भारताच्या प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक इतिहासाचे अवलोकन केले असता एक गोष्ट स्पष्ट होते की स्थापत्य कलेचा प्रचार प्रसार भारतात फार जुना आहे. प्राचीन ते आधुनिक असा कालखंड पाहता चित्रकला, मूर्तीकला, शिल्पकला व वास्तुकला ह्यावर भारतातील मान्यता व संस्कृती सोबतच परकीय कला व संस्कृतीचा प्रभाव जाणवतो.
नगररचनेत राजघराण्यातील व्यक्तींची निवास व कार्यालये याकरिता भक्कम चिरेबंदी असलेलेया किल्ला परंपरेचा विकास जरी मराठ्यांच्या काळात वाढीस लागला तरी मराठ्यांच्या पूर्वी शासन असलेल्या शासकांनी मजबूत व भव्य असे किल्ले बांधून त्यांची देखभाल केल्याची साक्ष तत्कालीन गड किल्ल्याच्या इतिहासावरून कळून येते.
अश्याच एका प्राचीन व भव्य अश्याच गोळकोंडा नामक किल्ल्याची माहिती आपण घेणार आहोत जो सध्याच्या तेलंगाना राज्यातील हैद्राबाद येथे स्थापित आहे.
गोळकोंडा किल्ल्याचा इतिहास – Golconda Fort Information in Marathi
गोळकोंडा किल्ला – स्वरूप व निर्मितीचा इतिहास – Golconda Fort History
गोळकोंडा किल्ला निर्मिती ही काकतैय घराण्याच्या शासनकाळात झालेली आहे, ज्याची देखभाल व डागडुजी काकतैय वंशातील राणी रुद्रम्मा देवी व तिचा पुत्र प्रतापरुद्र यांनी केली होती, काकतैय शासनकाळात किल्ला एकदम साध्या पद्धतीने विटांनी बांधण्यात आला होता. किल्ल्याच्या आतील परिसरात अनेक छोट्या इमारती व छोटे किल्ले बांधण्यात आलेले आहेत.
गोळकोंड्याचा संपूर्ण परिसर हा जवळ पास ११ किलोमीटर एकता व्यापलेला आहे. यामध्ये प्राचीन वास्तुकला, शिल्पकला यांचे नमुने बघायला मिळतात तसेच मंदिर ,मशीद , शाही इमारती सुध्दा बांधण्यात आल्या आहेत, गोळकोंडा किल्ल्यावर अनेक राजांनी राज्य केल्याने प्रत्येकाच्या शासन काळात नवनवीन बदल घडवण्यात आले. प्रमुख आतील चार किल्ल्यांनी १० किलोमीटर इतका परिसर व्यापला आहे यावरून गोळ कोंड्याची भव्यतेची कल्पना केली जावू शकते.
एकंदरीत पाहता गोळकोंडा बांधकामात विटा, चुनखडी , ग्रेनाईट दगड व धातूचा वापर करण्यात आलेला आहे. किल्ल्याच्या आतील भागात ग्रेनाईट ने बनविलेले खंडित मकबरे सुध्दा आहेत. गोळकोंडा किल्ला जिथे स्थापित आहे ती संपूर्ण ग्रेनाईट पर्वत शृंखला असून किल्ल्याला एकूण आठ दरवाजे असून तीन मैल लांब ग्रेनाईट भिंतीचा वेढा आहे . किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला अनुकीचीदार मोठ्या खिळ्यांचे आवरण आहे जे हत्ती सारख्या शक्तिशाली प्राण्याच्या आक्रमणापासून संरक्षणाच्या दृष्टीने तयार करण्यात आले होते.
गोळकोंड्यावर शासन करणारे शासक:
काकतैय घराण्याने या किल्ल्याची निर्मिती व देखभाल केली परंतु नंतर मसुनुरी नायक नावाच्या शासकाने किल्ला काबीज केला. बहमनी शासकासोबत तुघलक घराण्याने सुध्दा हा किल्ला हस्तगत केला असल्याची इतिहासात नोंद आहे. ईसवी सन १५१२ साली या किल्ल्यावर कुतुबशाही राजघराण्याचे राज्य निर्माण झाले होते यावेळी साधारणतः ईसवी सन १५१८-१६८७ या कालखंडात हा किल्ला कुतुबशाहीची राजधानी होता. परंतु नंतर औरंगजेबाने कुतुबशाहीचा पराभव करीत किल्ला स्वतः कडे घेतला.
गोळकोंडा बद्दल रोचक माहिती – Golconda Fort Facts
- दरिया- ए – नूर हिरा , नूर उल एन हिरा व विश्वप्रसिध्द कोहिनूर हिरा इत्यादी हिरे गोळकोंडा येथील राजांजवळच होते , याव्यतिरिक्त आशा हिरा व रिजेन्ट हिरा इत्यादी हिरे भारताबाहेर जाण्यापूर्वी गोळकोंडा येथेच होते.
- गोळकोंडा किल्ल्याचा पुरातत्व विभागाच्या “अर्कीयोलॉजीकल ट्रेजर” या सूचीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
- गोलकोंड्याच्या सर्वात उंच भागावर महाकाली मातेचे मंदिर असून मुस्लीम शासक राज्य करित असतांना सुध्दा मंदिर आजवर सुरक्षित आहे.
- गोळकोंडा किल्ल्यात ४२५ वर्षापूर्वीचे आफ्रिकन ‘बाओआब’ प्रजातीचे वृक्ष आजही उपलब्ध आहे. अरबी व्यापाऱ्यांनी कुली कुतुब शाहला हे वृक्ष भेट स्वरुपात दिल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
- गोळकोंडा किल्ला परिसरात आजही ४०० वर्षापूर्वीचा शाही बगीचा बघायला मिळतो.
अश्याप्रकारे गोळकोंडा किल्ला हा भारतची पुरातन संस्कृती व इतिहास ह्याची साक्ष देणारी वास्तू म्हणून बघितल्या जातो. अनेक शासक इथे राज्य करून गेले व इतिहाच्या पानावर स्मृती व कर्तुत्व कोरून गेले त्या सर्वांचा कालखंड व त्यांची कारकीर्द यांची माहिती देण्यास गोळकोंडा आजवर महत्वाची भूमिका बजावतोय.
किल्ला परंपरेत गोळकोंडा किल्ला हा नक्कीच महत्वाचे स्थान राखतो, त्याची विशालता व किल्ल्यातील कलाप्रकार ज्यामध्ये शिल्पकला, वास्तुकला इत्यादी आजवर पर्यटकांचे लक्ष आकर्षून घेतात. अश्या भव्य ऐतेहासिक वास्तूला आम्ही दिलेल्या माहितिच्या आधारे बघण्याकरिता आपण सर्वांनी जरूर एकदा भेट द्यावी. हा लेख आवडल्यास आमच्या ईतर माहितीपर लेखाला जरूर वाचा.