Ek Adarsh Gaon Patoda
मंडळी आपल्यापैकी बऱ्याच जणांना आयुष्य सरत आलं तरी जगण्याचा अर्थ गवसत नाही, का जगतो आहोत माहिती नाही. रोज सकाळ होते रात्र होते आणि दिवस असेच संपत रहातात…जेंव्हा जाण्याची वेळ येते तेंव्हा आयुष्याचा लेखाजोखा समोर मांडलेला दिसतो आणि बाकी उरते ते फक्त शून्य !
मला वाटतं आयुष्यात आल्या नंतर आपण प्रत्येकानं एक तरी (करता आली तर असंख्य) काम असं करून जावं नं की अभिमानाने आणि ताठ मानेने सांगता येईल की हो हे मी केलंय!
आपल्या पैकीच एक असलेले, अगदी सर्वसामान्य भासणारे, परंतु आपल्या कर्तुत्वाने ओळखले जाणारे औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा गावाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील. यांना पाहिलं की नक्कीच आपल्यात एक जोश संचारतो आणि सकारात्मकता काय कायापालट घडवू शकते असं याचं जिवंत उदाहरण डोळ्यापुढे उभं रहातं.
बदल हा एका क्षणात घडत नाही किंवा तो एका रात्रीतून देखील घडत नाही परंतु तो घडवायची इच्छाशक्ती त्यांच्या मनात होती आणि ती त्यांनी अमलांत आणली.
एक आदर्श गाव… पाटोदा – Mahiti Eka Aadarsh Gavachi…. Patoda
त्यांच्या विषयीचा एक छोटासा किस्सा सांगतो…
गावातील एका व्यक्तीचा (बाबुराव आगळे) मृत्यू झाला, अंत्यसंस्कार करायचे तर गावात साधी स्मशानभूमी नाही. वैतागून ग्रामस्थ सरपंचांकडे गेले सरपंचानी क्षण दोन क्षण विचार केला आणि बोलले “गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर अंत्यसंस्कार करूया”. तयारी करण्यात आली आणि गावातील त्या मयत ग्रामस्थाला चक्क गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर अग्नी देण्यात आला. रहदारी थांबली…गावात येणारी वाहतूक थांबली…प्रशासनाला खडबडून जाग आली. पोलीस, महसूल विभाग आयुक्त पाटोदा गावी आले तेंव्हा त्यांना समजलं की गावात स्मशानभूमी नाही.
दफ्तरी नोंद असून देखील स्मशानभूमीचा ठावठिकाणा नाही, सरपंचानी पाठपुरावा केला आणि स्मशानभूमीची अडचण संपली. अश्या तऱ्हेने प्रशासनाला दखल घेण्यास भाग पाडणारे हे गाव म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा आणि समस्या निकाली काढणारे सरपंच होते भास्करराव पेरे !!!
आणखीन एक किस्सा नक्की सांगावा असाच…
गावात स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरले घरोघरी शौचालय बांधण्याचे ग्रामपंचायतीने नक्की केले काही जणांच्या विरोधाला संमतीत बदलून उद्दिष्ट पूर्णत्वाकडे वाटचाल सुरु झाली. एक कुटुंब मात्र ऐकायला तयार नव्हते, कुटुंब दोघांचे नवरा आणि बायको.
घरी शौचालय नाही, उघड्यावर जाण्यास बंदी. पुढे त्यांच्यावर पाळत ठेवल्या गेली, घरातील स्त्री मध्यरात्री 2 वाजता घराबाहेर पडली, सरपंचांशी नजरानजर झाली ते काहीही न बोलता निघून गेले. दुसऱ्या दिवशी ती महिला सरपंचांना भेटायला आली, माफी मागितली ‘चार दिवस द्या म्हणाली’ आणि तिच्याकडे देखील शौचालय आले. पाटोदा स्वच्छ ग्राम झाले!
‘इच्छा तेथे मार्ग‘ असं म्हणतात ते उगीच नाही
औरंगाबाद शहरा पासून अवघ्या 7 की.मी. अंतरावर असलेलं ग्राम पाटोदा. गावातील लोकसंख्या साधारण 3350. पुरुष 1654 आणि स्त्रिया 1696 . गावाचे एकूण क्षेत्रफळ 150 चौ.की.मी. असून शेतजमीन ही अधिकतर बागायती आहे. गहू, ऊस, कापूस ही मुख्य पिकं घेतली जातात.
एका सामान्य गावाचे रुपांतर देखण्या आणि स्मार्ट गावात करणाऱ्या सरपंच भास्करराव पेरे यांच्या ग्रामपंचायतीची इमारत शहरातील महानगर पालिकेच्या इमारतीला देखील लाजवेल अशी आहे. (आपण दारात उभं राहिल्यास काचेचे दार आपोआप उघडते…नळाखाली हात धरल्यावर पाणी आपोआप हातावर येतं…भरपूर झाडं हिरवागार परिसर)
आज महाराष्ट्रात 27000 ग्रामपंचायती आहेत आणि त्यात पाटोदा ग्रामपंचायत पहिल्या क्रमांकात गणली जाते त्याचे एकमेव कारण म्हणजे कष्ट करण्याची तयारी आणि प्रामाणिकपणा! या जोरावर पाटोदा ग्रामपंचायतीनं आपलं वेगळेपण जपलं.
