Narali Purnima Information in Marathi
“नारळी पुनवेच्या सणाला. .. .. . जाऊ दर्याच्या पुजेला”
अशी गाणी कानावर येऊ लागली की समजायचं नारळी पौर्णिमेचा सण जवळ आलाय. ..
नारळी पौर्णिमेबद्दल थोडक्यात माहिती – Narali Purnima Information in Marathi
हा सण विशेषतः समुद्र किनारी राहणारे बांधव विशेषतः कोळी बांधव साजरा करत असतात. समुद्राशी निकटचा संबंध या कोळी बांधवांचाच येत असल्याने हा सण मोठया उत्साहाने कोळीवाडयांमधे साजरा होत असतो.
मुळातच कोळीबांधव उत्सवप्रीय असुन होळी आणि नारळीपौर्णिमा हे त्यांचे अत्यंत प्रीय सण आहेत.
मुंबई आणि त्याच्या आसपासच्या परिसरास भेट दिल्यास आपल्याला या सणाचे महत्व अधिक जाणवते. मुंबापुरीत मोठया प्रमाणात कोळीवाडे आहेत. खरंतर मुंबईचा मुळ रहीवासी म्हणुन कोळयांची ओळख आहे.
मुंबईतील कोळीवाडे:
मुंबईच्या परिसरात जवळजवळ 34 कोळीवाडे आहेत वेसावे, मढ, भाटी, कुलाबा, वरळी, माहिम, जुहु, मालवणी, गोराई, माहुल, धारावी हे महत्वाचे कोळीवाडे आहेत.
श्रावण पौर्णिमेला कोळी बांधव नारळी पौर्णिमा असे म्हणतात. समुद्र हे वरूण देवाचे स्थान समजले जाते. वरूणदेव हा पश्चिम दिशेचा रक्षक आहे त्याला या नारळीपौर्णिमेच्या दिवशी नारळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.
कोळीबांधवांचे संपुर्ण जीवन सागराशी एकरूप झालेले असते. त्यामुळे सागराची आपल्यावर कायम कृपा राहावी याकरीता त्याची प्रार्थना करून त्याचे उतराई होण्याच्या हेतुने नारळीपौर्णिमेचा हा उत्सव मोठया उल्हासाने कोळी बांधव साजरा करतांना दिसतात.
नारळीपौर्णिमेच्या बऱ्याच अगोदर कोळी बांधवांनी समुद्रात जाणे थांबवले असते. एकतर तो काळ माश्यांच्या प्रजननाचा काळ समजला जातो आणि दुसरे म्हणजे पावसाळा असल्याने समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे कोळी बांधव त्या दरम्यान समुद्रात जात नाहीत.
त्यांच्या या सुट्टीच्या काळात बरेच कोळी बांधव आपापल्या मुळ गावी गेलेले असतात आणि बोटीवरचे खलाशी देखील आपल्या गावी जातात. बरेचसे कोळीबांधव या दरम्यान देव दर्शनाकरता देखील जातात. जसजसा नारळीपौर्णिमेचा सण जवळ येऊ लागतो तसे या कोळयांना मासेमारीचे वेध लागतात आणि सगळेजणं मुंबईला आपल्या कोळीवाडयांमधे परततात
कोळीबांधवांची नारळीपौर्णिमा:
नारळी पौर्णिमेचा सण कोळी बांधव अत्यंत पारंपारीक पध्दतीने साजरा करतात. कोळी बांधव आपला पारंपारीक वेश परिधान करतात. कमरेला रूमाल अंगात टिशर्ट आणि डोक्याला टोपी आणि स्त्रिया भरजरी लुगडे परिधान करून अक्षरशः सोन्याने मढतात.
कोळी स्त्रिया कायमच सोन्याचे भरपुर दागिने आंगभर घालत असल्याने सामान्यांना कायमच त्याचे अप्रुप वाटत आले आहे.
सगळे कोळी बांधव सायंकाळच्या वेळेला समुद्राची पुजा करावयास निघतात. दर्याला सोन्याचा नारळ अपर्ण करून भक्तिभावाने पुजा करतात. सोन्याचा नारळ म्हणजे नारळाला सोनेरी कागदाचे वेष्टण गुंडाळल्या जाते आणि तो नारळ सागराला अर्पण केल्या जातो. गोडाधोडाचा नैवैद्य दाखवुन सागराला गार्हाण घातलं जातं.
कोळी बांधव आपापल्या बोटी रंगरंगोटी करून सजवितात. बोटींना पताका लावुन सुशोभित केल्या जाते. बोटींची पुजा करून त्यांना मासेमारीकरता समुद्रात लोटतात.
कोळी स्त्रिया सागराला प्रार्थना करतात. आमच्या बोटीवर वर्षभर भरपुर मासोळी गावुदे (सापडु दे) समुद्रात माझा घरधनी येईल त्यावेळी त्याचे रक्षण कर. कोणतेही संकट नको येऊ देऊस.
कोळी बांधव ज्यावेळी मासेमारीकरता समुद्रात रवाना होतो त्यावेळी कोळी स्त्रियांची संपुर्ण मदार सागरावर असते. धन्याचे रक्षण कर म्हणुन त्या मनोमन दर्याला आराधना करतात.
पारंपारिक नैवेद्य:
नारळी पौर्णिमेच्या निमीत्ताने बनवलेल्या खास नारळाच्या करंजांचा नैवेद्य सागराला आणि बोटीला दाखवण्यात येतो. अनेक कोळी पाडयांवर रावस माश्याचा तळलेला तुकडा देखील नैवेद्यामधे ठेवला जातो.
त्यानंतर आपापल्या कोळी पाडयांवर पारंपारीक गिते गायली जातात. मिरवणुका काढल्या जातात. नारळ फोडण्याचा खेळ खेळला जातो. विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. कोळी स्त्रिया भरजरी कपडे घालुन पारंपारीक नृत्य करतात.
हिंदु बांधवांचे सगळेच सण पर्यावरणाशी आणि निसर्गाशी निगडीत असल्याचे या सणांची माहिती घेतल्यावर आपल्या लगेच लक्षात येते. निसर्ग हा माणसाकरता सतत सकारात्मक राहावा त्याची कायम आपल्यावर छत्रछाया राहावी म्हणुन हे सण उत्सव मनुष्य कायम परंपरेने पाळत आलेला आहे.
लक्ष्य दया: तुमच्या जवळ नारळीपौर्णिमेबद्द्ल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्