Majhi Shala Nibandh in Marathi
प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेच वेगळच महत्व असते. ती शाळा ज्यामध्ये लहानपणी न जाण्यासाठी रडायचं आणि मोठ झाल्यावर त्याच शाळेच्या आठवणीने डोळ्यात पाणी येते. शाळेत असतांना सर्वांनाच आपले शिक्षक शाळेवर निबंध लिहिण्यासाठी सांगत असत बऱ्याच वेळी परीक्षेमध्ये सुद्धा शाळेवर निबंध लिहिण्यासाठी सांगण्यात यायचं. आज या ठिकाणी “माझी शाळा” या विषयावर निबंध लिहिणार आहोत, ज्यामुळे विद्यार्थांना माझी शाळा हा निबंध लिहिण्यासाठी मदत होईल.
“माझी शाळा” मराठी निबंध – Majhi Shala Nibandh Marathi
माझी शाळा : निबंध (१०० शब्द) – My School Essay in Marathi
माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा आहे. माझी शाळा पंचक्रोषीत खूप प्रसिद्ध आहे. शाळेची इमारत दोन मजली आहे. समोर मोठे क्रीडांगण आहे. आजूबाजूला छान हिरवीगार झाडे आणि बगीचा सुद्धा आहे. शाळेला निळा आणि पांढरा रंग दिलेला आहे.
माझ्या शाळेची वेळ सकाळी ७ ते ११ ची आहे. सकाळी ७ वाजता शाळेची घंटा वाजते. त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत आणि प्रार्थना म्हटली जाते. त्यानंतर शिक्षक सुविचार आणि एक बोधकथा सांगतात. नंतर वर्गात सोडले जाते. वर्गात आम्हाला शिक्षकांकडून शिकविले जाते. ९:३० वाजता डबा खायला सुटी मिळते.
दर शनिवारी आम्हाला खेळ खेळायला मैदानावर घेऊन जातात. तेथे विविध खेळ जसे कि, खो-खो, कबड्डी, लगोरी इ. खेळ खेळवले जातात. शिवाय पी. टी. देखील करायला सांगतात. माझी शाळा आजूबाजूच्या सर्व गावांत फार प्रसिद्ध आहे. दूरदूरवरून येथे विद्यार्थी प्रवेशाकरिता येतात. येथे अभ्यासाबरोबर खेळ आणि इतर जीवनावश्यक मूल्ये देखील शिकविली जातात.
अशाप्रकारे माझी शाळा मला खूप खूप खूप आवडते.
माझी शाळा : निबंध (३०० शब्द) – Majhi Shala Nibandh
खरं तर प्रत्येकालाच आपल्या शाळेचा अभिमान असतो. शाळा मग ती कशी पण असो, उंच मजल्यांची किंवा पडक्या भिंतींची महत्व तिच्या बांधकामाला नसून तिथे मिळणाऱ्या शिक्षणाला असते. आपल्याला शाळेमध्ये जे धडे शिकवले जातात, ते संपूर्ण आयुष्यात उपयोगी पडतात.
माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा आहे. येथे वर्ग १ ते १२ पर्यंत शिक्षण दिले जाते. प्रत्येक वर्गात अ, ब, क आणि ड असे वर्ग आहेत. शाळेची इमारत २ मजली असून येथे एकूण ५० वर्गखोल्या आहेत. यामध्ये १ संगणक वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा, क्रीडा वर्गखोली आणि शिक्षकांसाठी एक खोली आहे. शिवाय एक मोठा हॉल आणि प्रशस्त वाचनालय देखील आहे.
शाळेचे मुख्याध्यापक सर खूप प्रेमळ आणि मायाळू आहेत. दररोज सकाळी ते आमच्याशी संवाद साधतात. आमच्या अडचणी जाणून घेतात आणि योग्य मार्गदर्शन देखील करतात. शाळेतील इतर शिक्षकवृंद देखील छान आहेत. जो पर्यंत एखादा मुद्दा आम्हाला पूर्णपणे समाजात नाही, तो पर्यंत ते आम्हाला समजावून सांगतात. शिवाय एखादी गोष्ट समजावून सांगण्याची त्यांची पद्धत कुण्या दुसऱ्या शाळेत असेल, असे मला मुळीच वाटत नाही.
शाळेचे मैदान प्रशस्त आणि मोकळे आहे. या मैदानावर बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी इ. खेळ आम्हाला खेळवले जातात. शिवाय आजूबाजूच्या गावातील शाळांसोबत शालेयस्तरावरील खेळांचे सामने देखील आमच्या मैदानावर आयोजित केले जातात. आणि या सर्व स्पर्धांमध्ये आमची शाळा नेहमी प्रथम स्थानी असते.
शाळेचा आजूबाजूचा परिसर देखील छान आहे. शाळेच्या भिंतींवर रंगरंगोटी केलेली आहे. यामध्ये प्राण्यांची चित्रे, सुविचार, मानवी शरीराचे अवयव, देशातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ इ. चित्रे रेखाटलेली आहेत. शाळेचा परिसर अस्वच्छ होणार नाही याची काळजी आम्ही सर्व विद्यार्थी घेत असतो.
