Sade Tin Muhurta
हिंदू संस्कृतीत साडे तीन मुहुर्तांना अनन्य साधारण महत्वं आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवशी व्हावी अशी सामान्यतः मनुष्याची इच्छा असते आणि या दिवशी प्रारंभ झालेल्या कार्याला भरपूर यश मिळत अशी एक धारणा दृढ झाली आहे.
मुहूर्त म्हणजे काय तर कोणतेही कार्य सुरु करण्यासाठी उत्तम वेळ
हिंदू धर्मात शुभ मुहूर्ताला खूप महत्वं देण्यात आलं आहे. परंतु शास्त्राने अश्या काही निवडक तिथी सांगितल्या आहेत की ज्या दिवशी मुहूर्त पाहण्याची देखील आवश्यकता नसते. अश्या मुहूर्ताला ‘स्वयं सिद्ध मुहूर्त’ म्हणतात. असे ‘स्वयं सिद्ध मुहूर्त’ आपल्या हिंदू संस्कृतीत साडे तीन असल्याचे सांगण्यात आले आहे.
- गुढीपाडवा
- अक्षयतृतीया
- विजयादशमी (दसरा)
- बलिप्रतिपदा (पाडवा)
गुढीपाडवा, अक्षयतृतीया, आणि विजयादशमी हे तीन पूर्ण मुहूर्त आणि आणि दिवाळीतील बलिप्रतिपदा हा अर्धा मुहूर्त मानल्या गेला आहे.
हिंदू संस्कृतीत पवित्र मानले जाणारे साडे तीन मुहूर्त – Sade tin Muhurta Information in Marathi
गुढीपाडवा – Gudi Padwa
हिंदू संस्कृतीचा वर्षारंभ चैत्र महिन्याने होतो आणि या चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा होतो. प्रत्येक घरी दारावर आंब्याच्या पानांचे तोरण आणि अंगणात गुढी उभारून या दिवसाचे स्वागत केल्या जाते. कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ या दिवशी आवर्जून केल्या जातो. एकमेकांना नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. साडे तीन मुहुर्तांमध्ये गुढीपाडवा या दिवसाला विशेष महत्वं आहे.
अक्षयतृतीया – Akshaya Tritiya
या नावातच या दिवसाचे महत्व दडलेले आढळते. ज्या तिथीचा क्षय होत नाही अश्या मुहूर्ताला अक्षयमुहूर्त म्हंटले जाते. अक्षयतृतीयेला ज्या कार्याचा प्रारंभ केल्या जातो त्या कार्याला उदंड यश मिळते अशी मान्यता आहे. वैशाख मासातील तृतीया अक्षय तृतीया म्हणून साजरी होते. या दिवशी आपल्या घरातील मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ पाण्याने भरलेला उदककुंभ ब्राम्हणाला दान दिल्या जातो.
या दिवशी जे दान कराल ते अक्षय होऊन पुन्हा आपल्याला मिळत असे शास्त्र सांगते म्हणून साडे तीन मुहुर्तांमध्ये अक्षय तृतीया महत्वाची मानली गेली आहे. अक्षय तृतीयेला जर रोहिणी नक्षत्र असेल आणि बुधवार आला तर तो दिवस महापुण्यकारक मानला गेला आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी देखील करतात.
विजयादशमी (दसरा) – Vijaya Dasami (Dasara)
अश्विन महिन्यातील दशमी ही विजयादशमी म्हणून साजरी होते. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून विजयादशमी ला महत्वं आहे. प्रभू रामचंद्रांनी या दिवशी रावणाचा वध केला होता आणि असत्यावर सत्याचा विजय झाला होता, खऱ्या अर्थाने रामाचा वनवास या दिवशी संपला आणि सकल मानव जातीने या दिवशी आनंदोत्सव साजरा केला होता. म्हणून आज देखील दसऱ्याला बऱ्याच ठिकाणी आवर्जून रावण दहन करण्यात येतं.
विजयादशमी या दिवशी अष्टभुजा दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला होता आणि भयभीत झालेल्या लोकांची या राक्षसाच्या तावडीतून सुटका केली होती. त्यामुळे आई दुर्गेला महिषासुर मर्दिनी असे म्हंटल्या गेले. दसरा हा विजयाचा पराक्रमाचा आणि पौरुषाचा सण मानल्या गेला आहे. दसऱ्याला एकमेकांना आपट्याची पानं सोनं म्हणून दिली जातात आणि एकमेकांचे अभिष्टचिंतन केल्या जाते.
असत्यावर सत्याचा विजय म्हणून ती तिथी विजयादशमी. या दिवशी कोणतेही कार्य सुरु केल्यास निश्चित विजय प्राप्त होतो म्हणून एखादे शुभ कार्य सुरु करावयाचे झाल्यास विजयादशमीला सुरु करावे.
बलिप्रतिपदा (पाडवा) – Balipratipada (Padva)
कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात बलिप्रतिपदा हा मुहूर्त साडे तीन मुहुर्तांमध्ये अर्धा मुहूर्त मानण्यात आला आहे. व्यापारी बांधवांच्या दृष्टीने हा दिवस महत्वाचा समजला जातो. या दिवशी वही खात्याचे पूजन केल्या जाते. पाडवा हा दिवस दिवाळी मध्ये येत असल्याने त्याची रंगत आणखीनच वाढते सगळीकडे रोषणाई, नवे कपडे, फराळाची रेलचेल, मिठाई त्यामुळे या दिवसाला एक अनोखी झळाळी प्राप्त झालेली असते.
या दिवशी पत्नी-पतीला आणि मुलगी-वडिलांना ओवाळते. पती पत्नीसाठी एखादा सोन्याचा दागिना देखील आणतो. पाडव्याला सुवर्ण खरेदीचे सुद्धा खूप महत्वं आहे त्यामुळे सोन्याचा दुकानात या दिवशी खूप गर्दी बघायला मिळते. अर्धा मुहूर्त असला तरी देखील या दिवशी एखादे नवीन कार्य सुरु करणाऱ्यांची आणि नवी वस्तू खरेदी करून घरी आणणाऱ्यांची लगबग बघण्यासारखी असते.
असे हे साडे तीन मुहूर्त असून या दिवशी कार्याचा शुभारंभ व्हावा ही धारणा अनादी-अनंत काला पासून मानण्यात आली आहे. आज देखील या साडे तीन मुहूर्तांचे महत्वं कमी झाले नसून तेवढ्याच उत्साहाने आज देखील नवे कार्य सुरु करण्यासाठी या मुहूर्तांची वाट पाहिली जाते.