Narasimha Aarti Marathi
हिंदू धार्मिक ग्रंथ पुराणांमध्ये वर्णिल्या प्रमाणे भगवान विष्णू यांनी या भूलोकावर दैत्यांचा संहार करण्यासाठी प्रत्येक युगांत विविध रुपांत अवतार घेतला आहे. जेंव्हा जेंव्हा या भूलोकात दैत्यांचे अत्याचाराचे प्रमाण वाढले तेंव्हा तेंव्हा भगवान विष्णू त्या दैत्यांचा संहार करण्यासाठी या भूलोकात अवतरीत झाले आहेत.
जसे की, त्रेता युगांत लंकापती रावण यांचा वध करण्यासाठी त्यांनी प्रभू रामचंद्र अवतार धारण केला होता. तर, द्वापार युगांत कंसाचा वध करण्यासाठी त्यांनी श्रीकृष्ण रूप धारण केले होते. अश्या प्रकारची धार्मिक माहिती आपणास भगवान विष्णू यांच्या अवतारांबाबत धर्म ग्रंथांतून मिळत असते.
तसचं, भागवतीकार, आपल्या भागवत कथांच्या माध्यमातून याबाबत माहिती संपादित करीत असतात. भगवान विष्णू यांना भागवतामध्ये संहारक असे म्हटलं आहे. सृष्टीची निर्मिती करणारे ब्रह्म, विष्णू आणि महेश या त्रिदेवांपैकी एक असून, भाविक मोठ्या आस्थेने त्यांच्या विविध अवतारांची पूजा अर्चना करीत असतात.
आज आपण सुद्धा भगवान विष्णू यांच्या सतयुगी अवतार भगवान नरसिंह याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तसचं, भगवान नरसिंह यांची आराधना करतांना पठन करण्यात येत असलेल्या आरतीचे लिखाण करणार आहोत.
नरसिंह आरती – Narasimha Aarti Marathi
कडकडिले स्तंभ गडगडिलें गगन।
अवनी होत आहे कंपायमान।
तडतडलीं नक्षत्रे पडताती जाण।
उग्ररूपें प्रगटे तो सिंहवदन।। 1 ।।
जय देव जय देव जय नरहरिराया।
आरती ओवाळू महाराजवर्या ।
जय देव जय देव ।।
एकविस स्वर्गमाळा डळमळली कैसी।
ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासी।
चंद्रसूर्य दोनी लोपति प्रकाशीं।
कैलासीं शंकर दचके मानसीं।। 2 ।।
जय देव जय देव जय नरहरिराया।
आरती ओवाळू महाराजवर्या।
जय देव जय देव ।।
थरथरती त्या जटा जिव्हा लळलळित।
तीक्ष्ण नखांनीं ऐसा दैत्य तो विदारीत।
अर्धांगी कमलजा शिरीं छाया धरित।
माधवदासा स्वामी नरहरि शोभत।। 3 ।।
जय देव जय देव जय नरहरिराया।
आरती ओवाळू महाराजवर्या।
जय देव जय देव ।।
सृष्टीची निर्माते भगवान ब्रह्म देव यांचे पुत्र ऋषी मरीचि यांचे पुत्र ऋषी कश्यप हे एक वैदिक ऋषी होते. ज्यांची गणना सप्तर्षीमध्ये केली जात असे. ऋग्वेदांत सुद्धा त्यांचा उल्लेख प्राचीन वैदिक ऋषींपैकी प्रमुख ऋषी म्हणून करण्यात आला आहे. ऋषी कश्यप यांना दिती नामक पत्नी होती. तसचं, ‘हरिण्याक्ष’ आणि ‘हिरण्यकशिपू’ नावाचे दोन पुत्र होते.
‘हरिण्याक्ष’ यांनी आपल्या शक्तीच्या बळावर भूलोकात अत्याचार माजवण्यास सुरुवात केली. लोक त्यांच्या त्रासापासून कंटाळून गेले होते. तेव्हा, भगवान विष्णू यांनी हरिण्याक्ष यांच्या अत्याचारापासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी वराह रूप धारण केले आणि हरिण्याक्ष दैत्याचा वध केला. आपला भाऊ हरिण्याक्ष यांचा वध भगवान विष्णू यांनी केल्यामुळे राजा हिरण्यकशिपू खुप दुखी आणि क्रोधीत झाले.
आपल्या भावाच्या वधाचा प्रतिशोध घेण्याचा संकल्प मनात करून राजा हिरण्यकशिपू यांनी अजिंक्य राहण्याचा वर प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. राजा हिरण्यकशिपू यांनी वराच्या प्राप्तीसाठी सुमारे हजारो वर्ष कठोर तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्म देव त्यांची तपश्चर्या पाहून प्रसन्न झाले आणि त्यांनी राजा हिरण्यकशिपू यांना अजेय राहण्याचे वर दिला.
