Vayu Pradushan Information in Marathi
निसर्गाला भेडसावत असणारी एक खूप गंभीर समस्या म्हणजे प्रदूषण, मग ते कोणत्याही प्रकारचे असो. तसे प्रदूषणाचे खूप प्रकार आहेत. जसे कि जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, मृदा प्रदूषण आणि वायू प्रदूषण.
यांपैकी आज आपण वायू प्रदूषणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जसे कि:
- वायू प्रदूषण म्हणजे काय?
- त्याचा मनुष्यावर काय आणि कसा परिणाम होतो?
- त्यामागची नेमकी कारणे काय?
- ते कमी करण्याचे उपाय काय?
वायू प्रदूषणाविषयी संपूर्ण माहिती – Air Pollution Information in Marathi
वायू प्रदूषण म्हणजे काय? – What is an Air Pollution?
वातावरणातील हवेची गुणवत्ता खालावणे म्हणजे वायू प्रदूषण होय. हवा हा आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. दैनंदिन जीवनात कळत न कळत आपल्याकडून असे काही घटक हवेत सोडल्या जातात कि जे आपल्या शरीराला हानिकारक असतात.
हवेतील प्राणवायू हा घटक आपण दिवसातून कित्येकदा आपल्या शरीरात घेतो. किंबहुना त्यामुळेच आपण जिवंत आहोत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु हा प्राणवायूच जर दुषित असेल तर मग….
आपण एखादी गोष्ट घ्यायला जातो तेव्हा आपण ती खूप वेळा तपासून बघतो नंतरच ती घेतो. पण जो वायू आपण रोज शरीरात घेतो तो कसा तपासून बघणार? हवा आपल्याला दिसत नाही. परंतु प्रदूषित हवा जर आपण शरीरात घेतली, तर त्याचे खूप गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात.
वायू प्रदूषणाचे मानवावर होणारे परिणाम : Effects of Air Pollution on Human Health
वायू किंवा हवा काही पण म्हणा पण आपल्यालाला जर जगायचे असेल तर याची खूप गरज आहे. वायू शिवाय मनुष्य जगूच शकत नाही. कारण श्वसनासाठी आपल्याला वायुचीच गरज असते.
वाढत्या कार्बन डाय ऑक्साइड मुळे सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करणारा ओझोन वायूचा थर क्षतिग्रस्त होत आहे. या मुळे जागतिक तापमानवाढी सारखे संकट निर्माण होत आहे.
जर हि वायू प्रदूषित झाली तर ती श्वसना द्वारे आपल्या फुफ्फुसात प्रवेश करेल नंतर मग फुफ्फुसाचे रोग, दम्याचा त्रास, श्वसननलीकेचे रोग, आणि इतर गंभीर समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागेल.
एखाद्या नातेवाईकाला जर दवाखान्यात भेटायला गेला तर तिथे प्राणवायू (Oxygen) च्या एका सिलेंडर ची किंमत जाणून घ्या. नंतर कळणार कि रोज निसर्गातून आपल्याला किती तरी लक्ष रुपयांची वायू एकदम मोफत मिळत आहे.
तेव्हा मोफत मिळणाऱ्या या वायू ची किंमत करायला शिका. पण म्हणतात ना कि मोफत मिळणाऱ्या वस्तूची कदर कोणी करत नाही. ते अगदी सत्य आहे. म्हणूनच मोफत मिळणाऱ्या या वायुला तुम्ही, मी, आणि आपण सर्व कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रदूषित करत आहोत.
वायू प्रदूषणाची कारणे – Causes of Air Pollution
वायू प्रदूषणाची काही महत्वाची कारणे खालीलप्रमाणे :
१. वाढत चाललेले उद्योग क्षेत्र : भारत हा विकसनशील देश आहे हे आपल्याला माहित आहे, पण या विकासामुळे निसर्गाचा होत चाललेला ऱ्हास मात्र कोणालाही का दिसत नाही.
मोठमोठ्या कारखान्यातून निघणारा हानिकारक धूर हा सर्रासपणे वातावरणात सोडला जातो. याशिवाय औष्णिक वीज केंद्रामधून निघणारा धूर आणि रासायनिक उद्योगामधून तयार होणारे सहायक घटक हे हवेत सोडले जातात. हे सर्व मानवनिर्मित प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत. यांमुळे हवेचा दर्जा खालावतो आणि हवा प्रदूषित होते.
२. वाहनांचा वापर : जुन्या काळी दिसणारी सायकल आता आपल्याला क्वचितच पाहायला मिळते. कारण आजकाल सर्वांकडे स्वतःचे वाहन आहे. वाहन आले म्हणजे त्या पासून निघणारा धूर पण आलाच. आणि याच धुरामुळे वायू प्रदूषण सुद्धा होते. आज रस्त्याने निघाल्यानंतर चौकाचौकात आपल्याला वाहतूक कोंडी दिसते. सिग्नल वर सुद्धा लोक गाड्या बंद करत नाहीत. गाडी बंद करून सुद्धा आपण काही प्रमाणात हे प्रदूषण कमी करू शकतो.
३. वृक्षतोड : उद्योगांच्या शोधामध्ये गावाकडील लोक हे शहराकडे वळत आहेत. त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी शहराच्या आजू बाजूला असलेले मोठे मोठे जंगले तोडून त्या ठिकाणी इमारती बांधल्या जात आहेत. वृक्षतोडीमुळे मृदेची धूप होते त्यामुळे मातीचे बारीक सारीक कन हे हवेत पसरतात आणि हवा प्रदूषित होते.
