Janjira Fort Information in Marathi
आपल्या महाराष्ट्र राज्याला मोठ्या प्रमाणात समुद्र किनारपट्टी लाभलेली असल्याने साहजिकच या सागरी किनाऱ्यांच्या संरक्षणासाठी पूर्वीच्या काळी अनेक जलदुर्गांची निर्मिती केल्या गेली. या जलदुर्गांपैकी असाच सृष्टी सौंदर्याने आणि चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला किल्ला म्हणजे ‘जंजिरा’! हा जलदुर्ग छत्रपती शिवरायांना आणि संभाजी महाराजांना देखील शेवटपर्यंत जिंकता आला नाही.
रायगड जिल्ह्यातील ‘मुरुड’ या गावी असलेला मुरुड-जंजिरा हा जलदुर्ग अभेद्य ठरला आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड हे लहानसे गाव पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्राला जोडलेले गाव असून मुरुड पासून साधारण पाच की.मी. अंतरावर राजापुरी गाव आहे. राजपुरीच्या पश्चिमेला मुरुड-जंजिरा हा जलदुर्ग समुद्रातील एका बेटावर बांधण्यात आला आहे.
जंजिरा किल्ल्या विषयी माहिती – Janjira Fort Information in Marathi
मुरुड जंजिरा किल्ल्याचा इतिहास – Murud-Janjira Fort History in marathi
जंजिरा या शब्दाचा अर्थ पाहिल्यास ‘समुद्राने वेढलेला किल्ला‘ असा या शब्दाचा अर्थ होतो. हा किल्ला अखेरपर्यंत अभेद्य आणि अजिंक्य ठरला. कित्येकांनी प्रयत्नांची शर्थ केली परंतु त्यांना हताश व्हावे लागले. महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवरायांना देखील या जलदुर्गाचा सूर गवसला नाही.
महाराजांनी मुरुड-जंजिरा मिळविण्यासाठी या जलदुर्गाच्या जवळ 5 ते 6 की.मी. अंतरावर पद्मदुर्ग नावाचा जलदुर्ग बांधला होता. कोकण प्रदेशावर वर्चस्व स्थापित करण्या करता जंजिरा स्वराज्यात आणणं अत्यंत महत्वाचं असल्याचे महाराजांना ठाऊक होते, महाराजांनी पूर्ण तयारीनिशी तीन ते चार मोहिमा देखील आखल्या, तरी देखील जंजीऱ्यावर सत्ता काबीज करणे हे महाराजांचे स्वप्नं अर्धवट राहिले. जंजिरा किल्ल्यावरून आज आपल्याला हा पद्मदुर्ग दृष्टीस पडतो.
त्यांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराजांनी तर या किल्ल्यापर्यंत मार्ग तयार करून किल्ला सर करण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यांना या मोहिमेत निराशा हाती आली. ई.स. 1567 ते 1571 या दरम्यान या जलदुर्गाचे बांधकाम बुऱ्हानखान याने केले होते. या किल्ल्याचे बांधकाम अत्यंत भक्कम असून चारी बाजूंनी समुद्राने वेढलेला, चांगल्या दर्ज्याच्या तोफा (कलाल बांगडी नावाची तोफ लांबवर वेध घेणारी आणि मोठ्या आकाराची होती) यामुळे जंजिरा कायम अजिंक्य राहीला.
जंजिरा हा शब्द जझीरा या अरबी भाषेतील शब्दावरून आलेला आहे. जझीरा म्हणजे ‘बेट’. कोळी लोकांची या ठिकाणी वस्ती होती, त्या लोकांना लुटारूंचा आणि समुद्री चाचे यांचा त्रास होई. त्यांचा त्रास होऊ नये म्हणून स्थानिक कोळ्यांनी जमिनीत लाकडाचे ओंडके रोवून मेढेकोट तयार केला होता परंतु निजामांचा पिरमखान गरजवंत व्यापाऱ्याचे सोंग घेऊन आत शिरला आणि सर्व कोळी जमात अमानुषपणे नष्ट केली.