ब्रह्म देव यांच्याकडून वर प्राप्त केल्यानंतर राजा हिरण्यकशिपू शक्तीने उन्मत्त होवून त्यांनी देव लोकावर स्वारी केली. स्वर्ग लोकांतील देवांचा पराभव करून त्यांनी देवलोकांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. राजा हिरण्यकशिपू यांनी ब्रह्म देव यांची आराधना करून वर प्राप्त करतात की, माझा वध दिवसा होवू शकेल ना रात्री, मला कोणी घरात मारू शकेल ना घराबाहेर, तसचं, माझा वध ना कोणते शास्त्र करू शकेल ना अस्त्र, माझा वध कोणता मनुष्य करू शकेल ना प्राणी, माझे मरण पृथ्वीवर होईल ना आकाशात अश्या प्रकारे राजा हिरण्यकशिपू यांनी ब्रह्म देवाकडून प्राप्त केले होते.
आपल्या शक्तीच्या बळाने उन्मग्न होवून त्यांनी देवांना तसचं देवाची भक्ती करणाऱ्या सर्व सामान्य लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. पुत्र भक्त प्रल्हाद यांच्या जन्मानंतर भक्त प्रल्हाद यांची भगवान विष्णू यांच्याप्रती असलेली श्रद्धा आणि भक्ती पाहून राजा हिरण्यकशिपू यांना खूप क्रोध येत असे. त्यांनी भक्त प्रल्हाद यांना ठार मारण्याकरिता अनेक प्रयत्न केले परंतु, भक्त प्रल्हाद यांच्या विष्णू भक्तीसमोर ते यशस्वी होवू शकले नाही.
एके दिवशी जेंव्हा राजा हिरण्यकशिपू यांनी आपले पुत्र प्रल्हाद यांना प्रश्न केला की, तुझा भगवंत कुठे आहे तेंव्हा भक्त प्रल्हाद यांनी माझा भगवंत चराचरात आहे असे सांगितले.
राजा हिरण्यकश्यपू यांनी रागाच्या भरात राज दरबारातील खांबावर प्रहार केला. तेंव्हा त्या खांबातून भगवान विष्णू नरसिंह रुप धारण करून प्रकट झाले होते. भगवान विष्णू यांचा नरसिंह हा अवतार, ना पशुचा होता ना मानवाचा, दैत्याचा होता ना दानवाचा भगवान विष्णू यांनी धारण केलेला नरसिंह अवतार राजा हिरण्यकशिपू यांचा वध करण्यास पात्र होता.
राजा हिरण्यकशिपू भगवान विष्णू यांचे रूप पाहून थरथर कापू लागले. भगवान नरसिंह यांनी राजा हिरण्यकश्यपू यांना आपल्या मांडीवर धरून दरवाजाच्या उंबरठ्यावर बसून त्यांचे पोट फाडले व राजा हिरण्यकशिपू यांचा वध केला.
भगवान नरसिंह त्यावेळी इतके क्रोधीत होते की, भक्त प्रल्हाद यांना सुद्धा त्यांचा क्रोध शांत करता आला नाही. त्यांच्याकडे पाहून असे वाटे जणू ते आता संपूर्ण प्राणीमात्रांचा वध करून टाकतील. सर्व देवगण भगवान विष्णू यांना क्रोध शांत करण्यासाठी विनंती करू लागले परंतु,त्यांना सुद्धा शक्य होत नव्हते.
शेवटी सर्व देवगण भगवान महादेव यांच्याकडे गेले तेंव्हा भगवान नरसिंह यांनी आपल्या क्रोधाच्या भरात भगवान महादेव यांच्यासोबत युद्ध करू लागले. भगवान महादेव यांनी विक्राळ ऋषभ रूप धारण केले आणि भगवान नरसिंह यांना आपल्या शेपटीत पकडून पाताळलोकांत घेऊन गेले.
भगवान नरसिंह यांनी आतोनात प्रयत्न केल्यानंतर सुद्धा ते भगवान महादेव यांच्या जाचातून सुटू शकले नाही. शेवटी भगवान नरसिंह यांना ऋषभ रुपात भगवान महादेव यांचे दर्शन झाले आणि त्यांचा राग शांत झाला. अश्या स्वरुपात भगवान विष्णू यांच्या नरसिंह अवताराबाबत धर्म ग्रंथांत अनेक कथा प्रचलित आहेत.
भक्त प्रल्हाद यांची भक्ती भगवान विष्णू यांच्या चरणी प्रबळ होती म्हणूनच त्यांना भगवान विष्णू यांच्या नरसिंह अवताराचे दर्शन झाले. आपण सुद्धा भगवान नरसिंह यांची आराधना करून त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या लेखात लिखाण करण्यात आलेली भगवान नरसिंह यांच्या आरतीचे नियमित पठन करावे.
वरील लेखातील संपूर्ण माहिती इंटरनेटच्या साह्याने मिळवली असून, भगवान नरसिंह यांची आराधना करण्यासाठी पठन करण्यात येत असलेल्या नरसिंह आरतीचे लिखाण केलं आहे.