Marathi Bodh Katha
एका नदीच्या किनाऱ्यावर एक मासेमारी करणारा व्यापारी आपल्या कुटुंबासोबत बंगल्यात राहत होता. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि दोन लहान मुलं राहत होती. पण व्यापाऱ्याची दोनही मुले चंचल स्वभावाची, आणि नटखट होती. एक दिवस व्यापाऱ्याने त्याच्या जुन्या छोट्या जहाजांना रंग द्यायचे ठरवले, त्या कामासाठी त्याने एका पेंटर ला बोलावले, त्याला रंग कराव्या लागणाऱ्या जहाजांना दाखवले, आणि तेथून तो त्याच्या कामासाठी घराबाहेर निघून गेला.
पण जेव्हा दुपारच्या वेळेस तो घरी आला तेव्हा त्याच्या घराच्या आजूबाजूला लोकांचा जमाव दिसला, तो जमाव पाहून घाबरला. आणि त्याला माहिती झाले की काही वेळा पासून त्याची दोनही मुले घरात नाहीत. खुप शोधल्या नंतर सुध्दा कुठेच त्यांचा पता लागला नाही. या कारणामुळे त्या व्यापाऱ्याची पत्नी व्याकुळ होऊन रडत होती. त्याला थोडा वेळ काही सुचेनासे झाले, कुठे गेले असतील मुलं. कोणी घेऊन तर गेले नसेल ना? अश्या प्रकारचे अनेक प्रश्न त्या व्यापाऱ्याच्या डोक्यात येत होते. त्यानंतर त्याच्या डोक्यात जहाजाला रंग देणाऱ्या व्यक्तीचा विचार आला. त्याने क्षणाचाही विलंब न करता तो त्या ठिकाणी पोहचला ज्या ठिकाणी पेंटर जहाजांना रंग देत होता.
एक छानशी शिकवण देणारी बोधकथा – Moral Story in Marathi
पण तेथे जाऊन पाहतो तर काय सगळ्या जहाजांना रंग देऊन झालेला होता, आणि पेंटर त्याचे काम करून निघून गेलेला होता. पण व्यापाऱ्याची नजर जहाजांवर पडली त्यामध्ये एक जहाज कमी दिसले. तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपले दोनही मुलं जहाज घेऊन नदीत गेलेत. त्याने क्षणाचाही विलंब न करता आपल्या सोबतीच्या लोकांना मुलांचा तपास करण्यासाठी पाठविले. तसेच काही चांगल्या पोहणाऱ्या व्यक्तींना सुध्दा पाण्यात पाठविले. थोडा वेळ तपास केल्यानंतर दोनही मुलं एका जहाजात येताना त्या सर्वांना दिसले आणि त्या मुलांना पाहिल्या नंतर त्याने एक मोकळा स्वास सोडला.
पण आपल्या वडिलांना आपल्याला शोधताना पाहून मुलांचा जीव घाबरला, कारण ते कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडले होते. पण जेव्हा ते जहाजातून बाहेर आले तेव्हा भीत भीत आपल्या वडिलांजवळ चालत गेले, त्यांना वाटलं होत आता मार पडणार आणि बोलणे सुध्दा ऐकावे लागतील, पण यापैकी कोणताही एक प्रकार झाला नाही, व्यापाऱ्याने आपल्या दोन्ही मुलांना आपल्या छातीशी कवटाळले. नदीच्या किनाऱ्यावर तेथील बऱ्याच लोकांचा जमाव झाला होता. त्या मुलांची आई सुध्दा तेथे आली होती तिनेही लेकरांना गळ्याशी कवटाळून एक मोकळा श्वास घेतला. त्यांनंतर तेथून सर्व लोक आप-आपल्या घरी निघून गेले.
व्यापाऱ्याने जेव्हा त्या मुलांच्या जहाजाचे निरीक्षण केले तेव्हा त्या जहाजाला व्यवस्तीत रित्या रंग दिलेला दिसला, आणि तेव्हा त्याच्या दृष्टीस एक गोष्ट पडली, त्या गोष्टीला पाहिल्या नंतर त्याने लगेच रंग देणाऱ्या पेंटर ला बोलावून घेतले, पण जेव्हा पेंटर ला बोलावले तेव्हा पेंटर ला मुलांच्या विषयी सुध्दा माहिती झाले तो तेथे येत असताना त्याला वाटले की आपल्याला काही तरी शिक्षा मिळणार आहे, कारण ज्या नावेला त्याने रंग दिला होता तीच नाव मुलं नदीत घेऊन गेली होती. पण तो कसा बसा तिथं पर्यंत पोहचला.
तिथे दोन चार लोकही जमा झालेले होते, तेव्हा व्यापाऱ्याने त्या पेंटर ला विचारले की तू आज काय काम केले? तेव्हा पेंटर ने घाबरत उत्तर दिले की आपण सांगितलेल्या सर्व जहाजांना रंग दिला. त्यांनंतर व्यापाऱ्याने विचारले, तुझ्या आजच्या कामगिरीचे किती पैसे झाले? तेव्हा तो हतबल होत उत्तराला की ५०० रुपये! त्यांनंतर व्यापाऱ्याने त्याला आपल्या गळ्याशी कवटाळून त्याला म्हटले की तुझ्या आजच्या कामगिरीचे फक्त ५०० रुपये नाही होत ५०,००० रुपये होतात. तेव्हा तेथील मंडळी आणि तो पेंटर आश्चर्य चकित झाले. तेवढ्यात व्यापाऱ्याने खिशातील पैशांचे बंडल त्या पेंटर च्या हातावर ठेवत त्याला धन्यवाद दिला. पेंटर आणि तेथील बाकी लोक विचार करू लागले, की व्यापारी नेमकं अस का करतोय.
तेव्हा व्यापारी बोलू लागला की आपण सगळे विचारात पडले असणार की ५०० रुपयांच्या कामाचे मी याला ५०,००० का देतोय तेव्हा तो म्हणाला की ज्या नावेला घेऊन माझे दोनही मुलं पाण्यात गेले होते त्या नावेला एक छोटंसं छिद्र होत, आणि या रंग देणाऱ्या व्यक्तीने त्या नावेला रंग देता देता त्या छिद्राला भरून घेतलं होतं वास्तविक पाहता हे त्याचे कार्य नव्हतेही परंतु त्याने निस्वार्थ भावाने हे कार्य केले. तेही कोणताही मोबदला न मागता. आणि आज त्याच छिद्राला भरल्यामुळे माझे दोन्ही मुलं जिवंत आहेत. या कामासाठी मी या व्यक्तीचा आयुष्यभर ऋणी राहणार आहे. ही रक्कम तर त्या व्यक्तीचे फक्त बक्षीस पात्र आहे. व्यापाऱ्याच्या तोंडून हे शब्द ऐकून तेथील लोकांनी त्या पेंटर साठी टाळ्या वाजविल्या.
या गोष्टीवरून आपल्याला कळलं असेल की माणसाला मोठं बनण्यासाठी एखादी मोठी गोष्ट करणे आवश्यक नाही तर छोट्या छोट्या गोष्टी सुध्दा माणसाला मोठं बनवू शकतात. नेहमी आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवावी की निस्वार्थ केलेल्या कामाचे फळ आपल्याला अवश्य मिळते.
आशा करतो आपल्याला लिहिलेली ही छोटीशी बोधकथा आवडली असेल आपल्याला लिहिलेली ही बोधकथा आवडल्यास या गोष्टीला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन बोधकथा आणि लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!