Ajintha Leni Information in Marathi
प्राचीन भारतात वास्तुकला, शिल्पकला तसेच नगररचना ही केवळ अद्भुतच नव्हती तर तत्कालीन विषम परिस्थितीत सुध्दा कलेचा विकास किती उत्तुंग होता ह्याची कल्पना आपल्याला हडप्पा व मोहेंजदडो येथील पुरातत्व अवशेष व पुरावे ह्यावरून कळून येते. शिल्पकलेचा वापर व विकास हा प्राचीन भारतासोबतच संपूर्ण विश्वातच जवळपास एकसारखाच झाल्याचा आभास इतिहासातून स्पष्टपणे होतो. तत्कालीन शिल्पकला व वास्तुकला यावर समकालीन कला, संस्कृती सोबतच धार्मिक मान्यता व जीवनपद्धती याचा प्रभाव जाणवतो.
अश्याच शिल्पकलाकृतीचा अद्भुत संगम आपल्याला महाराष्ट्रातील अजिंठा येथील वास्तू व शिल्पकलेत दिसून येतो, शिल्पकलेला भिंती वरील चित्रशैलीची सुंदर जोड व तसेच पाषाण मूर्तीला मानवी भावनांचे तंतोतंत भावआविष्कार ह्याची सांगडच निर्मात्याने घातल्याचा अनुभव येतो. अश्याच भावविभोर करणाऱ्या भव्य शिल्प कला कृतीची आपण येथे माहिती घेणार आहोत.
“अजिंठा लेणी” चित्र व शिल्पकलेची मन थक्क करणारी कलाकृती – Ajintha Leni Information in Marathi
अजिंठा शिल्पकलाकृती निर्मिती संबधित पुरावे – Ajintha Leni History in Marathi
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा ह्या स्थळी ही शिल्पलेणी कलाकृती निर्मित झालेली आहे. लेणी निर्मितीच्या बाबतीत इतिहासकार व पुरातत्व विभाग ह्यांच्यात मत-मतांतरे आहेत, काही जाणकारांच्या मते अजिंठा लेणीचे निर्मितीकार्य ईसवी सन पूर्व २०० साली सुरुवात होवून ईसवी सन २०० साली प्रथम चरणा पर्यंत काही लेणींचे खोदकाम व शिल्पकला विकसित झाली आहे, ह्यातील द्वितीय चरणाचे निर्मिती कार्य ईसवी सन सहाव्या शतकांत व अंतिम निर्मिती कार्य सातव्या शतकांत झाले आहे.
जरी विद्वानांच्या मतांत भिन्नता असली तरी तत्कालीन शासकांची कार्यशैली पाहता महाराष्ट्रात सातवाहन, वाकाटक घराणे सातव्या शतकांत शासन करीत होते व सातवाहन हे कलाप्रेमी होते त्यांच्या कालखंडात अनेक कलाकृती,भव्य वास्तू तसेच नगररचना झाल्याचे इतिहासात दाखले आहेत. त्यामुळे ह्या सर्व मान्यता सत्य ठरतात.
तत्कालीन परिस्थती बघता भारतात गौतम बुध्द यांचा उदय सोबतच गुप्त राजघराणे व त्यांच्या काळात झालेला कलाविकास ह्याचा संबध अजिंठा येथील शिल्प कलाकृती सोबत जुळून येतो, अजिंठा येथील भिंतीचित्रे व गौतम बुध्द यांच्या पाषाण मुर्त्या ह्या सर्व गोष्टीची साक्ष देतात.
अजिंठा लेणी – संपूर्ण शिल्पकला वर्णन
अजिंठा लेणीचे निर्मितीकार्य एका घनदाट जंगलाने व्यापलेल्या घोड्याच्या नालाकृती मजबूत पाषाण डोंगर रचनेला कोरून करण्यात आलेले आहे. ह्यामध्ये आजूबाजूला अतिविस्तीर्ण झाडे तसेच दुर्गम झुडपांनी व्यापलेला परिसर आढळतो. एकूण लेण्यांची संख्या २९ असून बाजूलाच नदीने निर्मित सुंदर धबधबा आहे साधारणतः नदीच्या भू-सपाटीपासून लेण्यांची उंची ३५ फुट ते ११० फुट इतक्या उंचीची आहे.
पाषाण कोरून चैत्यगृह तसेच बौध्द मठ व विहारे तयार करण्यात आलेली आहे. अजिंठा येथील सुंदर चित्रशैली व रंगाचा कलात्मकतेने केलेला वापर ह्यातून तत्कालीन कारागिरांचा कलेचा दृष्टीकोन व त्यातून भावाविष्कार पध्दती अद्भुत होती ,मूर्तीवरील सजीव वाटणारे भाव तसेच शिल्पाला कोरून त्याला दिलेली रेखीवता पाहतांना मनाला एक विलक्षण आनंद देऊन जाते.
भिंतीचित्रशैली मध्ये गौतम बुद्धाच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना ह्या चित्र रूपाने रेखाटण्यात आलेल्या आहे ज्यामध्ये सुंदर चित्रकलेसोबत मनोहारी रंगाच्या छटा आपल्याला बघावयास मिळतात. संपूर्ण २९ गुफेमध्ये काही गुफा ह्या मठ व स्तूप रुपात आहे तर काही गुफेत चित्रशैली रेखाटण्यात आलेल्या आहेत.
अजिंठा लेणी बद्दल रोचक माहिती – Interesting Facts about Ajanta Caves
- अजिंठा येथील लेण्यावर गौतम बुध्द व तत्कालीन बुध्द विचार तसेच मतप्रवाहाचा पराभव स्पष्ट दिसून येतो यामध्ये गौतम बुध्द केंद्रस्थान असून त्यांचे जीवन, शिक्षा, विचार व अनुसरण पद्धती शिल्पकला व चित्रकलेतून साकारण्यात आलेली आहे.
- दाट जंगल व दुर्गम डोंगर शृंखला असूनसुध्दा तत्कालीन परिस्थितीचा विचार करता अशी भव्य कलाकृती साकारण्यात आली हे नक्कीच देशांतील व विदेशातील पर्यटकांना भारतीय प्राचीन कलेची नोंद घेण्यास भाग पाडते.
- १९८३ सालापासून युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेने ‘अजिंठा लेणी ‘ ला वैश्विक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.
- २००० वर्षापूर्वीचे भिंती चित्रकला निर्मिती असूनसुध्दा आजही रंगांची गुणवत्ता उत्कृष्ट दर्जाची पहावयास मिळते.
एकंदरीतच सांगायचे झाल्यास शिल्पकला, चित्रकला व वास्तुनिर्मिती ह्या सर्वांचे मिश्रण अजिंठा लेणी मध्ये दिसून येते, अश्या अमुल्य कलाकृती चिरकालीन आपल्याला तत्कालीन कालाकुशलता व संस्कृतीची माहिती देत राहतील यात नक्कीच काही दुमत नाही. आम्हाला आशा आहे दिलेली माहिती नक्कीच आपल्याला एकदा तरी अजिंठा भेटीला जाण्यास सहाय्यक ठरेल व आपण मनाला थक्क करणारा हा कला आविष्कार बघाल व मंत्रमुग्ध व्हाल.