला ठाणे जिल्हा, आणि पश्चिमेकडे गुजरात राज्याची सुरूवात
- महाराष्ट्रात सर्वात जास्त द्राक्षाचे उत्पादन नाशिक जिल्हयात होते येथील द्राक्ष विदेशात देखील पाठवली जातात.
- नाशिक जिल्हा दारू च्या उत्पादनाकरता देखील ओळखला जातो त्यामुळे याला ’’भारताची वाईन कॅपीटल’’ म्हणुनही संबोधतात.
- महाराष्ट्रातील मोठया नदींपैकी एक गोदावरी नदीचा उगम हा याच जिल्हयात त्र्यंबकेश्वर मधुन होतो.
ब्रम्हगिरी हा उंच पर्वत त्र्यंबकेश्वर मधे असल्याने पाण्याने भरलेले ढग या ठिकाणी अडतात आणि या ठिकाणी खुप मोठया प्रमाणात पाउस पडत असल्याने नाशिक जिल्हयाला पाण्याची टंचाई जाणवत नाही.
इतकेच काय तर नाशिकला पाउस पडल्यास औरंगाबाद शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागतो, औरंगाबाद येथील नाथसागर हे अथांग जलाशय गोदावरी नदीवरच बांधण्यात आले आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने आणि तिर्थस्थळांच्या दृष्टीने हा जिल्हा समृध्द असल्याने नाशिक जिल्हयात या दृष्टीकोनातुन मोठया प्रमाणात महसुल गोळा होतो.
स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर, अनंत कान्हेरे, दादासाहेब पोटनिस, बाबुभाई राठी, वि.वा शिरवाडकर, वसंत कानेटकर अश्या विविध क्षेत्रातील नामवंत विभुती या नाशिकनेच जन्माला घातल्या.
नाशिक जिल्हयाला मिनी महाराष्ट्र देखील म्हंटल्या जाते कारण सुरगणा, पेठ, इगतपुरी येथील पाउस आणि शेती कोकणासारखी तर निफाड, सिन्नर, दिंडोरी, बागलाण मधले वातावरण पश्चिमी महाराष्ट्राशी मिळतेजुळते आणि येवला, नांदगांव, चांदवड विदर्भातल्या वातारणाशी जुळणारे.
त्र्यंबकेश्वर येथील ज्योर्तिलिंग 12 ज्यार्तिलिंगापैकी 1 असुन या त्र्यंबकेश्वरला हिंदुंच्या वंशावलीची नोंद ठेवण्यात येते.
मंुबई आणि पुण्यानंतर नाशिक महाराष्ट्रातील तीसरे सर्वात मोठे शहर आहे.
समुद्र मंथना समयी जे अमृत निघाले ते देवलोकी घेउन जात असतांना त्याचे थेंब चार ठिकाणी पडले, नाशिक हे त्या चार ठिकाणांपैकी एक आहे आणि म्हणुन नाशिक प्रत्येक बारा वर्षांनंतर मोठया प्रमाणावर सिंहस्थ कंुभमेळयाचे आयोजन करतो.
पर्यटन आणि तिर्थस्थळं – Tourist Places In Nashik
त्र्यंबकेश्वर – Trimbakeshwar
12 ज्योर्तिलिंगांपैकी 10 व्या क्रमांकाचे ज्योर्तिलिंग नाशिक जिल्हयातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी असुन अत्यंत पवित्र स्थळ मानल्या जाते. हे एक प्राचीन हिन्दु मंदीर असुन नाशिक शहरापासुन 28 कि.मी. अंतरावर आहे, या ठिकाणी हिंदुंच्या वंशावली ची नोंद देखील ठेवल्या जाते.
भारतातील सर्वात लांब अश्या पवित्र गोदावरी चा उगम देखील येथुनच होतो.
ब्रम्हगिरी पर्वत या ठिकाणी असुन त्याचे देखील अनन्यसाधारण महत्व आहे.
श्रावण महिन्याच्या तिस.या सोमवारी या पर्वताला प्रदक्षिणा मारण्याची पुर्वापार परंपरा आहे. मंदीर परिसरात कुशावर्त कुंड असुन सिंहस्थाच्या वेळेस नागासाधु या ठिकाणी स्नान करतात.
त्र्यंबकेश्वर मंदीरात आपल्याला तीन मुखी शंकराची पिंड पहावयास मिळते ती ब्रम्हा विष्णु आणि शिवाचे प्रतिनीधीत्व करते.
त्र्यंबकेश्वर ला येण्याकरता नजीकचे रेल्वे स्टेशन नाशिक रोड असुन तेथुन त्र्यंबकेश्वर चे अंतर 40 कि.मी. आहे.
शहरातुन मोठया प्रमाणात बसेस देखील या ठिकाणी येत असतात शिवाय खाजगी वाहनाने देखील या ठिकाणी पोहोचता येते.
वणीची सप्तश्रृंगी – Saptashrungi
महाराष्ट्रातल्या साडे तीन शक्तीपीठांपैकी वणी ची सप्तश्रृंगी हे अर्ध शक्तीपीठ मानल्या जातं. नाशिक जिल्हयातल्या वणी पर्वतामधल्या 7 शिखरांपैकी एका शिखरात ही आदिमाया विराजमान झालेली आहे.
ब्रम्हदेवाच्या कमंडलुमधुन निघालेल्या गिरीजा महानदीचं एक रूप म्हणजे सप्तश्रृंगी!
असं म्हणतात असुरांचा नाश केल्यानंतर काही काळासाठी देवी इथे वास्तव्याला होती, पण तीचा हा वास्तव्याचा कालावधी फार दिर्घ नव्हतां म्हणुन या शक्तीपीठाला अर्ध शक्तीपीठ असं म्हंटल्या जातं.
