Babasaheb Purandare in Marathi
महाराष्ट्राचा ध्यास…महाराष्ट्राचा श्वास… महाराष्ट्राचं दैवत… प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर ज्यांचं व्यक्तिमत्व अक्षरशः कोरलं गेलं आहे असे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला माहित नाही असं एकही घर नाही असा एकही व्यक्ती नाही.
पण शिवाजी महाराज ज्यांच्या ओजस्वी वाणीने सर्वांना अधिक कळले… समजले त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना कोण ओळखत नसेल बरं? बाबासाहेब पुरंदरे यांनी आपलं अवघं आयुष्य एखाद्या समिधेसारखं शिवरायांना अर्पण केलं होतं .
छत्रपती शिवरायांचा इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची तळमळ बाबासाहेबांमध्ये त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत होती. ओघवत्या शैलीत शिवचरित्र मांडून महाराजांना जनसामान्यांपर्यंत बाबासाहेबानी ज्या पद्धतीने पोहोचवले त्यामुळे प्रत्येक जण शिवाजी महाराजांच्या कार्याशी आणि इतिहासाशी मनापासून जोडला गेला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे – Babasaheb Purandare Marathi
बाबासाहेब पुरंदरे यांचा अल्पपरिचय – Babasaheb Purandare Information in Marathi
नाव | बळवंत मोरेश्वर पुरंदरे |
जन्म (Birthday) | २९ जुलै १९२२ |
जन्मस्थळ | सासवड ( पुणे ) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
मृत्यू | १५ नोव्हेंबर २०२१ |
परिचय | इतिहास संशोधक आणि साहित्यिक |
टोपणनाव | बाबासाहेब पुरंदरे |
बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म पुण्याजवळील सासवडचा. बाबासाहेबांना शिवशाहीर म्हणून ओळख मिळाली ती त्यांच्या निस्सीम शिवभक्तीमुळे…
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बाबासाहेबांना इत्यंभूत माहिती होती कारण महाराजांचे संपूर्ण चरित्र त्यांनी अभ्यासले होते. स्वतः लेखक… कवी… नाटककार…इतिहास अभ्यासक …दिग्दर्शक…आणि मराठी साहित्यिक असलेल्या बाबासाहेबांनी इतिहासावर विस्तृत लेखन केलं.
ऐतिहासिक गडकिल्ले, महाराजांशी संबंधित वास्तुंना वारंवार भेटी देऊन त्यांचा सखोल अभ्यास शिवशाहिरांनी केला.
महाराजांच्या जीवनातील प्रसंग बाबासाहेबांना मुखोद्गत होते. शिवचरित्राशी त्यांची नाळ घट्ट जोडली गेली होती. महाराजां संदर्भात बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेलं लेखन महाराष्ट्रात अनेक माध्यमातून प्रदर्शित झालं आहे.
शिवकालीन किल्ले, नाणी, वस्तू, इतर ऐवज यांच्या निरीक्षणासाठी बाबासाहेब इतिहास संशोधक गो. नि. दांडेकर यांच्या समवेत बराच काळ गडकिल्ल्यांवर व्यतीत करून अधिकाधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत असत.
बाबासाहेब पुरंदरें यांचे साहित्य – Babasaheb Purandare Books
राजा शिवछत्रपती, पुरंदऱ्याची दौलत, शेलारखिंड, सिंहगड, प्रतापगड, पुरंदऱ्यांचा सरकारवाडा, महाराज, राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, शेलारखिंड ( या कादंबरीवर आधारित मराठी चित्रपट ‘सर्जा ‘ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता ), पन्हाळगड, आग्रा, अशी बाबासाहेब पुरंदरेंची साहित्यसंपदा फार व्यापक आहे. शिवचरित्रावर बाबासाहेबानी जवळजवळ बारा हजारांवर व्याख्यानं देऊन समाज जागृतीचं मोठं कार्य केलं.
‘जाणता राजा’ हे छत्रपती शिवरायांच्या जीवनावरचे भव्यदिव्य नाटक बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रत्यक्षात आणले. वास्तवात या नाटकाला अस्तित्वात आणण्याचा कुणीही १०० वेळा विचार करेल अश्या या जाणता राजा नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन बाबासाहेबांनी केले होते. हत्ती, घोडे, उंट, आणि शेकडो कलाकारांचा फौजफाटा असलेल्या या नाटकाचे १२५० च्या वर प्रयोग झाले.
बाबासाहेबांची स्मरणशक्ती, लेखन कौशल्य, शिवाजी महाराजांविषयीचा अभ्यास, ऐतिहासिक संशोधन, सामाजिक जागृतीचा ध्यास, सगळंच अफाट आणि अलौकिक म्हणता येईल असंच होतं. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या ‘शिवचरित्र’ या ग्रंथाच्या एकूण १६ आवृत्त्या निघाल्या. म्हणजे साधारण ५ लाखांहून अधिक घरांमध्ये हा शिवग्रंथ पोहोचला आहे.
बाबासाहेब पुरंदरें यांना मिळालेले पुरस्कार – Babasaheb Purandare Awards
- बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याची व्याप्ती पाहून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने सातारच्या राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले यांनी शिवशाहिरांचे कौतुक केले.
- बाबासाहेबांना २०१९ सालचा पदमविभूषण पुरस्कार बहाल करण्यात आला.
- २०१६ साली बाबासाहेबांना गार्डियन – जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे.
- १९ ऑगस्ट २०१५ साली महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करण्यात आला.
- इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल बाबासाहेबांना २०१३ साली डी.लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
- २०१२ सालचा प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार देखील शिवशाहिरांना देण्यात आला आहे.
बाबासाहेब पुरंदरे याचं निधन – Babasaheb Purandare Death
वयाची शंभरी पार केलेल्या बाबासाहेबांनी १५ नोव्हेंबर २०२१ ला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने थोर शिवचरित्रकार गमावला असला तरी त्यांच्या साहित्य संपदेतून ते कायम आपल्याला भेटत राहतील हे निश्चित … !!