नंतर ताब्यात घेतलेल्या मेढेकोट वर बुऱ्हान खानची नेमणूक करून त्या ठिकाणी मजबूत असा जंजिरा जलदुर्ग उभारला. ई.स. 1617 मधे बादशहा कडून सिद्धी अंबर ला या किल्ल्याची जहांगिरी मिळाली.
या सिद्धी अंबर ला जंजिरा चा मूळ पुरुष मानले जाते. हे सिद्धी अफ्रिकेतील अतिशय क्रूर हबशी म्हणून ख्याती मिळवून होते. ब्रिटीश शासकांच्या काळात हे सिद्धी वजीर आणि पुढे नवाब म्हणून ओळखले गेले. या सिद्धीना 11 तोफांच्या सलामीचा मान होता. सिद्धी सरदारांनी कायम या किल्ल्यावर आपले वर्चस्व अबाधित राखत हा किल्ला अजिंक्य राखला. अखेर पर्यंत जंजिरा कुणाच्या देखील हाती लागू दिला नाही.
जंजिरा किल्ल्याची रचना – Architecture of Murud-Janjira Fort
मुरुड समुद्र किनाऱ्या पासून जंजिरा हा किल्ला साधारण 3 की.मी. आत बांधण्यात आला आहे. हा जलदुर्ग बावीस एकर जमिनीवर पसरला असून त्याची तटबंदी तब्बल 40 फुट उंच आहे. जंजिरा किल्ल्याचे मुख्यद्वार पूर्व दिशेकडे आहे. एकूण 19 बुरुज असून गोलाकार असे बुरुज आज देखील भक्कम स्थितीत आहेत. किल्ला पहाताना अरबी भाषेतील शिलालेख दिसतात. पीर पंचायतन हे धार्मिक स्थळ देखील या ठिकाणी आहे. जंजिरा या किल्ल्याचे सागराच्या दिशेने देखील एक द्वार आहे.
या जलदुर्गावर एकूण 514 तोफा असल्याचे दाखले आढळतात. कलालबांगडी, लांडकासम, चावरी या तोफा आज देखील बघायला मिळतात. उत्तर दिशेला एक चोर दरवाजा देखील आहे. जंजिरा जलदुर्गाच्या मध्यभागी पाच मजली भव्य वाडा असून आज तो जीर्ण अवस्थेत उभा असला तरीही बघण्यासारखा आहे.
गडाच्या चारही बाजूंना खाऱ्या पाण्याचा समुद्र असतांना सुद्धा किल्ल्यातील लोकांना गोड पाणी मिळावे या हेतूने गोड पाण्याचा तलाव बांधण्यात आला असून त्यात आज देखील पाणी आहे. किल्ल्यातील रहिवाश्यांचे तीन मोहल्ले येथे राहत असत. दोन मुस्लिम मोहल्ले आणि एक इतरांसाठी. या किल्ल्यात फार मोठी वस्ती रहात असल्याचे पहाताना लक्षात येते. राजाश्रय संपल्या नंतर ही वस्ती येथून उठली.
जलदुर्गाच्या तटबंदी वरून दूरवर पसरलेला विस्तीर्ण समुद्र आणि कोकणाचा सुंदर परिसर मनोहारी दिसतो. तटबंदी वरून पद्मदुर्ग आणि सामराजगड देखील दिसतात. पद्मदुर्ग हा किल्ला महाराजांनी जंजिरा जिंकता यावा म्हणून बांधला होता, परंतु छत्रपती शिवरायांना आणि संभाजी महाराजांना देखील या जलदुर्गावर विजय मिळवता आला नाही. 1617 ते 1947 अशी तब्बल 330 वर्ष जंजिरा जलदुर्ग अजिंक्य होता. या ठिकाणी त्यांच्याच पिढ्यांनी राज्य केलं. 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर 3 एप्रिल 1948 ला हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झालं.
जंजिरा किल्ल्यावर कसे जाल – How to Reach Janjira Fort
जंजिरा हा जलदुर्ग पाहण्यासाठी राजापुरी येथून शिडाच्या होड्या सुटतात.
जंजिरा किल्ल्यावर खाण्याची सोय – Hotels on Janjira Fort
जलदुर्गावर खाण्या-पिण्याची सोय नसल्याने खाद्यपदार्थ सोबत घेऊन जाणे योग्य.