10 फुट उंचीची 18 हात असलेली ही भव्य शेंदुरलिंपीत मुर्ती पाहाण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रातुन भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात.
ही मुर्ती एका धनगराने शोधुन काढल्याची देखील आख्यायिका ऐकावयास मिळते…
एक धनगर गुरे राखण्याकरता या गडावर फिरत असतांना त्याला मधाचं पोळं दिसलं त्यातुन मध गळत असलेला पाहुन त्याने काठीने त्या पोळयाला ढोसकुन पाहीलं असतां त्याच्या काठीला चक्क शेंदुर लागला त्याने ते पोळं पुर्ण बाहेर काढलं त्यावेळी आत त्याला दिसली ती वणीची सप्तश्रृंगी!
उंच गडावर जाण्याकरता साधारण साडेतिनशे पाय.या चढुन दर्शनाला जाता येतं.
आता महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी सहज पोहोचण्याकरता रोप वे तयार केला असुन एक रेल्वेचा मोठा डबा तुम्हाला गडावरून खाली आणि वर नेण्याकरता ही एक चांगली सोय करण्यात आली आहे.
नाशिकपासुन वणी 55 कि.मी. अंतरावर असुन नजिकचे रेल्वेस्थानक नाशिक असुन राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस या ठिकाणी येतात शिवाय खाजगी वाहनाने देखील या ठिकाणी पोहोचता येतं.
मुक्तीधाम – Muktidham
संपुर्ण संगमरवरी बांधकाम असलेले भव्य मंदीर मुक्तीधाम म्हणुन प्रसीध्द आहे. 1971 साली स्थापीत झालेले हे मंदीर नाशिक रोड भागात असुन हे मंदीर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. विभीन्न हिंदु देवी देवता येथे विराजमान आहेत.
या मंदीरात 12 ज्योर्तिलिंग स्थापीत केले असुन त्या व्यतिरीक्त भगवान श्रीकृष्ण, विष्णु लक्ष्मी, राम लक्ष्मण सिता, हनुमान, दुर्गादेवी, भगवान गणेशाच्या देखील मुत्र्या आहेत.
येथील संगमरवरी भिंतींवर गीतेतील 18 अध्याय लिहीले असुन भाविक याचा पाठ करतांना दृष्टीस पडतात.
हे संगमरवरी मंदीर आणि मुत्र्या राजस्थान येथील कलाकारांनी बनविलेल्या आहेत. सिंहस्थ कुंभ मेळयाच्या वेळेस हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात. या परिसरात एक धर्मशाळा देखील बांधण्यात आली असुन जवळपास 200 भाविकांच्या निवासाची सोय केली आहे.
पंचवटी – Panchavati
नाशिक मधल्या पंचवटी परिसराला धार्मिक आणि आध्यात्मीक महत्व आहे. या परिसरातुन गोदावरी नदी वाहाते त्या ठिकाणी रामकुंड असुन त्याला फार महत्व आहे या ठिकाणी श्राध्दकर्म विधी पार पाडले जातात, अस्थिंचे विसर्जन या ठिकाणी केले जाते, गोदावरी स्नानाला आलेले भाविक या ठिकाणी स्नान करतात.
या ठिकाणी भाविकांच्या सोयीकरता घाट बांधण्यात आले असुन अनेक सोयी देखील करण्यात आल्या आहेत.
पंचवटी भागात काळा राम मंदीर, कपालेश्वर, सिता न्हाणी, सिता गंुफा, दुतोंडया मारोती, सांडव्यावरची देवी आदी प्रसिध्द मंदीरं असुन त्याशिवाय अनेक प्राचीन मंदीरांना या ठिकाणी भेटी देता येतात
भंडारदरा – Bhandardara
महाराष्ट्रातील सहयांद्री पर्वतरांगां मधे नैसर्गिक आणि प्राकृतिक सौंदर्याने नटलेला भंडारदरा हे पर्यटनाकरता एक उत्तम ठिकाण आहे.
या ठिकाणी मोठा धबधबा, तलाव, ट्रेकिंग ची आवड असणा.यांकरता उंच टेकडया, सर्वदुर हिरवळ असे निसर्गप्रेमींना आकर्षीत करणारे सर्व वातावरण असल्याने भंडारदरा हे एक उत्तम पर्यटन स्थळ बनले आहे.
अहमद नगर जिल्हयातील अकोले तालुक्यातील भंडारदरा नाशिकपासुन 71 कि.मी. अंतरावर असुन मुंबईपासुन 117 कि.मी अंतरावर आहे.
रतनगढ आणि हरिश्चंद्रगढ ट्रेकिंग करता उत्तम ठिकाणं आहेत, याशिवाय मदनगढ आणि कुलंगगढ देखील उत्तम पर्याय ठरू शकतात.
अगस्ती ऋषींचा आश्रम, अमृतेश्वर मंदीर ही ठिकाणं देखील भेट देण्यासारखीच!
या ठिकाणी पाउस मोठया प्रमाणात पडत असल्याने धरणं आणि जलाशय तुडुंब भरलेले असतात त्यामुळे परवानगी असल्यासच नौका विहाराचा आनंद घेता येतो.
डोळयाचे पारणे फेडणारा भव्य असा धबधबा पाहाणे देखील एक वेगळा आणि कायम स्मरणात राहणारा अनुभव ठरतो.
नाशिक पासुन भंडारदरा येण्याकरता राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध असुन खाजगी वाहनाने येथे येणे अधिक सोयीचे ठरते.