Margashirsha Guruvar Vrat Katha in Marathi
वर्षातून एकदा येणारे मार्गशीष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणारे व्रत वैकल्य. तर आजच्या लेखात आपण मार्गशीष महिन्यात केल्या जाणाऱ्या गुरुवार च्या व्रताबद्दल आजच्या लेखात माहिती पाहणार आहोत, कि हे व्रत का केले जाते. आणि या मागे कोणती कथा आहे, ज्या कथेचे पठन मार्गशीष महिन्याच्या गुरुवारी केल्या जाते. त्या कथेला वाचून भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात,तर चला पाहूया या कथेविषयी.
मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत कथा – Mahalaxmi Vrat Katha Marathi
।। श्री महालक्ष्मी व्रतकथा ।।
ऊतू नये, मातु नये,घेतलेला वसा टाकू नये, हे तत्व सांगणारी कथा म्हणजे श्रीमहालक्ष्मी व्रतकथा होय. अशी ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची कहाणी! ऐका तर भाविक नरनारींनो धनसंपत्ती देणारे हे महालक्ष्मीचे व्रत ! सौराष्ट्र देशात भद्रश्रवा नावाचा राजा होता. त्याची पत्नी सुरतचंद्रिका व त्याचे उदरी सात मुले व आठवी शामबाला नावाची कन्या होती.
पूर्वजन्मी हे एक वैश्यकुळीचे उभयता पतीपत्नी होते. अतिशय दारिद्र्यात राहून जीवन जगणारा हा वैश्य व्यसनाधिन असल्याने आपल्या पत्नीला खूप त्रास द्यायचा. त्यामुळे ती जीवनास कंटाळून जीव देण्यासाठी विहिर शोधत असता श्रीलक्ष्मी देवी एका म्हातारीचे रुप घेऊन आली व तिला लक्ष्मीव्रत सांगितले. तिने आचरण केले. उद्यापनाच्या दिवशी त्यांच्यावर साक्षात लक्ष्मीदेवीच प्रसन्न होवून ती सुखी झाली व पुढील जन्मी ते वैश्य भद्रश्रवा राजा व ती स्त्री सूरतचंद्रिका राणी होऊन ऐश्वर्य भोगू लागले.
एकेदिवशी देवीला वाटले आपण हिला मागील जन्मी केलेल्या श्रीलक्ष्मी व्रताचे माहात्म्य सांगावे. परंतु तीने म्हातारी वेषातील श्रीलक्ष्मीस न ओळखता अपमान केला. त्यामुळे श्रीलक्ष्मी म्हणाली, तू मागील जन्मी घेतलेला वसा या जन्मी टाकून दिला म्हणून तुला शाप देते की तुझ वैभव नष्ट होईल आणि तसेच घडले. राज्य संपले, दारिद्र्यात जीवन घालवू लागली. परंतु तिची कन्या शामबाला हीने लक्ष्मीव्रत केले तसेच दासीने पण श्रीमहालक्ष्मीव्रत केले म्हणून शामबालेचा मालाधर नावाच्या राजपुत्राशी विवाह झाला व दासी सुद्धा ऐश्वर्यवंत झाली.
शामबालेला संपत्ती मागण्याकरीता भद्रश्रवा राजा गेला तेव्हा तीने सन्मान करुन मोहरांचा हंडा सोबत दिला. सूरतचंद्रिकेने उघडून पाहताच तिला त्यात कोळशे दिसले. त्यामुळे ती उमजली की, श्रीलक्ष्मीमातेच्या कोपाने हे सर्व घडले. मग ती स्वत: शामबालेकडे जावून ही गोष्ट सांगू लागली. तेव्हा ती म्हणाली, आई तू महालक्ष्मीच्या कोपाला बळी पडलेली आहेस.
तु पुन्हा श्री महालक्ष्मी व्रत करावे. त्याप्रमाणे तीने भक्तिभावाने श्रीलक्ष्मी व्रत केले. तेव्हा देवी प्रसन्न होऊन गेलेले राज्य परत मिळाले. असे हे श्री महालक्ष्मी व्रतकथा भक्तांना सुखसंपत्ती देणारी व्रतकथा आहे. आपल्या आईस पुन्हा वैभव प्राप्त झालेले पाहून शामबाला आईच्या भेटीकरीता गेली असता तीने सौराष्ट्राची ओळख म्हणून समुद्रात उत्पन्न होणारे मीठ आपल्या सोबत घेतले.
मालाधरा राजाने तू माहेरातून काय आणले ते पाहताच त्याला मीठ दिसले म्हणून त्याने याबाबत शामबालेला पृच्छा केली. तेव्हा ती म्हणाली माझे माहेर सागराकिनारी असल्यामुळे तेथील ओळख म्हणजे हे मीठ आहे. कारण मिठाशिवाय कुण्याही अन्नाला चव येत नसते म्हणून ते अमृतच सर्वात मौल्यवान आहे. ज्या देवीमुळे आपण ऐश्वर्यमंत झालो ती लक्ष्मी सुद्धा सागरोत्पन्न असून मीठ सुद्धा सागरोत्पन्न असून माझ्या माहेरची अमूल्य ठेव आहे. सर्व ऐश्वर्यामध्ये ते श्रेष्ठ आहे. ऊतू नये मातू नये, घेतलेला वसा टाकू नये, हेच मी माझ्या माहेरापासून शिकले आहे. ते राजाला पटले व तो म्हणाला माहेर व सासर गोड रहावे, बेचव होवू नये, चवीदार व्हावे. हेच यातून मी निवडले. धन्य आहेत तू, माझी पत्नी म्हणून मला तुझ्यामुळेच गौरव वाटतो.
श्रीमहालक्ष्मी व्रत कधीही विसरु नये हीच या मागील पूर्वपिठीका आहे. अशी ही महालक्ष्मी व्रताची कहाणी सर्व व्रतस्थांचे जीवन सुफळ आणि सफल करो हीच साठा उत्तराची कहाणी एका लक्ष्मीव्रताने ऐश्वर्यवंत होवून सर्वांच्या मनोकामनांची फलश्रुती होवोत! जय महालक्ष्मी!!.
या कथेचे पठन केल्याने भक्तांच्या मनोकामना माता लक्ष्मी पूर्ण करतात, आपण हि मार्गशीष महिन्याच्या गुरुवारी आपल्या घरी या कथेचे पठन करू शकता सोबतच मार्गशीष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करू शकता, या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवत असतात, आणि लक्ष्मी मातेची पूजा करून, कथेचे पठन शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात. हे व्रत केल्याने मनातील इच्छा, पूर्ण होतात, घरामध्ये सुख शांती लाभते. तर आपणही या व्रताला करू शकता.
आपल्याला सुद्धा आपल्या घरी सुख,शांती, तसेच मनातील सर्व इच्छा आकांशा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने करावे, श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावरही आशिर्वाद कायम ठेवेल, तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या कथेला आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.