श्री मनाचे श्लोक – १६६ ते २०५ (Manache Shlok)
सदा सर्वदा राम सन्नीध आहे।
मना सज्जना सत्य शोधुन पाहे॥
अखंडीत भेटी रघूराजयोगू।
मना सांडीं रे मीपणाचा वियोगू ॥१८६॥भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे।
परी सर्वही स्वस्वरुपी न साहे॥
मना भासले सर्व काही पहावे।
परी संग सोडुनि सुखी रहावे ॥१८७॥देहेभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे।
विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे॥
विरक्तीबळे निंद्य सर्वै त्यजावे।
परी संग सोडुनि सुखी रहावे ॥१८८॥मही निर्मिली देव तो ओळखावा।
जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा॥
तया निर्गुणालागी गूणी पहावे।
परी संग सोडुनि सुखे रहावे ॥१८९॥नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता।
पुरेहून पर्ता न लिंपे विवर्ता॥
तया निर्विकल्पासि कल्पित जावे।
परि संग सोडुनि सुखे रहावे ॥१९०॥देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना।
तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना॥
परब्रह्म तें मीपणे आकळेना।
मनी शून्य अज्ञान हे मावळेना ॥१९१॥मना ना कळे ना ढळे रुप ज्याचे।
दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचे॥
तया खुण ते हीन दृष्टांत पाहे।
तेथे संग निःसंग दोन्ही न साहे ॥१९२॥नव्हे जाणता नेणता देवराणा।
न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा॥
नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा।
श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ॥१९३॥वसे हृदयी देव तो कोण कैसा।
पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा॥
देहे टाकिता देव कोठे पहातो ।
परि मागुता ठाव कोठे रहातो ॥१९४॥बसे हृदयी देव तो जाण ऐसा।
नभाचेपरी व्यापकू जाण तैसा॥
सदा संचला येत ना जात कांही।
तयावीण कोठे रिता ठाव नाही ॥१९५॥नभी वावरे जा अणुरेणु काही।
रिता ठाव या राघवेवीण नाही॥
तया पाहता पाहता तोचि जाले।
तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले ॥१९६॥नभासारिखे रुप या राघवाचे।
मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे॥
तया पाहता देहबुद्धी उरेना।
सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना ॥१९७॥नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे।
रघूनायका ऊपमा ते न साहे॥
दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावे।
तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे ॥१९८॥अती जीर्ण विस्तीर्ण ते रुप आहे।
तेथे तर्कसंपर्क तोही न साहे॥
अती गुढ ते दृश्य तत्काळ सोपे।
दुजेवीण जे खुण स्वामिप्रतापे ॥१९९॥कळे आकळे रुप ते ज्ञान होता।
तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था॥
मना उन्मनी शब्द कुंठीत राहे।
तो रे तोचि तो राम सर्वत्र पाहे ॥२००॥कदा ओळखीमाजि दूजे दिसेना।
मनी मानसी द्वैत काही वसेना॥
बहूता दिसा आपली भेट जाली।
विदेहीपणे सर्व काया निवाली ॥२०१॥मना गुज रे तूज हे प्राप्त झाले।
परी अंतरी पाहिजे यत्न केले॥
सदा श्रवणे पाविजे निश्चयासी।
धरी सज्जनसंगती धन्य होसी ॥२०२॥मना सर्वही संग सोडूनि द्यावा।
अती आदरे सज्जनाचा धरावा॥
जयाचेनि संगे महादुःख भंगे।
जनी साधनेवीण सन्मार्ग लागे ॥२०३॥मना संग हा सर्वसंगास तोडी।
मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी॥
मना संग हा साधना शीघ्र सोडी।
मना संग हा द्वैत निःशेष मोडी ॥२०४॥मनाची शते ऐकता दोष जाती।
मतीमंद ते साधना योग्य होती॥
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी।
म्हणे दास विश्वासत मुक्ति भोगी ॥२०५॥
समर्थ रामदासस्वामी यांच्या बद्दल थोडक्यात माहिती – Ramdas Swami Information in Marathi
समर्थ रामदासस्वामी यांनी लिहिलेले मनाचे श्लोक हे मानवी वृत्तीस अनुसरून असून त्यांनी या श्लोकांच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचे काम केलं आहे. समर्थ रामदासस्वामी आपल्या श्लोकांच्या द्वारे लोकांना समजवून सांगतात की, आपले वर्तन कसे असावे याबाबत स्वामिनी नी:संदिग्ध, सविस्तर आणि खूप मोलाचे मार्गदर्शन त्यांच्या या काव्यात केलं आहे.
स्वामिनी रचलेले शोक मानवी मनाला अनुसरून असल्याने त्यांनी या श्लोकांना ‘मनाचे श्लोक’ असे संबोधलं. तसचं, स्वामिनी लोकांना हे श्लोक आचरणात आणण्याचा बहुमोलाचा उपदेश दिला. मानवी मन हे खूप चंचल असल्याने ते एका ठिकाणी कधीच राहत नाही आणि मानव देखील आपल्या मनाप्रमाणे कृती करतात.