पाटोदा गावाचे आगळेवेगळेपण – Speciality of Patoda Village
- ग्रामविकासाच्या अभ्यासाकरता केंद्रसरकारच्या वतीनं भारतातील 11 गावांमध्ये पाटोदा ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली.
- गावात एक गिरणी असून 100% कर भरणाऱ्या कुटुंबाला संपूर्ण वर्षभर या गिरणीतून दळण मोफत दळून मिळतं.
- एकूण 4 प्रकारचं पाणी गावकऱ्यांसाठी उपलब्ध आहे
- गरम पाणी,साधं पाणी वापरण्यासाठी.
- पिण्यासाठी RO पाणी.
- प्रत्येक कुटुंबाला 20ली. RO पाणी रोज मोफत
- साधं आणि वापरण्याकरीता 24 तास 2 वेगवेगळ्या नळांद्वारे पाणी उपलब्ध
- ATM या सोयीच्या माध्यमातून 80 रु. 12000 ली पाणी मिळतं.
- सौर उर्जेवर तापवण्यात येणारं पाणी सकाळी 5 ते 9 या वेळेत मोफत उपलब्ध असतं.
- ओला आणि कोरडा कचरा वेगवेगळ्या बादल्यांद्वारे घंटागाडीच्या मदतीनं गोळा होतो. त्याचं कंपोस्ट खत तयार केलं जातं.
- संपूर्ण पाटोदा गाव CCTV कॅमेऱ्याच्या निगराणी खाली असून गावात 42 CCTV लावण्यात आले आहेत.
- बाहेरचे नागरीक गावातील मंदिराला देणगी अथवा दान न देता ग्रामपंचायतीला देणगी देतात. संपूर्ण महिन्याचा जमाखर्च सूचना फलकावर प्रत्येक महिन्यात प्रसिद्ध केला जातो.
- ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळावं या हेतूने जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलाय.
- गावात जागोजागी पिण्यासाठी थंड पाण्याचे 12 कुलर आहेत.
- हात धुण्यासाठी ठिकठिकाणी वॉश बेसिन तयार करण्यात आले आहेत.
- अधिकारी कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्यात समन्वयासाठी मोबाईल ग्रुप कार्ड आहे.
- शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी आहे.
- वृद्ध नागरिकांना बसता यावे यासाठी जागोजागी खुर्च्या आणि बाके आहेत.
- गावात जेवढी लोकसंख्या आहे त्या दुप्पट फळझाडे लावण्यात आली आहेत.
- गावात जमा होणारे सांडपाणी शेतीकरता वापरण्यात येतं.
- औरंगाबाद शहराच्या सांडपाण्यावर 1025 हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे.
- गावाची स्मशानभूमी एवढी सुरेख असून त्या जागी सुंदर अशी बाग तयार करण्यात आली आहे. या जागी दुपारच्या वेळी गावकरी निवांत वेळ घालवण्यासाठी येतात.
- ग्रामपंचायतीच्या वतीने सामुहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं.
- प्रत्येक ग्रामस्थाचा वाढदिवस साजरा केल्या जातो.
- गावात सौरदिवे असून बायोगेस च्या वापराला प्रोत्साहन देण्यात आलं आहे.
- संपूर्ण पाटोदा गावात पेव्हर ब्लॉक बसविलेले आहेत.
- विशेष म्हणजे गावात कुठलही राजकीय पक्ष नसून खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका पार पडतात.
- पाटोदा ग्रामपंचायत चे वार्षिक उत्पन्न हे 30 लाख रु. आहे.
- आदर्श ग्राम पुरस्कार, तंटामुक्त ग्राम, निर्मल ग्राम सारखे असंख्य पुरस्कार गावाला मिळालेले आहेत. अनेक पुरस्कारांवर मोहोर उमटविणाऱ्या पाटोदा गावाची वाटचाल डिजिटल गावाकडे होऊ लागली आहे.
- पाटोदा गावाला इतके पुरस्कार मिळाले आहेत की आता ग्रामपंचायत कार्यालयात एक स्वतंत्र खोलीच पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे.
आज पाटोदा गावाची वाटचाल सर्वांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास कसा साधता येईल या दृष्टीने होऊ लागली आहे…अनेक गावकरी आज पाटोदा गावाला भेट द्यायला, त्यांनी साधलेला सर्वांगीण विकास पहायला, त्यांचा आदर्श घ्यायला येतात. फक्त परत जातांना त्यांच्या सोबत असावी ती दीपस्तंभाप्रमाणे भासणाऱ्या भास्करराव पेरे यांच्यासारखी इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आशावाद!!!