Bhima Koregaon in Marathi
भीमा कोरेगाव इथं घडलेल्या हिंसाचाराला पहाता-पहाता 2 अडीच वर्षं होत आली. 1 जानेवारी 2018 रोजी घडलेल्या या हिंसाचार प्रकरणात अनेक वाद विवाद देखील घडले, पण पूर्वी घडून गेलेल्या या संदर्भातील इतिहासाची पानं उलगडताना नेमकं काय सापडतं आपल्याला? काय होतं नेमकं भीमा कोरेगाव प्रकरण?
भीमा कोरेगाव येथे असलेल्या विजयस्तंभाजवळ 1 जानेवारीला दरवर्षी दलित बांधव विजय दिवस साजरा करण्यासाठी एकत्र येतात. दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटीश सैनिकांमध्ये 1 जानेवारी 1818 ला झालेल्या युद्धाला 2018 साली 200 वर्षं पूर्ण होणार होती. या निमित्तानं हजारो नागरीक एकत्र आले होते.
मात्र या कार्यक्रमाला हिंसाचाराचं गालबोट लागलं, हिंसक घटना घडल्या, दगडफेक झाली. पुण्यानजीक भीमा कोरेगाव, पाबळ, शिक्रापूर येथे घडलेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले, 3 जानेवारीला प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं.
काय आहेत भीमा कोरेगाव प्रकरणातील नेमकी तथ्य – Bhima Koregaon History in Marathi
भीमा कोरेगावचा इतिहास – Bhima Koregaon History Marathi
- 1818 साली दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वात 28 हजार मराठा सैन्य ब्रिटीशांवर हल्ला करण्यासाठी पुण्याला निघाले होते, त्यावेळी 800 महार सैनिकांशी त्यांचा आमना-सामना झाला. ही 800 सैनिकांची तुकडी पुण्यात जाऊन ब्रिटीशांना साथ देणार होती, 2000 सैनिक पाठवून बाजीराव पेशवांनी या तुकडीवर हल्ला चढविला.
- फ्रांसिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वात ईस्ट इंडिया कंपनीच्या या 800 जणांच्या तुकडीने सलग 12 तास मराठ्यांशी प्रखर झुंज दिली. अखेर मराठ्यांना माघार घ्यावी लागली, या तुकडीत अधिकतर सैनिक महार समुदायाचे होते.
- जेम्स ग्रांट डफ यांच्या ‘अ हिस्ट्री ऑफ द मराठाज’ या पुस्तकात या युद्धाचा उल्लेख आढळतो. या लेखकाच्या मते भीमा नदीच्या तीरावर झालेल्या या युद्धात महार समुदायाच्या सैनिकांनी 28000 मराठा सैनिकांना रोखून धरले. या लढाईत पेशव्यांचे 500-600 सैनिक मारले गेले.
- परंतु या युद्धा संबंधी दलित आणि मराठा समुदायाची वेगवेगळी मत-मतांतरं पहायला मिळतात. काही जाणकारांच्या मते महारांसाठी ही इंग्रजांसोबतची लढाई नव्हतीच तर स्वतःच्या अस्मितेची लढाई होती. कारण पेशव्यांच्या शासन काळात महारांना अस्पृश्यतेची वागणूक दिली जात होती.
- काही इतिहासकारांच्या मते महारांना अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली जात होती नगरात येतांना त्यांच्या कमरेला एक झाडू बांधलेला असायचा, त्यामुळे ते चालतांना त्यांची पाऊलं देखील पुसल्या जावीत हा त्यामागचा हेतू असायचा.
- हे अत्याचार कमी की काय म्हणून त्यांच्या गळ्यात एक भांडं लटकवलं जायचं आणि थुंकताना त्यांना त्यातच थुंकावं लागायचं कारण त्यांच्या थुंकण्याने सवर्ण अपवित्र व्हायला नकोत. विहिरीतून पाणी काढण्यात देखील त्यांच्याशी भेदभाव केला जायचा.
- एकीकडे काही इतिहासकारांची मतं या युद्धाविषयी वेगळी आहेत. त्यांच्या मते त्यांनी मराठ्यांना नव्हे तर ब्राम्हणांना पराजित केलं होतं. ब्राम्हणांनी ही स्पृश्य-अस्पृश्यता दलितांवर थोपली होती त्यामुळे दलित अत्यंत नाराज होते. महारांनी आवाज उचलल्याने ब्राम्हण नाराज झाले त्यामुळे महार ब्रिटीशांना जाऊन मिळाले.
- आपण इतिहासात डोकावून पाहिल्यास असं कळतं की महार आणि मराठ्यांमध्ये पूर्वी कधीही मतभेद झाले नाहीत. मराठ्यांचं नांव याकरता घेण्यात येतं कारण ब्राम्हणांनी मराठ्यांच्या हातून पेशवाई काबीज केली होती आणि त्यामुळे मराठा नाराज होते. ब्राम्हणांनी जातीभेद संपवला असता तर कदाचित हे युद्ध झालंच नसतं.
- भारत सरकारनं या महार रेजिमेंट च्या सन्मानार्थ 1981 साली एक टपाल तिकीट देखील प्रकाशित केलं.
- भीमा कोरेगाव या ठिकाणी इंग्रजांनी उभारलेला हा विजयस्तंभ त्या युद्धात प्राण गमावलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आला आहे.
- 1927 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विजयस्तंभाला भेट देण्याकरता आले होते आणि त्यांनी तमाम बौद्ध बांधवांना येथे दरवर्षी एकत्र येण्यास सुचवले होते.
तर हि माहिती होती भीमा कोरेगाव ची आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला कळवा तसेच असेच नवनवीन लेख वाचण्यासाठी जुळून रहा, माझीमराठी सोबत.
धन्यवाद!