Essay on Lockdown in Marathi
कोरोना काळात जगाला एक नवीन शब्द माहित झाला तो म्हणजे लॉकडाऊन. लॉकडाऊन म्हणजे काय? तर लॉकडाऊन म्हणजे टाळेबंदी. होय स्वतः ला आपल्या घरात बंधीस्थ करून घेणे म्हणजे लॉकडाऊन. संपूर्ण जगाला हा एक नवीन विषय म्हणून समोर आला. चला तर आज आपण याच विषयावर निबंध लिहणार आहोत.
लॉकडाऊन विषयावरील माहिती निबंध – Essay on Lockdown in Marathi
लॉकडाऊन विषयावरील निबंध – Lockdown Nibandh
1. लॉकडाऊनचे फायदे व तोटे – Advantages and Disadvantages of Lockdown Essay
परिचय :
लॉकडाऊन म्हणजे अशी परिस्थिती कि ज्यामध्ये आपण जिथे असेल तिथेच थांबणे. या काळात आपण बाहेर पडणे अपेक्षित नसते. सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा, कार्यक्रम इ. या काळात बंद ठेवण्यात येतात. देशावर एखादे संकट जेव्हा येते तेव्हा लॉकडाऊन करण्यात येते. कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण जगाने हा लॉकडाऊन अनुभवला.
संपूर्ण जग हे कोरोना महामारीने ग्रासलेले असतांना, या वरील उपाय काय ते कोणालाच माहित नव्हते. परंतु ज्ञात असलेला एकमेव उपाय म्हणजे स्वतः ला दुसऱ्यांपासून अलिप्त ठेवणे. पण ऐकतील ती लोकं कसली. मग शासनाने या लोकांना जबरदस्तीने घरात कैद करण्यासाठी जे शस्त्र उपसले ते म्हणजे लॉकडाऊन.
या लॉकडाऊनमुळे आपल्याला फायदे आणि तोटे दोन्ही सहन करावी लागली आहेत.
लॉकडाऊनचे फायदे – Advantages of Lockdown
- पूर्वी सर्व घरातील सर्व लोक आपआपल्या कामांत व्यस्त असायची. कोणालाच कोणाशी बोलायची सवड नसायची. पण या काळात सर्व जण सोबत असल्याने प्रत्येकाने एकमेकांसाठी वेळ काढला. एकत्र बसून जेवण करणे, वेगवेगळे खेळ खेळणे, आपले छंद जोपासणे हे सर्व आपण अनुभवले. कुणी नाच शिकले तर कुणी जेवण बनविणे. कुणी चित्रे काढली तर कुणी गाणे गायला शिकले.
- याच काळात टीव्ही वर रामायण, महाभारत, शक्तिमान सारख्या अनेक जुन्या मालिका देखील प्रक्षेपित करण्यात आल्या. यांमुळे प्रत्येकाने आपले जुने आयुष्य अनुभवले. या अगोदर प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असायचे. पण आता सर्वांनी निवांत आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवला.
- या व्यतिरिक्त सर्व रस्ते सामसूम असल्याने गाड्यांनी होणारे प्रदूषण देखील खूप कमी झाले होते. हवेची गुणवत्ता सुधारली होती. शिवाय कारखाने बंद होते. त्यामुळे नद्यांमध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी थांबले होते. पर्यायाने नदीचे पाणी देखील स्वच्छ झाले होते.
- गुन्हेगारी, अपघात कमी झाले.
लॉकडाऊनचे तोटे – Disadvantages of Lockdown
- लॉकडाऊनचे जसे खूप फायदे झालेत तसेच यामुळे तोटे सुद्धा झालेत. या मध्ये सर्वात जास्त तोटा झाला बाहेरगावी काम करणाऱ्या मजुरांचा. दळणवळणाची साधने बंद असल्याने या मजुरांना आपल्या गावी पायपीट करत जावे लागले. या मध्ये स्त्रिया आणि सुद्धा समावेश होता. कित्येकजण तर हजारो किलोमीटर पायी चालून आपल्या गावी पोहोचलेत.
- लहान व्यावसायिक, दुकानदार आणि हातावर पोट असलेले तर कित्येक दिवस भुकेल्या पोटी झोपी गेले. हातगाडीवाले, फेरीवाले यांच्यासाठी तर हा काळ कर्दनकाळ ठरला. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले.
- देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली.
- मुलांच्या शाळा बंद असल्याने त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शिक्षणावर झाला. ऑनलाइन शिक्षण सुरु होते खरे पण ज्यांच्याकडे मोबाईल किंवा इंटरनेट नव्हते अशा विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.
- कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक परिवार रस्त्यावर आले.
- लोकांची मानसिक स्थिती बिघडली.
लॉकडाऊनची नियमावली – Rules of Lockdown
१. या काळात कुणी घराच्या बाहेर पडू नये.
२. सर्व प्रकारच्या बाजारपेठा, दुकाने हे बंद ठेवावीत.
३. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि दुकानांना परवानगी असेल.
४. सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि खाजगी कार्यक्रम साजरे करण्यास मनाई असेल.
५. पर्यटन स्थळे, प्रार्थनास्थळे इ. बंद ठेवावीत.
लॉकडाऊन वर निबंध – Lockdown var Nibandh
2. मी अनुभवलेला लॉकडाऊन – Mi Anubhavlela Lockdown Marathi Nibandh
मार्च महिना परीक्षेचा महिना. शाळेत सर्वत्र परीक्षेची धूम सुरु होती. अभ्यासाची लगबग सुरु होती. काही दिवसांनी परीक्षा सुरु होणार होती. तितक्यात एके दिवशी माहित पडले कि लॉकडाऊन लागणार आहे. हा शब्द मला परिचित नव्हता. मग शाळेला सुट्ट्या देण्यात आल्या, बाहेर पडण्यावर बंदी आली आणि हळू हळू लॉकडाऊन या शब्दाचा अर्थ उमजत गेला.
परिचय :
लॉकडाऊन म्हणजे अशी परिस्थिती कि ज्यामध्ये आपल्याला घराच्या बाहेर पडण्यास मनाई असते. या काळात एक प्रकारे संचारबंदी लागू करण्यात येते. अत्यावश्यक कामांशिवाय कुठल्याच कामांना परवानगी दिल्या जात नाही. मोट्या संकटाच्या किंवा महामारीच्या काळात लॉकडाऊन करण्यात येते.
लॉकडाऊनचा प्रभाव हा संपूर्ण जगावर पडला. काही गोष्टींवर चांगला तर काहींचा अनुभव हा फार वाईट. एकंदरीत या काळात काय महत्वाचे आणि काय गौण हे मला चांगल्या प्रकारे कळले. घरातील मोठ्यांना कधीच आम्हा लहान मुलांसाठी वेळ मिळत नव्हता. पण या काळात आम्ही संपूर्ण कुटुंब एकत्र होतो.
सोबत जेवण करणे, कॅरम खेळणे, गाण्याच्या भेंड्या आणि अजून बरेच जुने खेळ या वेळी आम्ही खेळलो. आई बाबांनी जुन्या आठवणींना उजाळा देत अनेक किस्से आणि गोष्टी सांगितल्या. शिवाय टीव्ही वर देखील अनेक जुन्या मालिका सुरु करण्यात आल्या. मी संपूर्ण कुटुंबासमवेत रामायण, महाभारत या मालिका बघितल्या.
परंतु याच काळात बातम्यांमधून हृदय विदारक चित्र समोर येत होते. असंख्य मजूर आपल्या गावी पायपीट करत जात होते. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा सुद्धा समावेश होता. कारखाने बंद असल्यामुळे कित्येकजण बेरोजगार झाले होते. देशाची अर्थव्यवस्था कमजोर झाली होती.
या सर्वांमध्ये एक सकारात्मक बाब म्हणजे या काळात निसर्गाने आपले गत वैभव प्राप्त केले होते. शुद्ध हवा आणि स्वच्छ नद्या या वेळी पाहायला मिळाल्या. प्रदूषण नसल्याने दूरवरून सुंदर पर्वत पाहता येऊ शकत होते.
लॉकडाऊनमध्ये काय करावे व काय करू नये याची एक नियमावली सरकार तर्फे जाहीर करण्यात आली होती. ती खालील प्रमाणे.
- विनाकारण घराच्या बाहेर पडू नये.
- सर्व प्रकारच्या बाजारपेठा आणि दुकाने हि बंद राहतील.
- अत्यावश्यक सेवा जसे कि, दवाखाने, मेडिकल इ. सुरु ठेवण्याची परवानगी असेल.
- हॉटेल्स, खानावळ, पर्यटन आणि प्रार्थना स्थळे पूर्णतः बंद ठेवण्यात येतील.
- धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि खाजगी कार्यक्रमांवर बंदी असेल.
असा एकंदरीत लॉकडाऊनचा अनुभव मी घेतला होता. या काळात कुटुंब म्हणजे सर्वस्व हि जाणीव मला झाली. सर्व एकत्र असल्यामुळे मिळणारा आनंद हा काही वेगळाच असतो, हे आता मला कळून चुकले आहे.
नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न :
१. लॉकडाऊन म्हणजे काय ?
उत्तर : जेव्हा देशावर एखादे संकट येते तेव्हा लोकांना आहे तिथेच सुरक्षित ठेवणे आणि बाहेर पडू न देणे या परिस्थितीला लॉकडाऊन म्हणतात.
२. भारतात लॉकडाऊन का करण्यात आला ?
उत्तर : कोरोना विषाणूच्या कारणामुळे भारतात लॉकडाऊन करण्यात आले.
३. लॉकडाऊन च्या काळात काय अपेक्षित असते ?
उत्तर : या काळात आपण ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी सुरक्षित राहणे व बाहेर न पडणे अपेक्षित असते.
४. लॉकडाऊनला मराठी शब्द काय आहे ?
उत्तर : टाळेबंदी.