Kandariya Mahadeva Temple Information in Marathi
भारतीय वास्तुकला ही जगमान्य आकर्षण ठरली आहे, अश्या वास्तूंना आकर्षक बनविण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे ती म्हणजे तत्कालीन मान्यता व जीवनपद्धती ,कुशल शिल्पशैली व कलेवरचे प्रेम हा एक जणू या सर्वांचा एका अर्थाने परिपाक होय. शिल्प कलेबद्दल बोलायचे झाल्यास भारताचा इतिहास हा सर्वात जास्त शिल्पकलेने नटल्या सारखा वाटतो. ज्यामध्ये लेणी, मंदिरे, किल्ले परंपरा, भव्य संगमवर वास्तू, शिलालेख, थडगे इत्यादींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
धार्मिक दृष्ट्या वास्तू कलेबाबत समग्र भारताचा विचार करता चहूबाजूंनी सुंदर शिल्पकला व वास्तू निर्मिती झाल्याचे स्पष्ट होते, ज्यात दक्षिणेकडील द्रविड मंदिर शिल्प शैली व उत्तरेकडील स्तूप, संस्कृत भाषेतील श्लोक शिलास्तंभ इत्यादींचा इतिहासात दाखला उपलब्ध होतो.
आज आपणाला अश्याच एका सुंदर व ऐतेहासिक मंदिराची माहिती या लेखातून देणार आहोत, जे मध्ययुगीन भारतातील एक अति सुंदर व पावन असे स्थळ म्हणून जगप्रसिध्द आहे. गुफेचे किंवा गुहेचे महान दैवत अश्या नावाने या मंदिराला संबोधन आहे, कंदर म्हणजे गुफा किंवा गुहा त्यामुळे ह्या शिव मंदिराला कंदारीया महादेव मंदिर असे नाव देण्यात आले होते.
“कंदारीया महादेव मंदिर” कलात्मकतेने नटलेले सुंदर शिव मंदिर – Kandariya Mahadeva Temple Information in Marathi
मंदिर निर्मितीचा इतिहास व प्रमुख शासक – Kandariya Mahadeva Temple History
कंदारीया महादेव मंदिर हे मध्ययुगीन भारतातील निर्मित एक मंदिर आहे, भारतातील मध्य प्रदेश राज्यातील खजुराहो परिसरातील हे एक भव्य असे मंदिर आहे ज्याची निर्मिती चंदेल राजवंशातील राजा विद्याधर ह्यांच्या शासनकाळात झाली होती, राजा विद्याधर यांचे ईसवी सन १००३ ते ईसवी सन १०३५ ह्या काळात ह्या राज्यावर शासन होते.
एकेकाळी खजुराहो हे चंदेल राजवंशाची राजधानी होती व त्यांच्या काळात अनेक मंदिरे व इतर वास्तूंचे सुध्दा बांधकाम झाले होते ज्यामध्ये सूर्य, विष्णू, शक्ती इत्यादी परंपरेतील मंदिरे बांधल्या गेली होती, परंतु ईतर सर्व मंदिरामध्ये कंदारीया महादेव मंदिर हे अतिशय भव्य व कलात्मकदृष्ट्या विशेष असे बांधल्या गेले आहे.
विद्याधर चंदेल वंशातील अतिशय प्रबळ व कुशल राजा होते ज्यांनी मोहम्मद गजनी ह्या आतंकी लुटारूला दोनदा युद्धामध्ये हतबल करीत माघारी परतवले होते, सोबतच चंदेल वंशाचे विरोधी ईतर राजांचा विद्याधर यांनी पराभव केला होता व या सर्व विजयाचे श्रेय शिव शंकराला अर्पण करण्याच्या उद्देशाने राजाने ह्या भव्य व अतिशय सुंदर मंदिराची निर्मिती केली होती.
मंदिराच्या भव्य मंडपावर तत्कालीन शिलालेख कोरून ठेवण्यात आले आहे ज्यामध्ये राजा विद्याधर यांच्या नावाचा उल्लेख ‘विरीम्दा’ असा आहे.
भव्य मंदिराच्या बांधकामाविषयी महत्वाच्या बाबी – Kandariya Mahadeva Temple Architecture
कंदारीया महादेव मंदिर बांधकामाची सुरुवात ही जवळपास ४ मीटर इतक्या उंचीच्या पायावर करण्यात आली होती, ज्यावर संपूर्ण मंदिर पर्वताच्या आकाराचे बांधण्यात आले आहे व अनेक छोट्या मोठ्या विभागात विभागल्या गेले आहे ज्यांची अंतर्गत रित्या एकमेकांशी जोडणी केली गेली आहे.
चतुष्कोणी मुख्य प्रवेश द्वारालगत कक्षाला अर्धमंडप असे नाव आहे जो मजबूत शीला स्तंभावर उभा आहे व अत्यंत भरीव व कोरीव कामाने सुशोभित असा आहे. मध्य भागात अत्यंत विशाल असा कक्ष असून जो पूर्णतः मध्य भागातील भव्य शीला स्तंभावर उभा आहे ज्याला मंडप असे संबोधण्यात येते.
मंडप कक्षातून आतील अत्यंत दाट अंधार असलेल्या कक्षाकडे जाण्यास मार्ग आहे, आतील अंधाऱ्या कक्षाला गर्भगृह असे नाव आहे व या गर्भगृहातच भगवान शंकराचे अत्यंत सुंदर व भव्य असे संगमरवराचे शिवलिंग आहे.
संपूर्ण मंदिराचे आतील व बाहेरील बांधकाम अत्यंत मजबूत ग्रेनाईट च्या दगडाने व वाळूने करण्यात आले आहे व ज्यावर अतिशय सुंदर असे कोरीव नक्षीकाम केलेले आहे व सोबतच जवळपास ९०० शिलालेख कोरलेले आहे. मंदिराचा कळस अत्यंत सरळ व टोकदार असून मेरू पर्वतासारखा आकार मंदिराला असल्याचा उल्लेख अनेक जागी इतिहासात आहे.
अश्या सुंदर मंदिराला युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्रदान केलेला आहे. गर्भगृहात शिवलिंगाचे दर्शन घेतांना गुहेत असल्याचा भास होतो म्हणून सुध्दा ह्या मंदिराला गुहेतील महान दैवत ह्या नावाने ओळख प्राप्त आहे.
अश्या सुंदर ऐतेहासिक वास्तूला एकदा अवश्य भेट देण्याची नक्कीच हा लेख वाचल्यावर आपली मनोमन इच्छा झाली असेल,आशा आहे आपल्याला दिलेली माहिती नक्कीच आवडली असेल. आमचे असेच ईतर माहितीपर लेख अवश्य भेट देऊन वाचा.