अशाप्रकारची काहीशी माझी शाळा. माझ्या शाळेचा मला अभिमान आहे आणि माझ्या शाळेवर माझे प्रेम आहे. मी पुढील आयुष्यात कुठल्याही महाविद्यालयात गेलो किंवा कितीही मोठा झालो तरी माझ्या शाळेला विसरणे अशक्यच आहे.
माझी शाळा निबंध (४०० शब्द) – Essay on My School in Marathi
माझी शाळा म्हणजे जिल्हा परिषद विद्यालय, परसवाडी. जेमतेम ५-६ वर्षांचा असताना पहिल्यांदा मी या शाळेत आलो. तेव्हा मला येथे येण्याचा फार काही आनंद झाला नव्हता. आजही तो दिवस आठवतो, त्या दिवशी मी शाळा सुटेपर्यंत नुसता रडत होतो. परंतु नंतर असे काही झाले कि मला शाळा आवडायला लागली आणि मी इथे रमू लागलो.
शाळेची इमारत ३ मजली, ज्यामध्ये एकूण ५० वर्गखोल्या आहेत. प्रत्येक खोलीमध्ये विद्यार्थ्यांना बसायला लोखंडी बाक, पंखे आणि स्मार्ट बोर्ड आहे. शाळेतील विविध कार्यक्रमांसाठी एक मोठा हॉल देखील आहे. याच हॉलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षीसवितरण आणि निरोपसमारंभ इ. कार्यक्रम पार पडतात. शिवाय प्रशस्त वाचनालय देखील आहे. या वाचनालयात छान-छान गोष्टींची पुस्तके, वृत्तपत्र आणि मासिके आम्हाला उपलब्ध करून दिली जातात.
माझ्या शाळेत वर्ग १ ते १० पर्यंत शिक्षण दिले जाते. शाळेची एकूण विद्यार्थी संख्या १५०० आहे. प्रत्येक वर्गाला एक वर्गशिक्षक आणि इतर विषयशिक्षक शिकवतात. शाळेतील शिक्षकवृंद एकूण ५० आहेत. यामध्ये एक मुख्याध्यापक, दोन उपमुख्याध्यापकांचा समावेश आहे. सर्व शिक्षक अतिशय प्रेमळ आणि मायाळू आहेत. सोबतच २० शिक्षकेतर कर्मचारी आहेत. यामध्ये सफाई कर्मचारी ज्यांना आम्ही मुले प्रेमाने दादा म्हणतो आणि काही कार्यालय कर्मचारी आहेत.
शाळेची वेळ सकाळी ७ ते १२ अशी आहे. यामध्ये २ सुट्या मिळतात. वर्षभर होणाऱ्या परीक्षांचे नियोजन ४ भागांत केलेले आहे. यामध्ये २ चाचणी परीक्षा आणि १ सहामाही तर १ वार्षिक परीक्षा घेण्यात येते. परीक्षेदरम्यान कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची योग्य काळजी शिक्षक घेतात. प्रत्येक परीक्षेमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो, जेणेकरून इतरांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे.
शाळेत २ संगणक वर्ग आहेत. येथे आम्हाला संगणक आणि आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल अवगत केले जाते. काळाची गरज ओळखून रोज १ तास आम्हाला नवीन गोष्टींबद्दल सांगितल्या जाते. इतकेच काय तर अवकाशात घडणाऱ्या विविध घटना पाहण्यासाठी एक भली मोठी अवकाश दुर्बीण शाळेत आहे. येथे सैद्धांतिक सोबत प्रात्यक्षिक सुद्धा घेतले जाते.
शिक्षणाबद्दल सांगायचे झाल्यास मागील ५ वर्षांपासून माझ्या शाळेचा निकाल १०० टक्के लागत आहे. शिवाय १० वी बोर्डाच्या परीक्षेत आमच्या जिल्ह्यातील प्रथम ३ विद्यार्थ्यांमध्ये माझ्या शाळेतील १ विद्यार्थी असतो. वादविवाद स्पर्धा, प्रश्नोत्तर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भाषणे कुठलिही स्पर्धा असो, माझी शाळा कुठंच मागे नाही आहे.
माझ्या शाळेत पुस्तकातील शिक्षणाव्यतिरिक्त इतर सामाजिक मूल्ये देखील शिकवली जातात. आपण कसे वागावे, कसे बोलावे, दुसऱ्यांना नेहमी मदत करावी हे सर्व आम्हाला सांगितल्या जाते. यासोबतच कार्यानुभवच्या तासाला टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून विविध वस्तूंची निर्मिती शिकवली जाते. प्रत्येक शनिवारी शारीरिक शिक्षणाचे धडे दिले जातात. यामध्ये पी.टी., विविध मैदानी खेळ आणि स्पर्धांचा समावेश असतो.
माझ्या शाळेत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि सहलीचा समावेश असतो. या दरम्यान विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, विज्ञान दिन, शिक्षक दिन हे सर्व दिन खूप उत्साहात आणि आनंदात साजरे केले जातात.
एकंदरीत काय तर माझी शाळा सर्व दृष्टिकोनातून बेस्ट आहे. म्हणूनच माझी शाळा मला खूप आवडते आणि माझे माझ्या शाळेवर खूप प्रेम आहे.