Durga Devi Stotra
आपल्या पवित्र ग्रंथांमध्ये अनेक देवी देवतांचा उल्लेख करण्यात आला असून त्यांच्या कार्य शक्तींबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार देवी दुर्गा यांच्या अनेक रूपांचे आणि नावांचे त्या ग्रंथांमध्ये सविस्तर वर्णन करण्यात आलं आहे.
माता दुर्गा यांची सुमारे एकशे आठ नावे प्रसिद्ध असून प्रत्येक नाव रुपात त्यांनी विशेष कामगिरी केली आहे. माता दुर्गा म्हणजेच साक्षात देवी पार्वती होय. पौराणिक कथांनुसार माता दुर्गा यांनी आपले विविध रुपी अवतार दैत्यांचा वध करण्यासाठी घेतले होते. त्यामुळे त्यांना सर्व देवी देवतांमध्ये श्रेष्ठ मानलं जाते.
माता दुर्गा देवी यांची भाविक दरोरोज पूजा अर्चना करीत असतात. असे असले तरी, माता दुर्गा देवी यांची पूजा अर्चना करण्यास नवरात्री उत्सवाला विशेष महत्व दिल आहे. नवरात्री उत्सवात माता दुर्गा देवी यांची पूजा करण्याबाबत पौराणिक कथा प्रसिद्ध असून, या दिवसांत देवीची पूजा करण्याबाबत लोकांची धारणा आहे की, नवरात्रीच्या नऊ दिवस देवी पृथ्वीवर विराजमान होवून आपल्या भक्तांन सोबत राहतात. म्हणून या दिवसानिमित्त देवीची विधिवत पूजा अर्चना करून देवीला प्रसन्न करण्यासाठी दुर्गा देवी स्तोत्राचे पठन करावे.
दुर्गा देवी स्तोत्र – Durga Stotra Marathi
श्रीदुर्गा स्तोत्र (मराठी)
श्रीगणेशाय नमः। श्री दुर्गायै नमः।
नगरांत प्रवेशले पंडुनंदन। तो देखिले दुर्गास्थान।
धर्मराज करी स्तवन। जगदंबेचे तेधवा ॥ १ ॥
जय जय दुर्गे भुवनेश्वरी। यशोदा गर्भ संभवकुमारी।
इंदिरा रमण सहोदरी। नारायणी चंडिकेंऽबिके ॥ २ ॥
जय जय जगदंबे विश्र्व कुटुंबिनी। मूलस्फूर्ति प्रणवरुपिणी।
ब्रह्मानंदपददायिनी। चिद्विलासिनी अंबिके तू ॥ ३ ॥
जय जय धराधर कुमारी। सौभाग्य गंगे त्रिपुर सुंदरी।
हेरंब जननी अंतरी। प्रवेशीं तू आमुचे ॥ ४ ॥
भक्तह्रदयारविंद भ्रमरी। तुझे कृपाबळे निर्धारी।
अतिगूढ निगमार्थ विवरी। काव्यरचना करी अद् भुत ॥ ५ ॥
तुझिये कृपावलोकनेंकरुन। गर्भांधासी येतील नयन।
पांगुळा करील गमन। दूर पंथे जाऊनी ॥ ६ ॥
जन्मादारभ्य जो मुका। होय वाचस्पतिसमान बोलका।
तूं स्वानंदसरोवर मराळिका। होसी भाविकां सुप्रसन्न ॥ ७ ॥
ब्रह्मानंदे आदिजननी। तव कृपेची नौका करुनि।
दुस्तर भवसिंधु उल्लंघूनी। निवृत्ती तटां जाइजे ॥ ८ ॥
जय जय आदिकुमारिके। जय जय मूलपीठनायीके।
सकल सौभाग्य दायीके। जगदंबिके मूलप्रकृतिके ॥ ९ ॥
जय जय भार्गवप्रिये भवानी। भयनाशके भक्तवरदायिनी।
सुभद्रकारिके हिमनगनंदिनी। त्रिपुरसुंदरी महामाये ॥ १० ॥
जय जय आनंदकासारमराळिके। पद्मनयने दुरितवनपावके।
त्रिविधतापभवमोचके। सर्व व्यापके मृडानी ॥ ११ ॥
शिवमानसकनकलतिके। जय चातुर्य चंपककलिके।
शुंभनिशुंभदैत्यांतके। निजजनपालके अपर्णे ॥ १२ ॥
तव मुखकमल शोभा देखोनी। इंदुबिंब गेले विरोनी।
ब्रह्मादिदेव बाळें तान्ही। स्वानंदसदनी निजविसी ॥ १३ ॥
जीव शिव दोन्ही बाळकें। अंबे त्वां निर्मिली कौतुकें।
स्वरुप तुझे जीव नोळखे। म्हणोनि पडला आवर्ती ॥ १४ ॥
शिव तुझे स्मरणीं सावचित्त। म्हणोनि तो नित्यमुक्त।
स्वानंदपद हातां येत। तुझे कृपेनें जननिये ॥ १५ ॥
मेळवूनि पंचभूतांचा मेळ। त्वां रचिला ब्रह्मांडगोळ।
इच्छा परततां तत्काळ। क्षणें निर्मूळे करिसी तूं ॥ १६ ॥
अनंत बालादित्यश्रेणी। तव प्रभेमाजी गेल्या लपोनि।
सकल सौभाग्य शुभकल्याणी। रमारमणवरप्रदे ॥ १७ ॥
जय शंबरि पुहर वल्लभे। त्रैलोक्य नगरारंभस्तंभे।
आदिमाये आत्मप्रिये। सकलारंभे मूलप्रकृती ॥ १८ ॥
