Gajanan Maharaj Ashtak
।।अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधि राज योगी राज
पर ब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी
समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय।।
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यांतील शेगाव हे ग्राम प्रसिद्ध आहे ते संत गजानन महाराज यांच्या समाधी स्थळा करिता. राज्याच्या अनेक भागांतील भाविक या ठिकाणी दर्शनाकरिता येत असतात.
संत दासगणू महाराज यांनी ‘गजानन महाराज बावन्नी’, ‘गजानन महाराज अष्टक’ आदी गजानन महाराज साहित्यांची रचना केली आहे.
गजानन महाराज बावन्नी मध्ये संत दासगणू महाराज यांनी गजानन महाराज यांचा थोडक्यात सार सांगितला असून, ‘गजानन महाराज अष्टक’ च्या माध्यमातून त्यांनी चारोळ्यांच्या स्वरुपात गजानन महाराज विजय ग्रंथाचे वर्णन केलं आहे.
‘गजानन महाराज विजय ग्रंथ’ खूप मोठा असून त्यात एकूण २१ अध्याय आहेत. त्यामुळे या ग्रंथाचे वाचन करण्यास जास्त वेळ लागतो. म्हणून भाविक संत दासगणू महाराजांनी रचलेल्या ‘गजानन महाराज बावन्नी‘ किंवा ‘गजानन महाराज अष्टक’ यांचा वापर पारायण करण्यासाठी करतात.
या पुस्तकांमध्ये सुद्धा गजानन महाराज यांच्या विजय ग्रंथ कथांचे वर्णन करण्यात आलं असून, वाचन करण्यास कमी वेळ लागतो. भाविक मंदिरात किंवा आपल्या घरी पारायण म्हणून या गजानन महाराज अष्टकांचे पठन करीत असतात. आज आपण सुद्धा या लेखाच्या माध्यमातून गजानन महाराज अष्टकाचे लिखाण करणार आहोत. जेणेकरून आपण सुद्धा पारायण स्वरूपी या अष्टकाचे पठन करू शकाल.
गजानन महाराज अष्टक – Gajanan Maharaj Ashtak
गजानना गुणागरा परम मंगला पावना ।
अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ।।
नसें त्रिभुवनामधे तुजविन आम्हां आसरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।१।।
निरालसपणें नसे घडलि अल्प सेवा करी ।
तुझी पतितपावना भटकलो वृथा भूवरी ।
विसंबत न गाय ती आपुलिया कधीं वांसरा ।
करी पदनातावरी बहु दया न रोषा धरा ।।२।।
अलास जगीं लावण्या परतुनी सु-वाटे जन ।
समर्थ गुरूराज ज्या भुषवि नाम नारायण ।।
म्हणून तुज प्रार्थना सतत जोडुनिया करा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।३।।
क्षणांत जल आणिले नसून थेंब त्या वापिला ।
क्षणांत गमनाप्रती करिसि इच्छिलेल्या स्थळा ।
क्षणांत स्वरूपे किती विविध धरिसी धीवरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।४।।
अगाध करणी तुझी गुरूवरा, न लोकां कळे।
तुला त्यजुनी व्यर्थ ते आचरितात नाना खुळे ।
कृपा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।५।।
समर्थ स्वरूपप्रती धरून साच बाळापूरी ।
तुम्ही प्रगट जाहलां सुशिल बाळकृष्णा घरी ।
हरिस्वरूप घेऊनि दिधली भेट भीमातिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।६।।
सछिद्र नौकेप्रती त्वदिय पाय हे लागतां ।
जलांत बुडतां तरी तिजसी नर्मदा दे हाता ।
अशा तुजसि वाणण्या नच समर्थ माझी गिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।७।।
अतां न बहु बोलतां तव पदांबुजा वंदितो ।
पडो विसर ना कदा मदिय हेंचि मी मागतों ।
तुम्ही वरद आपुला कर धरा गणूच्या शिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।८।।
संत दास गणु महाराजांनी लिहिलेल्या ‘संत गजानन महाराज विजय ग्रंथ’ कथांमध्ये गजानन महाराज यांच्या प्रकट होण्यापासून समाधिस्त होण्यापर्यंत सर्व माहिती नमूद करण्यात आली आहे.
पारायणाच्या माध्यमातून गजानन मूर्तीची आराधना करीत आपल्या सर्व मनोकामना महाराजांपुढे कथन करीत असतात. गजानन महाराज यांचे समाधी स्थळ हे साक्षात जागृत देवस्थान असून अनेक लोकांचे ते श्रद्धा स्थान बनले आहे.
मित्रांनो, आपण सुद्धा या लेखातील गजानन महाराज अष्टकाचे वाचन करून पारायण करण्याचा लाभ मिळवू शकता. गजानन महाराज अष्टक वाचण्यास सोपे असून कमी वेळात आपण त्याचे वाचन करू शकतो.