श्री मनाचे श्लोक – १२६ ते १४५ (Manache Shlok)
जनांकारणे देव लीलावतारी।
बहुतांपरी आदरें वेषधारी॥
तया नेणती ते जन पापरूपी।
दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी॥१२६॥जगीं धन्य तो रामसूखें निवाला।
कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला॥
देहेभावना रामबोधे उडाली।
मनोवासना रामरूपीं बुडाली॥१२७॥मना वासना वासुदेवीं वसों दे।
मना कामना कामसंगी नसो दे॥
मना कल्पना वाउगी ते न कीजे।
मना सज्जना सज्जनी वस्ति कीजे॥१२८॥गतीकारणे संगती सज्जनाची।
मती पालटे सूमती दुर्जनाची॥
रतीनायिकेचा पती नष्ट आहे।
म्हणोनी मनाऽतीत होवोनि राहे॥१२९॥मना अल्प संकल्प तोही नसावा।
सदा सत्यसंकल्प चित्तीं वसावा॥
जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा।
रमाकांत एकान्तकाळी भजावा॥१३०॥भजाया जनीं पाहतां राम एकू।
करी बाण एकू मुखी शब्द एकू॥
क्रिया पाहतां उद्धरे सर्व लोकू।
धरा जानकीनायकाचा विवेकू॥१३१॥विचारूनि बोले विवंचूनि चाले।
तयाचेनि संतप्त तेही निवाले॥
बरें शोधल्यावीण बोलो नको हो।
जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो॥१३२॥हरीभक्त वीरक्त विज्ञानराशी।
जेणे मानसी स्थापिलें निश्चयासी॥
तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे।
तया भाषणें नष्ट संदेह मोडे॥१३३॥नसे गर्व आंगी सदा वीतरागी।
क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी॥
नसे लोभ ना क्षोम ना दैन्यवाणा।
इहीं लक्षणी जाणिजे योगिराणा॥१३४॥धरीं रे मना संगती सज्जनाची।
जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची॥
बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे।
महाक्रुर तो काळ विक्राळ भंगे॥१३५॥भयें व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे।
भयातीत तें संत आनंत पाहे॥
जया पाहतां द्वैत कांही दिसेना।
भयो मानसीं सर्वथाही असेना॥१३६॥जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले।
परी जीव अज्ञान तैसेचि ठेले॥
देहेबुद्धिचें कर्म खोटें टळेना।
जुने ठेवणें मीपणें आकळेना॥१३७॥भ्रमे नाढळे वित्त तें गुप्त जाले।
जिवा जन्मदारिद्र्य ठाकुनि आले॥
देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना।
जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१३८॥पुढें पाहता सर्वही कोंदलेसें।
अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे॥
अभावे कदा पुण्य गांठी पडेना।
जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१३९॥जयाचे तया चूकले प्राप्त नाहीं।
गुणे गोविले जाहले दुःख देहीं ॥
गुणावेगळी वृत्ति तेहि वळेना।
जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१४०॥म्हणे दास सायास त्याचे करावे।
जनीं जाणता पाय त्याचे धरावे॥
गुरू अंजनेवीण तें आकळेना।
जुने ठेवणे मीपणे ते कळेना॥१४१॥कळेना कळेना कळेना कळेना।
ढळे नाढळे संशयोही ढळेना॥
गळेना गळेना अहंता गळेना।
बळें आकळेना मिळेना मिळेना॥१४२॥अविद्यागुणे मानवा उमजेना।
भ्रमे चुकले हीत ते आकळेना॥
परीक्षेविणे बांधले दृढ नाणें।
परी सत्य मिथ्या असें कोण जाणें॥१४३॥जगी पाहतां साच ते काय आहे।
अती आदरे सत्य शोधुन पाहे॥
पुढे पाहतां पाहतां देव जोडे।
भ्रम भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे॥१४४॥सदा वीषयो चिंतितां जीव जाला।
अहंभाव अज्ञान जन्मास आला॥
विवेके सदा स्वस्वरुपी भरावे।
जिवा ऊगमी जन्म नाही स्वभावें॥१४५॥
पुढील पानावर आणखी श्री मनाचे श्लोक – १४६ ते १६५ …