जय करुणामृतसरिते। भक्तपालके गुणभरिते।
अनंतब्रह्मांड फलांकिते। आदिमाये अन्नपूर्णे ॥ १९ ॥
तूं सच्चिदानंदप्रणवरुपिणी। सकल चराचर व्यापिनी।
सर्गस्थित्यंत कारिणी। भवमोचिनी ब्रह्मानंदे ॥ २० ॥
ऐकोनि धर्माचे स्तवन। दुर्गा जाहली प्रसन्न।
म्हणे तुमचे शत्रू संहारीन। राज्यीं स्थापीन धर्माते ॥ २१ ॥
तुम्ही वास करा येथ। प्रगटी नेदीं जनांत।
शत्रू क्षय पावती समस्त। सुख अद् भुत तुम्हां होय ॥ २२ ॥
त्वां जें स्तोत्र केलें पूर्ण। तें जे त्रिकाल करिती पठन।
त्यांचे सर्व काम पुरवीन। सदा रक्षीन अंतर्बाह्य ॥ २३ ॥
॥ इति श्रीयुधिष्ठिरविरचितं श्रीदुर्गा स्तोत्रं संपूर्णम् ॥
माता दुर्गा यांचे पृथ्वीवर आगमन होण्याबाबत आणि नवरात्री या पवित्र उत्सवा बाबत आपण थोडक्यात माहिती जाणून घेवूया. महिषासुर नावाच्या दैत्याने भगवान महादेव यांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्याकडून आमरणाचा वर प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली.
भगवान महादेव महिषासुर यांची कठोर तपश्चर्या पाहून प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना आमरणाचा वर देतांना सांगितलं तुझा वध केवळ एक कुमारिकाच करू शकेल. महिषासुर भगवान शंकर यांच्याकडून वर प्राप्त केल्यानंतर उन्मत्त झाला. त्यामुळे तो भूलोकावील अनेक लोकांना, ऋषीमुनींना त्रास देत असे तसचं त्यांच्या बायकांची विटंबना करीत असे.
इतकेच नाही तर आपल्या शक्तीने उन्मत्त असलेल्या महिषासुर दैत्याने देव लोकांवर आक्रमण केले. परंतु, कोणत्याही देवतेचा त्याच्या समोर ठाव लागत नव्हता. सर्व देवतांनी भगवान शंकर यांच्याकडे मदतीसाठी धाव केली.
तेंव्हा भगवान शंकराने दुर्गा देवी नावाच्या कुमारिकेची रचना केली. तसचं,सर्व देवतांनी दुर्गा देवी यांना महिषासुर नावाच्या दैत्यासोबत युद्ध करण्यासाठी आप आपल्या शक्ती प्रदान केल्या.
सर्व देवतांकडून शक्ती प्रदान केल्यानंतर दुर्गा देवी आपले विशाल काय रूप धारण करून महिषासुर दैत्यासोबत युद्ध करण्यास त्यांच्या समोर उभ्या राहल्या. माता दुर्गा यांचे ते विशाल रूप पाहून दैत्याच्या मनात घबराट सुटली.
माता दुर्गा आणि दैत्य महिषासुर यांच्या दरम्यान सुरु झालेले हे युद्ध सुमारे नऊ दिवस सुरु राहिले. नवव्या दिवशी दुर्गा देवीने त्या राक्षसाचा वध केला. महिषासुराचा वध केल्यानंतर देवी दुर्गा मातेने महिषासुर हे नाव धारण केले. तसचं, माता दुर्गा आणि महिषासुर यांच्यात पृथ्वीवर नऊ दिवस चाललेले हे युद्ध म्हणजेच नवरात्री होय.
मित्रांनो, अनेक भाविकांची माता दुर्गा देवी यांच्या प्रती अशी श्रद्धा आहे की, देवी नवरात्री या पवित्र उत्सवाच्या वेळी पृथ्वीवर अवतरीत होतात. तसचं, आपल्या भक्तांसोबत राहून त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.
त्यामुळे नवरात्री या उत्सवानिमित्त आपण देवीची उपासना करून आपल्या सर्व पापांचा नाश व्हावा याकरिता व्रत करावे. तसचं, या काळात साधा आहार घ्यावा ज्यामुळे आपणास क्रोध येणार नाही. तसचं, आपल्या सर्व इंद्रियांवर ताबा ठेवावा. रात्रीच्या समयी जमिनीवर चटई टाकून त्यावर झोपावे. नऊ दिवस कठोर व्रत केल्याने देवीचा आशीर्वाद आपणास मिळतो.
तसचं, या दिवसात आपण या लेखात लिखाण करण्यात आलेल्या माता दुर्गा देवी स्तोत्राचे पठन केल्याने आपणास देवीची स्तुती केल्याचा लाभ मिळतो. वरील लेखात नमूद करण्यात आलेल्या या स्तोत्राचे महत्व समजून घेऊन आपण या स्तोत्राचे नियमित पठन करावे.