४. कचरा जाळण्यामुळे : मोठ्या मोठ्या शहरातून खूप सारा टाकाऊ कचरा निघत असतो. रोजचा कचरा हा कितीतरी मेट्रिक टन मध्ये असतो. हा कचरा जमा केल्या जातो व डम्पिंग ग्राउंड वर नेऊन टाकला जातो. अशा या कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता तो तिथेच जाळण्यात येतो. मग त्या मध्ये सर्वच प्रकारचा कचरा असतो. कचरा हा उघड्यावर जाळल्या मुले सुद्धा वायू प्रदूषण घडून येते.
५. शेती संबंधीचे वायू प्रदूषण : काही शेतकरी आपल्या शेतीतील पिक काढून घेतल्यानंतर पिकांचे राहिलेले अवशेष शेतातच जाळून टाकतात. रासायनिक खते किंवा औषधींची फवारणी करताना बारीक तुषार हवेत पसरतात. शेताची नांगरणी करताना उडणारा मातीचा धूर, या सर्व कारणांमुळे हवा प्रदूषित होते.
६. जागतिक लोकसंख्या वाढ : मानवांद्वारा बाहेर सोडल्या जाणाऱ्या उच्छवासात कार्बन डाय ऑक्साइड सोडला जात असतो. हा वायू हवा प्रदूषित करतो. लोकसंख्या वाढीमुळे जास्त प्रमाणात कार्बन डाय ऑक्साइड बाहेर सोडला जातो. म्हणून लोकसंख्या वाढ हा वायू प्रदूषणाचा एक मुख्य घटक आहे.
७. नैसर्गिक कारणे : जंगलातील वणवा, ज्वालामुखीतून निघणारी राख, आणि कार्बन डाय ऑक्साइड सारखे हानीकारक वायू, यांसारखे काही नैसर्गिक घटक देखील वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरतात.
दलदलीच्या प्रदेशात वनस्पती सडून त्यापासून मिथेन वायू तयार होतो. हा वायू हवेच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरतो.
वायू प्रदूषण कमी करण्याचे उपाय – How to Reduce Air Pollution
- उद्योग क्षेत्रांतून निघणारा रासायनिक धूर कमी करण्यासाठी योग्य त्या उपकरणांचा किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. वातावरणात धूर सोडण्या आधी त्यावर प्रक्रिया करून तो शुद्ध करणे शक्य असेल तर ते करावे.
- जिथे शक्य असेल तिथे सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. असे केल्याने खूप साऱ्या वाहनांतून निघणारा धूर कमी होऊन प्रदूषण सुद्धा कमी होईल.
- वृक्षतोड थांबवावी व सार्वजनिक वनीकरण सारख्या कार्यक्रमांना चालना द्यावी. नवीन इमारती बांधतांना वृक्ष लागवड किंवा बागेसाठी राखीव जागा सोडण्याची अट घालावी.
- टाकाऊ कचरा न जाळता त्याची विल्हेवाट कशी लावल्या जाईल, त्या बद्दल विचार करावा.
- शेती संबंधी जे अवशेष जाळण्यात येतात ते न जाळता त्या पासून खत तयार करणारे तंत्रज्ञान वापरावे.
- लोकसंख्या वाढीला आळा घालणे.
- अपारंपरिक उर्जा स्रोतांचा वापर वाढविणे.
- जनजागृती अभियान राबविणे.
- शासनाद्वारा वायू प्रदूषण विरुद्ध कठोर कायदे तयार करणे.
तर या सर्व उपायांचा वापर करून आपण वायू प्रदूषण कमी करू शकतो. प्रदूषनाची हि समस्या आपल्यालाच मिळून सोडवावी लागेल, कारण ती निर्माण सुद्धा आपल्या मुळेच झाली आहे. पर्यावरणाचे रक्षण काळाची गरज बनली आहे. जर आपण तसे केले नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगण्यासाठी आपल्याला तयार राहावे लागेल.
नेहमी विचारल्या जाणारी प्रश्ने (FAQs) :
१. वायू प्रदूषणाची मुख्य करणे कोणती ?
उत्तर : कारखान्यांमधून निघणारा धूर, जंगल तोड, वाहनांचा धूर, ज्वालामुखीतून निघणारी राख इ. वायू प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत.
२. वायू प्रदूषणाला आळा घालण्याचे उपाय कोणते ?
उत्तर : वृक्ष लागवड, सार्वजनिक वाहनांचा वापर करणे, उघड्यावर कचरा न जाळणे, लोकसंख्या वाढ थांबविणे इ. उपाय अवलंबून आपण वायू प्रदूषण कमी करू शकतो.
३. वायू प्रदुषणासाठी विरुद्ध काही कायदे आहेत का ?
उत्तर : होय. ‘Air Act (Prevention and Control of Pollution) 1981’.
४. हवेची गुणवत्ता कशी तपासल्या जाते ?
उत्तर : हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘वायू गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index)’ चा उपयोग केला जातो.
५. वायू गुणवत्ता निर्देशांका वरून आपल्याला काय समजते ?
उत्तर : हा एक निर्देशांक आहे जो हवेची गुणवत्ता दर्शवितो. यावर ० – ५०० असे अंक दिलेले असतात. ज्या हवेचा निर्देशांक ० – ५० मधे असतो ती शुद्ध हवा तर ३०१ – ५०० निर्देशांकाची हवा धोकादायक असे समजल्या जाते.
६. मानवी आरोग्यावर वायू प्रदूषणाचे काय परिणाम होतात ?
उत्तर : वायू प्रदूषणाचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात जसे कि, फुफ्फुसाचे आजार, हृदयासंबंधीचे आजार, श्वसननलीकेचे आजार, अस्थमा इ.