श्री मनाचे श्लोक – १०६ ते १२५ (Manache Shlok)
बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा।
विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा॥
दया सर्वभुतीं जया मानवाला।
सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला॥१०६॥मना कोपआरोपणा ते नसावी।
मना बुद्धि हे साधुसंगी वसावी॥
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं।
मना होइ रे मोक्षभागी विभागी॥१०७॥मना सर्वदा सज्जनाचेनि योगें।
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे॥
क्रियेवीण वाचाळता ते निवारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०८॥जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा।
जनीं वादसंवाद सूखे करावा॥
जगीं तोचि तो शोकसंतापहारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०९॥तुटे वाद संवाद त्याते म्हणावें।
विवेके अहंभाव यातें जिणावें॥
अहंतागुणे वाद नाना विकारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११०॥हिताकारणे बोलणे सत्य आहे।
हिताकारणे सर्व शोधुनि पाहें॥
हितकारणे बंड पाखांड वारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१११॥जनीं सांगतां ऐकता जन्म गेला।
परी वादवेवाद तैसाचि ठेला॥
उठे संशयो वाद हा दंभधारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११२॥जनी हीत पंडीत सांडीत गेले।
अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले॥
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे।
मना सर्व जाणीव सांडुनि राहे॥११३॥फुकाचे मुखी बोलतां काय वेचे।
दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे॥
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।
विचारे तुझा तूंचि शोधुनि पाहे॥११४॥तुटे वाद संवाद तेथें करावा।
विविके अहंभाव हा पालटावा॥
जनीं बोलण्यासारिखे आचरावें।
क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे॥११५॥बहू शापिता कष्टला अंबऋषी।
तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी॥
दिला क्षीरसिंधु तया ऊपमानी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११६॥धुरू लेकरु बापुडे दैन्यवाणे।
कृपा भाकितां दीधली भेटी जेणे॥
चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११७॥गजेंदु महासंकटी वास पाहे।
तयाकारणे श्रीहरी धांवताहे॥
उडी घातली जाहला जीवदानी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११८॥अजामेळ पापी तया अंत आला।
कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला॥
अनाथासि आधार हा चक्रपाणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११९॥विधीकारणे जाहला मत्स्य वेगीं।
धरी कूर्मरुपे धरा पृष्ठभागी।
जना रक्षणाकारणे नीच योनी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२०॥महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला।
म्हणोनी तयाकारणे सिंह जाला॥
न ये ज्वाळ वीशाळ संनधि कोणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२१॥कृपा भाकिता जाहला वज्रपाणी।
तया कारणें वामनू चक्रपाणी॥
द्विजांकारणे भार्गवू चापपाणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२२॥अहल्येसतीलागी आरण्यपंथे।
कुडावा पुढे देव बंदी तयांते॥
बळे सोडितां घाव घालीं निशाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥१२३॥तये द्रौपदीकारणे लागवेगे।
त्वरे धांवतो सर्व सांडूनि मागें॥
कळीलागिं जाला असे बौद्ध मौनी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२४॥अनाथां दिनांकारणे जन्मताहे।
कलंकी पुढे देव होणार आहे॥
तया वर्णिता शीणली वेदवाणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२५॥
पुढील पानावर आणखी श्री मनाचे श्लोक – १२६ ते १४५ …