Vyaktimatva Vikas
मित्रांनो कसे आहात? मजेत आहात नां…आनंदी आहात नां…? काय म्हणता! रोजच्या रुटीन जीवनात कसला आलाय आनंद?
रोज उठायचं, कामावर पळायचं, आणि थकून भागून आल्यानंतर झोपी जायचं…आता रोज उठून हेच आयुष्य जगणाऱ्यांच्या जीवनात कसला आलाय हो आनंद आणि वेगळेपणा
पण एक सांगू? तुम्ही हा आनंद बाहेर का शोधताय?
हा आनंद बाहेर कुठेच दडून बसलेला तुम्हाला आढळून येणारच नाहीये. बाहेर सुख शोधण्याच्या फंदात पडूच नका नां.
आपण जास्त चिंताग्रस्त, समस्याग्रस्त, नकारात्मक विचारांमध्ये अडकलो नां कि आपल्या जवळची मंडळी देखील आपल्यापासून अंतर ठेऊन राहायला लागतात… कारण त्यांना देखील समस्या आहेतच,
पण ती माणसं तुमच्याजवळ येतात ते दोन क्षण आनंद द्यायला घ्यायला. आणि त्यातही तुम्ही तुमचं रडगाणं त्यांना सांगू लागलात तर काय होणार?
हे सुख, हा आनंद शोधायचाच असेल तर आपल्या आत शोधा…स्वतःत शोधलात नां तर नक्की गवसेल पहा तुम्हाला तुमचं हरवलेलं सुख, दुरावलेला आनंद.
मित्रांनो आहे ती परिस्थिती आपण बदलल्याशिवाय कधीच बदलत नसते. जाणीवपूर्वक आपल्याला ती बदलावी लागते.
नसेल गेलं नं मागील वर्ष चांगलं, त्यात काय. त्यातच अडकून पडलात तर आनंद घेऊन आलेल्या या वर्षाकडे दुर्लक्ष नाही होणार का?
म्हणूनच म्हणतो आनंद बाहेर शोधायच्या भानगडीत पडूच नका…
या लेखात, तुमच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडेल अश्या काही महत्वपूर्ण टिप्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे… नक्की वाचा आणि पटल्यास रुचल्यास अवश्य बदल करा आपल्या व्यक्तीमत्वात!
तुमच्या व्यक्तिमत्व विकासात महत्वपूर्ण ठरतील या टिप्स – Personality Development Tips in Marathi
लवकर उठा!
मित्रांनो व्यक्तिमत्व विकास करायचं मनातून ठरवत असाल तर महत्वाचा हा बदल अंगीकारायलाच हवा…
सकाळी लवकर उठून फिरायला जाण्याने आपल्यात अनेक चांगले बदल घडू लागतात.
शुद्ध प्राणवायू शरीरात संचार करतो, उगवता सूर्य नवा विचार देतो. या गोष्टी संपूर्ण दिवस आपल्याला अधिक सक्रीय, तेजस्वी, आणि आनंदी ठेवायला पुरेश्या ठरतात.
जोडीला ध्यान धारणा केलीत तर क्या कहे!
मित्रांनो, आपल्यात येणारा अनुत्साह, चीडचीडेपणा, विक्षिप्तपणा हा खरंतर पुरेशी झोप नं मिळाल्याने येतो त्यामुळे…
पहाटे लवकर उठा आणि रात्री शक्यतो प्रयत्नपूर्वक आपली कामं लवकर उरकून झोपण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्या शरीराला 6-8 तासांची झोप अत्यावश्यक आहे.
स्वतःचा आत्मविश्वास वाढवा !
आपला आत्मविश्वास हा खरंतर बऱ्याचअंशी आपण आपल्याबद्दल काय विचार करतो यावर अवलंबून असतो. त्यामुळे तुम्ही स्वतःबद्दल चांगला आणि सकारात्मक विचार करत असल्यास उत्तम अन्यथा तसा विचार करण्यास सुरुवात करा.
निसर्गाने मुक्तहस्ताने बहाल केलेला आनंद आणि सुख हा तुमचा हक्क आहे तो तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही अगदी तुम्ही स्वतःही…
त्यामुळे स्वयंविकासाच्या दृष्टीने पाऊलं टाकतांना स्वतःबद्दल चांगला विचार करण्यास सुरुवात करा. कारण ही बाब तुमच्या वैय्यक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर प्रभाव टाकणारी ठरते. कारण ज्यापद्धतीने तुम्ही स्वतःकडे पाहणार आहात तसे लोक तुमच्याकडे पाहतील हे लक्षात असुद्या.
स्वतःबद्दल अधिक सजग… अधिक जागरूक व्हा!
तुमच्या जीवनात तुमच्यापेक्षा अधिक महत्वपूर्ण काहीही नाही हे लक्षात घ्या! कारण जान है तो जहांन है.
आपल्या आयुष्यात आपल्या नशिबाने आणि आपल्या कर्माने आपल्याला काय मिळालंय त्याचं महत्वं ओळखून त्याचा उपयोग आपल्यातील कल्पकतेने करण्यास शिका.
ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल जास्त विचार का करायचा? उलट काय होऊ शकतं याचा विचार करण्यात आपली शक्ती आणि वेळ खर्ची घालूया.
भविष्याबद्दल उत्तम विचार करा. मनाला भरकटू न देता विचारांच्या प्रवाहाला सकारात्मक विश्वासाने बदला त्यामुळे आपल्या मनाची शक्ती इच्छाशक्तीला चालना देईल आणि मं गंमत पहा आपल्या आयुष्याकडून आपल्याला जे जे हवे आहे ते मिळाल्याशिवाय रहाणार नाही.