स्वामी आपल्या श्लोकातून सुचवितात की, हे सज्जन माणसा तू नेहमी भगवंताची भक्ती करीत रहा, तसचं, आपल्या अंगी असलेल्या सर्व वाईट वृत्ती, ज्या निंदनीय आहेत त्या सर्व गोष्टींचा त्याग करून चांगल्या संस्काराचा अंगीकार करण्यास सांगतात. जेणेकरून आपली सर्व लोकांकडून स्तुती होईल. अश्या प्रकारची माहिती या श्लोकांच्या माध्यमातून स्वामी देत आहेत.
समर्थ रामदासस्वामी यांच्या बद्दल सांगायचं म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या समकालीन महाराष्ट्राच्या भूमीस लाभलेले महान संत होते. समर्थ रामदासस्वामी यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीस शके १५३० साली (मार्च १६०८) रामनवमीच्या दिवशी जालना जिल्ह्यातील जांब या गावी झाला होता.
समर्थांचा जन्म रामजन्माच्या मुहूर्तावर म्हणजे माध्याह्नी झाला होता. तसचं, समर्थ हे प्रभू राम आणि हनुमान जी यांचे प्रखर उपासक देखील होते. समर्थांचे मूळ नाव ‘नारायण सूर्याजी ठोसर’ असून ते समर्थ सांप्रदायिक होते.
समर्थांचे ठोसर घराणे हे सूर्यदेवाचे उपासक होते. समर्थ सात वर्षांचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. रामदासस्वामी लहानपणापासून अतिशय हुशार, एक निश्चयी आणि खोडकर वृत्तीचे होते.
समर्थांचे वयाच्या बाराव्या वर्षीच लग्न ठरले होते, परंतु लग्नाच्या दिवशी ब्राम्हणाने सावधान म्हणताच आणि तो शब्द नारायणाच्या कानी पडताच त्यांनी आपल्या अंगावर परिधान केलेल्या केवळ दोन वस्त्रांनिशी मंडपातून पळ काढला आणि गावाजवळील खोल नदीच्या डोहात उडी मारली.
यानंतर, समर्थ हे प्रभू राम आणि हनुमान भक्त असल्याने त्यांनी ब्रह्मचार्य पत्कारले होते. यानंतर, समर्थ पंचवटी येथे जाऊन प्रभू रामाचे दर्शन घेतले. नंतर, नाशिक येथे राहून त्यांनी बारा वर्षे तश्चर्या केली. आपल्याला कोणी ओळखू नये याकरिता त्यांनी आपलं नाव बदलून रामदास असे ठेवले.
नाशिक नजीक टाकळी या ठिकाणी नंदिनी नदीच्या काठी असलेल्या उंच टेकडीवरील गुहेत राहून त्यांनी त्या ठिकाणी सुमारे बारावर्ष खूप कठीण तपश्चर्या केली. बारा वर्षाच्या तपश्चर्येनंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. समर्थांनी नाशिक येथे टाकळी या ठिकाणी हनुमान मूर्तीची स्थापना केली.
हनुमानजी हे शक्तीचे आणि बुद्धीचे देवता आहेत त्यामुळे आपण त्यांची नियमित उपासना केली पाहिजे हा त्यामागील त्यांचा मुख्य उद्देश होता. यानंतर समर्थांनी सुमारे बारा वर्ष भारत भ्रमण केले. भारत भ्रमण करीत असतांना त्यांना श्रीनगर येथे शिखांचे सहावे गुरु गुरु हरगोविंद सिंह यांचे दर्शन झाले.
समर्थांनी हरगोविंद सिंह यांच्या सोबत समाजात चालू असलेल्या दुर्धर परिस्थिती बद्दल चर्चा केली. तसचं, समर्थांनी हरगोविंद सिंह यांना प्रश्न केला की, आपण या तलवारी का हाताळतात तेव्हा त्यांनी उत्तर दिल की, एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी तलवार स्त्रियांच्या रक्षणासाठी तेव्हापासून रामदास स्वामी देखील आपल्या जवळ असलेल्या कुबळीत तलवार स्वरूपी एक गुप्ती ठेवत असत.
भारत भ्रमंती करून समर्थ महाराष्ट्रात आले, राज्यातील गावागावात जावून त्यांनी अनेक हनुमान मंदिरे स्थापित केली. तसेच युवकांना बल उपासनेचा संदेश देऊन व्यायाम शाळा स्थापित केल्या. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थ रामदासस्वामी यांचे शिष्य होते. त्यांनी महाराष्ट्रात सर्वप्रथम रामनवमी उत्सवाची सुरुवात केली. समर्थ रामदासस्वामी यांनी स्थापन केलेली हनुमान मंदिरे आज देखील राज्याच्या अनेक भागात अस्तित्वात आहेत. तसचं, त्यांनी लिखाण केलेली अनेक साहित्य आज देखील उपलब्ध आहेत.