जो बितगया सो बितगया
आपल्यातील बरीच मंडळी ही भूतकाळाला चिटकून बसल्याने देखील निराश होतात. जर आपण आपला भूतकाळ मागे सोडू शकलो तर आपल्यासारखा आनंदी आणि सुखी कुणीही नसेल.
त्यामुळे हे का झाले, कसे झाले, असे व्हायला नको होते या विचारांना मागे सोडून भूतकाळापासून मुक्त व्हा.
जे मागे पडले आहे, ज्यात बदल करणे आता आपल्या हातात राहिलेले नाही त्याचा आता विचार करून काय उपयोग?
भूतकाळाचा जास्त विचार करत बसाल तर वर्तमान देखील हातून निसटून जाईल आणि हाती आलेल्या चांगल्या संधी आपण गमावून बसू.
म्हणून भूतकाळाला मागे सोडा आणि मग पहा पूर्वीपेक्षा तुम्ही जास्त आनंदी रहाल .
हे अवघड आहे पण अशक्य नाही सो Do it!
सक्रीय व्हा !
निष्क्रिय होऊन बघत राहण्यापेक्षा सक्रीय होणे अधिक उत्तम! जवाबदारी उचला आणि ती तडीस नेईपर्यंत थांबू नका. निराश भावनांनी काहीही होणार नाही, सतत व्यस्त राहाणे, काही ना काही करत राहणे हे प्रगतीच्या वाटेवर जाण्याचे लक्षण आहे अशी मंडळी स्वतःला निर्माता म्हणून पहातात.
आपल्याला आपल्या आयुष्याकडून जे हवे आहे ते मिळवण्याकरता आपण सतत उत्साहाने सक्रीय रहाण्यास शिकायला हवे. आपलं जीवन कसं असावं हे आपणच ठरवायला हवं नं! स्वयंविकासाच्या दृष्टीने पाऊल उचलतांना निष्क्रिय राहून कसे बरे चालेल…चला सक्रीय व्हां!
आपल्या Body Language अर्थात देहबोलीत सुधारणा करा
व्यक्तिमत्व विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावते ती आपली देहबोली. आपल्या देहबोलीतून नकारात्मकता प्रसारीत न होता आत्मविश्वास झळकायला हवा.
इतरांशी आपला संवाद हा आत्मविश्वासपूर्ण आणि ठामपणे व्हायला हवा. याचा आपल्या जीवनात खूप चांगला परिणाम होतो.
समोरच्याशी आपला होणारा संवाद हा आपल्या बोलण्यातून जसा होतो तसाच तो आपल्या देहबोलीतून देखील होतो त्यामुळे आपली Body Language ही परिणामकारक असायलाच हवी आणि त्याकरता तुम्ही जागरूक असायला हवे. तुमची देहबोली तुम्हाला इतरांशी जोडण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावते हे लक्षात असुद्या.
वाचन वाढवा
वेगवेगळ्या विषयांवरचे वाचन तुमच्या व्यक्तीमत्वात अधिक सुधारणा करतं. या ज्ञानाचा उपयोग एक शक्ती म्हणून देखील आपल्याला होऊ शकतो.
जीवनात सकारात्मक परिणाम मिळवण्याकरता तुम्ही अनेक विषयांवरची पुस्तकं वाचू शकता.
जसे व्यावसायिक विषयांवरचे अध्ययन केल्याने तुम्ही करत असलेल्या कामात आणखीन Improvement होऊ शकते.
पालकत्व विषयावरचे पुस्तक वाचल्यास आपल्या मुलांच्या संगोपनात तुम्ही अधिक सजग होऊ शकाल.
व्यक्तिमत्वात सुधारणा करण्याकरता तुम्ही Personality Development वर आधारीत वाचनावर भर देऊ शकता.
त्यामुळे वाचनाने तुमच्यात प्रगती होते हे नक्की.
तणावाचे व्यवस्थापन आवश्यक
ज्यावेळेस कोणतही काम करायला आपण सुरुवात करतो त्यावेळी त्या कामाचा ताण येणं हि एक स्वाभाविक गोष्ट असते.
खरंतर तो ताण यायलाही हवा कारण त्यामुळे ते काम आपण अधिक सजगतेने आणि जागरूक राहून पूर्णत्वास नेतो.
पण कधी कधी ज्यावेळी हा ताण असहय्य होतो त्यावेळी मात्र तणाव नियंत्रण आपल्याला जमायला हवं.
वाढत्या तणावामुळे आपल्याला डोकेदुखी, रक्तदाब वाढणे, छातीत दुखणे, निद्रानाश, यांसारख्या समस्या उदभवू शकतात. यावेळेला तणावाचं व्यवस्थापन आपल्याला प्रभावीपणे करता यायला हवं.
आणि जेंव्हा हा तणाव निवळतो त्यावेळी आपल्याला Relax होता यायला हवं, हे वैय्यक्तिक विकासाकरता आवश्यक आहे.
सकारात्मकतेने जीवनाकडे पाहिल्यास आपलं आयुष्य आपल्याला बरच काही द्यायला तत्पर असतं.
पण प्रश्न उरतो कि आपण आपल्या जीवनाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो.
आपण आपल्या व्यक्तिमत्व विकासाकरता उद्दिष्ट ठरवून एक चांगली व्यक्ती नक्कीच बनू शकतो, नाही का?
आपल्या क्षमतांना मर्यादित न ठेवता स्वतःला जोखीम पत्करण्यात झोकून द्या. आणि ते कार्य तडीस नेईपर्यंत स्वस्थ बसू नका.
आजचा लेख आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका.
Thank You!